02/11/2025
लैंगिक शिक्षण - का आणि कसे ?
लहान मुलामुलींनी लैंगिकतेविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली की, त्याला योग्य उत्तर देणे अपेक्षित आहे. उत्तर येत नसेल तर पालकांनी खोटे वा अवास्तव सांगू नये. इथे पालकांची भीती असते की, आपल्या पाल्याला लैंगिक जीवनातील अति माहिती दिली तर काही अडचणी येतील. प्रत्यक्षात वयोमानानुसार लहान मुलांना खूप माहिती दिली तर ज्यांना जेवढे समजते तेच लक्षात ठेवतात.
वय वर्षे ३-६ वयोगटातील मुले-मुली विरुद्धलिंगी मित्र असे कसे ? मी असा का नाही ? बाळ कसे जन्मते ? बाळ बाहेर कुठून येते ? बाबांना बाळ कधी होईल ? असे प्रश्न विचारतात. वय वर्षे ७-१० वयोगटातील मुले-मुली कंडोम, व्हीस्पर म्हणजे काय ? मुलांना पाळी का येत नाही ? असे प्रश्न विचारतात.
वय वर्षे ११-१५ वयोगटातील मुले-मुली, १६-२० वर्षे वयोगटातील मुले-मुली यांना हा विषय सांगताना त्यांच्या मनात हस्तमैथुन, लिंगाची लांबी, स्तनाचा आकार, मासिक पाळी, ब्ल्यू फिल्म्स, समलिंगी आकर्षण, प्रेम याविषयी जास्त प्रश्न असतात. यामध्ये कामुक चित्रपट व समलिंगी, लैंगिक छळ याविषयी खरोखरच माहिती देणे महत्वाचे आहे. कारण तरुण-तरुणींबरोबर बऱ्याच पालक, शिक्षक, डॉक्टरांमध्ये याविषयी प्रचंड गैरसमज आहेत. यामध्ये सर्वात मोठी अडचण आहे ती वृत्तपत्रांतील, मासिकांतील खोट्या जाहिराती. यावर कायमची बंदी आणावी लागेल. कारण हस्तमैथुन नैसर्गिक असताना ते 'शाप' म्हणणारा 'भामटा' खुलेआम जाहिरात करतो. त्यावर कारवाई केली नाही तर ती चुकीची माहिती तरुणांच्या डोक्यात पक्की बसते आणि लैंगिकता शिक्षण देताना अडचणी येतात.
लैंगिकता शिक्षणाची गरज नाही, असे म्हणणाऱ्यांनी एक लक्षात घ्यावे की, भारतामध्ये एचआयव्ही, एड्सचे वाढते प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे व त्यांचा वयोगट १३ ते २४ वर्षे हा आहे. लैंगिकता शिक्षणाचा अभाव असल्याने ही संख्या वाढली आहे. लैंगिक जीवन हे खाजगी असले तरी त्याची शास्त्रीय चर्चा ही उघडपणे व्हावी लागते. सुखी वैवाहिक जीवन जगताना त्याची गरज भासते. वर्षाला हजारो घटस्फोटाच्या केसेस मोठ्या शहरात येतात. त्यामागील कारणात लैंगिक समस्या असणे, शास्त्रीय माहिती नसणे ही कारणे आहेत. विवाहपूर्व, विवाहपश्चात संबंध, वेश्यागमन, बलात्कार, लैंगिक छळ, लहान मुलामुलींवर लैंगिक अत्याचार, समलिंगी संबंध, कामुक चित्रपट पाहणे (पोर्नोग्राफी) हे सर्व भारतात आहेच. सर्वत्र पाहायला मिळते. याविषयी प्राथमिक माहिती आणि त्यातील सत्य हे लैंगिकता शिक्षणात द्यावीच लागेल. लैंगिकता शिक्षणाचे व्याख्यानावेळी स्त्री-पुरुष हस्तमैथुन गुदमैथुन, पोर्नोग्राफी, पुरुष आणि स्त्रियांसाठी कंडोम यावर माहिती देताना शिक्षकांची तारांबळ उडते, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे. यातून निष्कर्ष असा निघतो की, मुळातच पालक-शिक्षक यांना प्रथम मानवी लैंगिकतेविषयी सजग करावे लागेल. तरच ते मुलामुलींच्या प्रश्नांना योग्य उत्तरे देऊ शकतील. खोट्या जाहिरातींवर बंदी आणली नाही तर हा 'शिक्षणाचा' कार्यक्रम अयशस्वी ठरणार आहे.
- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)