Authentic Ayurved

Authentic Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Authentic Ayurved, Health & Wellness Website, Balawant Ayurved 30 Bhagavti Madhav Bag KOthrud, Pune.

हाडांचे स्वास्थ्य – सर्वांगीण दृष्टिकोण सारखं वापरुन वापरुन शरीर झिजत असतं, अन्न आणि झोप या दोन गोष्टी ही झीज भरून काढत ...
23/02/2025

हाडांचे स्वास्थ्य – सर्वांगीण दृष्टिकोण

सारखं वापरुन वापरुन शरीर झिजत असतं, अन्न आणि झोप या दोन गोष्टी ही झीज भरून काढत असतात. यापैकी झोप या महत्वाच्या मुद्द्यावर स्वतंत्र लिहिणार आहे लवकरच!

आहारबद्दल मी खूपदा लिहीत असते, बोलत असते, पण आज झीज भरून काढणे या दृष्टीने बघूया. आपल्या सगळ्यांच्या स्वास्थ्याच्या संकल्पना विविध vitamins आणि minerals च्या भोवती फिरतात. म्हणजे हाडं अथवा सांधे दुखायला लागले की आधी पटकन आपल्या डोक्यात विचार येतो कॅल्शियम आणि विटामीन डीचा. यात गैर काही नाही. Calcium आणि Phosphorus हे महत्वाचे हाडातील मुख्य minerals आहेत. त्यांची झीज झाली की ते भरुन काढायलाच हवे.

प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचे विविध दृष्टिकोण आहेत. मॉडर्न नुसार आपण त्यात विटामीन किती, कुठले, मिनरल किती कुठले, त्यात carbs अथवा प्रोटिन किती असा विचार करू, तर आयुर्वेद ‘गुणांच्या’ भाषेत विचार करणार. म्हणजे पचायला जड आहे, हलके आहे, शरीर स्निग्ध करणार कि कोरडे करणार, शरीरात उष्णता निर्माण करणार की उष्णता कमी करणार?

कुठल्याही गोष्टीच्या आपल्याला अशा दोन्ही बाजू माहिती असल्या की कुठला पदार्थ कुठल्या ऋतुत खावा म्हणजे त्याचे हवे ते फायदे मिळतील असे ठरवायला सोपे जाते.

आयुर्वेदानुसार हाडांचे सांध्यांचे स्वास्थ्य जर कुठल्या एका गोष्टीवर अवलंबून असेल तर ती आहे – स्निग्धता ! तेल, तूप, लोणी, दूध, दही, श्रीखंड, खोबरे, ताज्या नारळाचे दूध इत्यादि गोष्टीतून जाणारी स्निग्धता आणि विशेषत: हिवाळ्यात खाल्ले जाणारे डिंक- खारीक – खोबरे यांच्या पोषक गुणांनी भरलेले लाडू आपली हाडे आणि सांधे खऱ्या अर्थाने मजबूत ठेवतात

हाडे आतून पोकळ झाली आहेत, व्हायला लागली आहेत किंवा बोन density कमी झाली आहे, osteoporosis झाला आहे, अशी वाक्ये तुम्ही खूपदा ऐकली असतील. ते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, हाडांच्या आतली स्ंनिग्धता ज्याला मज्जा अथवा bone marrow म्हणतात ते कमी झालेले असते.

कमी मिळणारी झोप, सततची धावपळ, शिळे अन्न खाणे, सतत असलेला मानसिक तणाव, शरीराची अवस्था आणि गरज याचा अभ्यास न करता केलेला व्यायाम शरीराची झीज अतोनात वाढवते. आपण घेत असलेला आहार आणि शरीराची झीज यांचा काही ताळमेळ बसत नाही कारण आहार सुद्धा कोरडा कोरडा आणि पोषण न करणारा असतो.

