03/04/2026
.
कायम "लक्ष्या" त राहणारा आवाज
मराठी चित्रपटसृष्टी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि रंगभूमी—या तिन्ही क्षेत्रांमध्ये आपल्या अद्वितीय अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आपले लाडके अभिनेते कै. लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ “लक्षा” आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या अभिनयातील सहजता, निरागस हास्य आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे घर केले.
लक्षा यांच्या चित्रपटांतील गाणीही तितकीच लोकप्रिय ठरली. त्या गाण्यांना जिवंत करणारा, त्यांना सुरांची जादू देणारा आवाज होता गुणी गायक विनय मांडके यांचा.
१ एप्रिल २०२६ हा दिवस मराठी संगीतप्रेमींसाठी अतिशय दुःखद ठरला. त्या दिवशी विनयजींनी या जगाचा अखेरचा निरोप घेतला. ज्या आवाजाने आमचं बालपण सुरेल केलं, ज्या आवाजाने अनेक आठवणींना स्वर दिले, तो आवाज आज कायमचा शांत झाला… ही जाणीव मनाला चटका लावून जाते.
त्यांनी गायलेली “हमारा बजाज” ही जिंगल तर अक्षरशः ऐतिहासिक ठरली. काही सेकंदांची ती धून आजही ऐकली की मन नकळत त्या जुन्या दिवसांत हरवून जातं.
“बाळाचे बाप ब्रह्मचारी” मधील विनयजी आणि सुरेशजी यांनी म्हटलेली अंगाई माझ्यासाठी विशेष प्रिय आहे. त्या गाण्यातील कोमलता आणि भावस्पर्शी सूर आजही मनाला शांत करतात.
तसंच “धडाकेबाज” मधील “ही दोस्ती तुटायची नाय” आणि “बाळाचे बाप ब्रह्मचारी” मधील “चार तीन दोन एक” ही गाणी आमच्या रॉयल मालवणी मित्रमंडळीत तर अक्षरशः जल्लोष निर्माण करणारी ठरतात . त्या गाण्यांवर आमच्या मैत्रीच्या असंख्य आठवणी कोरल्या गेल्या आहेत.
असंख्य Live Orchestra कार्यक्रमांतूनही त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. मंचावर त्यांचा आवाज घुमला की वातावरणात एक वेगळीच जादू निर्माण व्हायची.
आज ते आपल्यात नसले तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांच्याशी जोडलेल्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतील. कलाकार कधीच खऱ्या अर्थाने दूर जात नाही—तो आपल्या कलेतून सदैव जिवंत राहतो.
🙏 विनय मांडके यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
“काही आवाज काळाच्या पलीकडे जातात…
आणि कायम मनात घुमत राहतात.”
@सिदधु