06/06/2021
*तुमच्या नाकात बोट कोण घालतं ?*
- डॉ विनय भोसले
होमिओपॅथी तज्ञ
पुणे
हास्यास्पद प्रश्न वाटतो ना?
पण बऱ्याचदा शेजारीपाजारी कोणी पॉझिटिव्ह आले की घबराट होते व डॉक्टर आम्ही काय काळजी घ्यावी असा प्रश्न विचारला जातो - तेव्हा मी उलट हाच प्रतिप्रश्न विचारतो...
*तुमच्या नाकात बोट कोण घालतं ?*
त्यावर लोक संभ्रमित होतात व त्यांना उत्तर सुचत नाही तेव्हा मीच त्याचं उत्तर देतो की - तुमच्या नाकात तुम्हीच बोट घालता - बस तेवढी काळजी घ्या म्हणजे करोना तुम्हाला होणार नाही...
एक वर्ष होऊन गेलं - इतकी काळजी घेऊन, सैनीटायझर वापरून, डबल मास्क लावून, पी पी इ किट वापरून देखील कित्येक लोकांना इन्फेक्शन झालेच - कारण एक छोटीशी चूक - ती म्हणजे मध्येच मास्क नाकाच्या खाली करून नाकाला किंवा डोळ्याला हात लावले होते...
करोना व्हायरस किंवा कोणत्याही फ्लूचा विषाणू हा नॉर्मल त्वचेतून (intact skin) थेट शरीरात प्रवेश करू शकत नाही. तर त्याला प्रवेश करण्यासाठी डोळे, नाक, तोंड, जननेंद्रिये इत्यादी ठिकाणची लालसर पातळ श्लेष्मल त्वचा (mucous membrane) गरजेची असते आणि या ठिकाणापर्यंत त्याला आपणच स्वतःच्या हाताने पोचवतो व बाधित होतो.
*काय काळजी घ्याल...*
काय काळजी घ्यायची हे आता सर्वांना तोंडपाठ झाले आहे त्यामुळे फक्त महत्वाचा मुद्दा येथे सांगतो...
१.कोणत्याही कारणाकरिता घराबाहेर निघण्यापूर्वी घरातूनच मास्क लावून निघा व घरी आल्यानंतरच मास्क काढा - *मास्क सतत नाकाच्या वरच असला पाहिजे.*
२. *नाक, डोळे, तोंड या जागांतूनच व्हायरस शरीरात प्रवेश करतो* त्यामुळे घरातून बाहेर पडल्यावर नाक, डोळे - खाजवू नका, खाज असह्य झाली तर मास्क वरूनच खाजवा किंवा हात सॅनीटाईज करूनच खाजवा व त्वरित पुन्हा मास्क व्यवस्थित लावा.
बस एवढीच छोटीशी सुधारणा करा - तुम्हाला खात्रीशीर सांगतो इन्फेक्शन होणार नाही, कारण मी गेले वर्षभर कोरोना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्याशी संपर्कात राहूनही व माझे वडील पॉझिटिव्ह आले असताना त्यांची सेवा शुशृषा माझ्या घरीच विलगीकरण करून केली असूनही मी आजतागायत बाधित झालेलो नाही.
*अतिशय महत्त्वाचे-*
आपण किंवा आपले जवळचे नातेवाईक यांना सर्दी किंवा खोकला किंवा ताप किंवा उलट्या किंवा डोकेदुखी किंवा अंगदुखी *यापैकी काहीही एक जरी झाल्यास ताबडतोब कोरोना असेल अशी शक्यता गृहीत धरून गृहविलगीकरण करा, दोन दिवसात बरे न वाटल्यास ताबडतोब टेस्टिंग करून घ्या.*
*मला तसं काही असेल असं वाटत नाही* - हे वाक्य एकदम झूट आहे कारण कोरोना हा पहिल्या चार दिवसात अत्यंत किरकोळ लक्षणे दाखवतो - ताबडतोब टेस्टिंग केल्यास सायटोकायनिन वादळ शरीरात सुरु होण्या अगोदर उपचार चालू करता येतात व त्यामुळे आपण सुरक्षितपणे या आजारातून बाहेर पडू शकता. परंतु हे मौल्यवान दिवस वाया घालवून उपचारास उशीर झाल्यास आठव्या-नवव्या दिवसानंतर खोकला व दम लागणे, ऑक्सिजन पातळी कमी होणे वगैरे लक्षणे येतात व त्यामुळे गुंतागुंत व उपचाराचा खर्च व त्रास वाढतात.
*महामारी आता संपत आली आहे, थोडे दिवसच पण ही महत्त्वाची काळजी घ्या...*
सुरक्षित रहा...
आपलाच आनंदी डॉक्टर
*डॉ विनय भोसले*
होमिओपॅथी तज्ञ
पुणे
*लसीकरणा विषयी थोडेसे*
१.आपल्याला आत्तापर्यंत कोरोना होऊन गेलेला नसेल तर ताबडतोब लस घेण्याचा प्रयत्न करा
२. आपल्याला कोरोना होऊन गेला असेल तर किमान ३ महिने लस घेण्याची गरज नाही - इतरांना लस मिळू द्या