वारेमाप fertilizers आणि pesticides वापरुन, जनुकीय बदल करून काढलेले पीक पोषण करण्यास मुळातच असमर्थ असते आणि त्यात आपण सतत या न त्या निमित्ताने हॉटेलचे अन्न खात असतो ज्यात कुठलेही पोषण मूल्य नसते.
झोपेपासून अन्नापर्यंतची विविध कारणे शरीराचे स्वास्थ्य घालवत राहतात आणि मग कालांतराने हाडं पोकळ होत जातात, हाडांना चिकटलेले स्नायू कोरडे पडत जातात आणि साध्या साध्या हालचाली कठीण होऊ लागतात, सांध्यातील वंगण कमी होत जाते, सांधे कुरकुर करू लागतात, केसांचे गळणे वाढते, त्यांची चमक कमी होते ( आयुर्वेदानुसार हाडांच्या स्वास्थ्यवर केसांचे स्वास्थ्य अवलंबून असते.)

या तक्रारींवर आपण आधी विचार करतो विटामीन डी आणि कॅल्शियमचा! अर्थात तो मुळीच चुकीचा विचार नाही. सप्लिमेंट्सच्या कुबड्या गरज भासली तर घ्यायल्या काही हरकत नाही पण त्यासोबतच झीज भरून काढण्यासाठी आहार स्निग्ध असणे, अती झिजवणारी जीवनशैली बदलणे अत्यंत महत्वाचे आहे.
शरीराचा भार समर्थपणे पेलणारी हाडे आपल्या शरीराचाच नव्हे तर संपूर्ण आयुष्याचा भक्कम आधार आहेत, त्यांच्या स्वास्थ्याचा सर्वांगीण विचार करून हा आधार भरभक्कम करूया!

स्वस्थ अस्थि भव
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७

ऋतु स्पेशल रेसिपी माघ महिना संपायला आलाय आणि त्यासोबत संपता संपता वाढयला लागला आहे – कोरडेपणा! एकीकडे वाढते ऊन आणि वाढता...
17/02/2025

ऋतु स्पेशल रेसिपी

माघ महिना संपायला आलाय आणि त्यासोबत संपता संपता वाढयला लागला आहे – कोरडेपणा! एकीकडे वाढते ऊन आणि वाढता कोरडेपणा – एकमेकाना पूरक असणार्‍या या जोडगोळीमुळे आपल्याला मात्र
घशाला कोरड पडणे, त्वचा ओढल्यासारखी वाटणे, डोळे ओढल्यासारखे वाटणे, पोटर्‍याना घोळे येणे, पाय ओढल्या सारखे वाटणे, थकवा, डोळ्यांवर वारंवार झापड येणे अशी लक्षणे त्रास देऊ लागली आहेत.

त्यातच वसंताच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला, नाकातून पाणी गळणे, डोके जड होणे अशाही गोष्टी आहेतच.
औषध, ऋतुनुसार आहार आपल्याजागी महत्वाची आहेतच, पण त्याच बरोबर काही खास रेसिपी आहारात घेतल्या तर वर वर्णन केलेली लक्षणे पटकन बरी होतात शिवाय चवीत देखील बदल होतो.

आपल्याकडे अगदी सहज मिळणाऱ्या दोन गोष्टी यासाठी आपल्याला लागणार आहेत – बीट आणि कोकम!

साल काढून स्वच्छ धुवून, बिटाचे तुकडे करून, पाणी घालून कुकरमध्ये उकडून घ्या. गार झाल्यावर मिक्सर मधून काढून, त्यात कोकम सरबत तीन ते चार चमचे घाला, त्यात चावीनुसार मीठ, जिरे पावडर आणि अगदीच हवे असल्यास थोडे लाल तिखट घालून एकदा छान उकळी आणा. झाले तुमचे स्वास्थ्य वर्धक सूप तयार.

यात कोकम सरबता ऐवजी जर तुम्हाला कोकम आगळ टाकायचे असेल तर तेही तुम्ही वापरू शकता, फक्त त्यात साखर नंतर घालावी लागेल.
या साध्याशा आणि सोप्या रेसिपीतून तुम्हाला अगणित फायदे मिळतात. कोरडेपणा, थकवा, शोष ताबडतोब कमी होतात.

