29/09/2025
मग, आज कुठे चाललाय अजिनोमोटो खायला..!
मित्रांनो, कुठलाही व्यक्ती हॉटेलमध्ये जेवायला गेल्यास किमान तीनशे रुपये तरी खर्च करतो. आता हे बिल हॉटेलनुसार अवलंबून असते. काही हॉटेल्समध्ये शंभर-दीडशे रुपयांतही जेवण होते. मात्र, काही हॉटेलमध्ये जेवण केल्याने दुसऱ्या दिवशी शंभर टक्के जळजळ, ढेकर येणे किंवा एसिटीडी असा त्रास जाणवायला लागतो.
तुम्ही घरी जेवलात तर काही त्रास होत नसेल आणि हॉटेलचे जेवण केल्यास काही तरी पोटात गडबड झालेली असेल तर तुम्ही त्या हॉटेलमधून टेस्टिंग पावडर (अजिनोमोटो) खावून आलेला आहात, असे समजावे. तर, आजच्या लेखात आपण खवय्यांचे जनजागरण करण्याच्या उद्देशाने टेस्टिंग पावडरची माहिती घेत आहोत.
इथून पुढे कधीही कुठल्याही हॉटेलमध्ये जेवलात आणि दुसऱ्या दिवशी त्रास झाला तर त्या हॉटेलमालकाला जाब विचारा किंवा तिकडे पुन्हा कधी फिरकू नका...! याशिवाय खऱ्या अर्थाने जनजागरण होणार नाही. चला तर आता अजिनोमोटोची माहिती घेऊ आणि शेवटी काही हॉटेलमधील कूक टेस्टिंग पावडर मालकाला बंद का करू देत नाहीत, यावरही बोलू.
🔴 अजिनोमोटो म्हणजे काय?
अजिनोमोटो म्हणजे मोनोसोडियम ग्लुटामेट (Monosodium Glutamate – MSG). हे पदार्थाची चव वाढवण्यासाठी वापरले जाणारे रासायनिक मीठ आहे. विशेषतः नूडल्स, फ्राईड राईस, मॅंचुरियन, सूप किंवा इतर फास्टफूडमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो.अजिनोमोटो पदार्थाला चवदार बनवते, पण त्याचा वारंवार वापर आरोग्यास अपायकारक आहे. विशेषतः लहान मुले, गर्भवती स्त्रिया आणि आजारी व्यक्तींनी अजिनोमोटो टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
पदार्थाला “उमामी” नावाची वेगळी चव देण्याचे गुणधर्म अजिनोमोटामध्ये आहेत. त्यामुळे खाल्लेले अन्न अधिक चविष्ट वाटते. पण याचा वारंवार आणि जास्त प्रमाणात वापर केल्यास शरीरावर काही गंभीर परिणाम होऊ शकतात.
सर्वप्रथम, अजिनोमोटोचे सेवन जास्त झाल्यास काही लोकांना “चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम” म्हणून ओळखला जाणारा त्रास होतो. यात डोकेदुखी, मळमळ, हृदयाची धडधड वाढणे, अशक्तपणा, घाम येणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसू शकतात. याशिवाय, अजिनोमोटो पचनसंस्थेवर परिणाम करतो. वारंवार सेवनामुळे पोट फुगणे, अॅसिडिटी, अपचन किंवा भूक मंदावणे यासारखे त्रास उद्भवू शकतात. लहान मुलांमध्ये याचा परिणाम अधिक होऊ शकतो कारण त्यांची पचनशक्ती नाजूक असते.
काही संशोधनानुसार MSG चे जास्त सेवन केल्यास स्नायूंच्या कार्यावर आणि मज्जासंस्थेवर ताण येऊ शकतो. दीर्घकाळ वापरामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. काही लोकांना याची अॅलर्जी होऊन त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यात त्रास होऊ शकतो.
जरी अमेरिकन FDA आणि इतर काही आरोग्य संस्था मर्यादित प्रमाणात MSG सुरक्षित मानतात, तरीही रोजच्या स्वयंपाकात किंवा वारंवार वापर केल्यास शरीरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच, अजिनोमोटोचा वापर टाळावा किंवा फारच मर्यादित प्रमाणात करावा. त्याऐवजी पदार्थाची चव वाढवण्यासाठी आले, लसूण, कांदा, हळद, मिरची, मसाले किंवा नैसर्गिक चव वाढवणारे घटक वापरणे अधिक सुरक्षित आणि आरोग्यदायी ठरते.
👉 आता शेवटचा मुद्दा तो म्हणजे, काही हॉटेल्स हे फक्त टेस्टिंग पावडर टाकून बनविलेल्या जेवणावर अवलंबून आहेत. खवय्यांनाही आता चटक मटक खाण्याची सवय झालेली आहे.
मुळात घरात टेस्टिंग पावडर वापरली जात नाही म्हणूनच कुठल्याही व्यक्तीला चटक मटक खायची इच्छा होते आणि तो हॉटेल गाठतो. काही काही हॉटेल्स असे आहेत तिथे अतिशय स्वस्त जेवण मिळते. अशा ठिकाणी जास्त सावध होण्याची गरज आहे. या ठिकाणी जे कूक काम करतात, त्यांची नोकरी केवळ तिथे येणाऱ्या कस्टमरवर अवलंवून असते. चव चांगली लागली नाही तर ग्राहक नाराज होतो किंवा नंतर तो पुन्हा येत नाही. त्यामुळे हॉटेलचा व्यवसाय कमी होत जातो. परिणामी, ही सर्व जबाबदारी कूकवर येते.
विशेष म्हणजे, ओरिजिनिल मसाल्यात जेवण देण्याचा प्रयत्न हॉटेलमालक किंवा कूकही करतात. मात्र, ग्राहकांनाच चटक मटक पाहिजे. जिभेचा झटका बसल्याशिवाय बाहेर जेवल्याचा अनेकांना फिल येत नाही. मग काही जणांना नाईलाजाने टेस्टिंग पावडर वापरावीच लागते. जागेचे भाडे, किराणा, वीजबिल, पगार एवढा खर्च भागवायचा तर त्याला ग्राहक पाहिजेच. मात्र, ग्राहकच जागरूक नसले तर नुकसान सगळ्यांचेच होते.
ग्राहकांनीच जर हॉटेलमध्ये जेवणाची चव चमचमीत लागली नाही तरी चालेल पण घरगुती मसाल्यातच स्वयंपाक बनवा, असे सांगितले तर कुणीही टेस्टिंग पावडरचा वापर करणार नाही. यामध्ये हॉटेल्सची जेवढी चूक आहे तेवढीच खवय्यांचीसुद्धा आहे.
त्यामुळे इथून पुढे टेस्टिंग पावडरबद्दल जागरूक रहा. नेहमी हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्यांनी किमान हॉटेल मालक किंवा कूकला प्रत्यक्ष सांगून टेस्टिंग पावडर न वापरता डिश द्या, असे सांगा. आणि टेस्टिंग पावडर वापरली आहे की नाही हे ओळखणे अगदी सोपे आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त थोडे तास वाट पाहायची आहे. जेवण तुम्हाला चवदार लागेल. मात्र, नंतर पोटात गडबड होईल, जळजळ होईल, एसिडिटी होईल किंवा काही तरी शरीरात बदल झाल्याचे आपोआप जाणवेल. अशा वेळी तुम्ही त्या हॉटेलकडे ढुंकूनही बघू नका. कारण तुम्ही सांगूनही त्यांनी टेस्टिंग पावडर वापरली असेल तर त्यांना तुमच्या आरोग्याशी काही देणे घेणे नाही हे लक्षात येईल.