तहान भागवण्यासाठी शहाळे हा पर्याय असतोच, पण सध्या त्यामुळे कफ वाढण्याची शक्यता जास्त. साधारणत: मार्च अखेरीस शहाळ्याचा वापर करू शकतो. कोकम सरबताने तहान भागेल, उष्णता कमी होईल, पोटात gases धरणार नाहीत, तोंडाला चव येईल, प्रसन्न वाटेल पण त्याच्या जोडीला जेव्हा बिटाचे विशेष गुणधर्म जातील तेव्हा त्यांचा जास्त फायदा होईल.

आता तुम्ही विचाराल की मग बीट – गाजर – टोमॅटो असे सूप नही का चालणार? चालेल की, पण आता या ऋतुला आपल्याला दोन गोष्टी साधायच्या आहेत – उष्णता आणि रुक्षता कमी करणे त्या बीट -कोकम जोडीनेच साध्य होतील.
रक्त कमी असणे किंवा प्लेटलेत घसरणे अशासाठी तर हे उत्तम आहेच, पण Hb व्यवस्थित असूनही निस्तेज त्वचा आणि थकवा असेल तर हे सूप उत्तम काम करते.

तुम्ही बिटाचे मॉडर्न शास्त्रानुसार गुणधर्म पहिले तर त्यात प्रचुर प्रमाणात पोटाशियम, सोडियम जाते जे शरीरातील electrolytes उत्तम ठेवते. शिवाय त्याचे Antioxidant वगैरे गुणधर्म त्याला खास बनवतात.

कितीही उपयोगाचे असले तरी ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा नियम इथेही लागू पडतो.

कुठल्याही ऋतुत, कुणीही हे सूप घेऊच शकते पण ऑक्टोबर हिट म्हणजे शरद ऋतु आणि वसंताची सुरुवात म्हणजे आताचा ऋतु यात आवर्जून सगळ्यांनी प्यावे असे हे सूप.
कृपया लक्षात ठेवा, कुठल्याही प्रकारे काळी मिरी, दालचीनी इत्यादीचा वापर यात करू नका.
ऋतु स्पेशल रेसिपी करून बघा आणि फरक अवश्य कळवा.

शुभ उत्तरायण
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
9764995517

वसंत येता दारी – श्रीखंड तयार असावे घरी सर्दीसाठी श्रीखंड? वैद्य मॅडम बऱ्या आहेत न? रोज ताजे श्रीखंड खायला सांगितल्यावर ...
02/02/2025

वसंत येता दारी – श्रीखंड तयार असावे घरी

सर्दीसाठी श्रीखंड?
वैद्य मॅडम बऱ्या आहेत न?

रोज ताजे श्रीखंड खायला सांगितल्यावर रुग्णाच्या चेहेऱ्यावर मला हे दोन्ही प्रश्न स्पष्ट दिसत होते. पण ते तसेच अनुत्तरित ठेवले कारण पुढच्या दोन दिवसात त्याना आपोआप त्याची प्रचिती आली.

निदान आणि चिकित्सा दोन्ही बाबतीत आयुर्वेद शास्त्र ‘गुणांचा’ विचार प्राधान्याने करते.
चिकित्सा करताना औषधांसोबत अन्नाचा देखील औषध म्हणून केलेला विचार रुग्णाला पटकन बरे करत असतो.

शिशिर ऋतुत निसर्गात आणि शरीरात ‘रुक्ष’गुण वाढलेला असतो. पानं कोरडी होऊन झाडापासून सहज विलग होत पानगळती सुरू होते आणि आपली फक्त त्वचाच नाही यात सगळे शरीर आतून कोरडे कोरडे होत जाते.

यातच सुरू झालेल्या उत्तरायणामुळे उन वाढत जाते आणि शरीरात साचलेला कफ पाझरु लागतो आणि मग नाक वाहू लागते, खोकला सुरू होतो. इतर ऋतुत होणार्‍या सर्दीपेक्षा वसंताच्या आगमनाला सुरू होणारी सर्दी वेगळी असते. या ऋतुत येणारा खोकला देखील वेगळा असतो. सहजतेने कफ सुटत नाही कारण तो रुक्षतेमुळे फुफ्फुसातील वायुकोषाना (alveoli) चिकटून बसतो. रुग्ण खोकून खोकून बेजार होतो. हाच घट्ट चिकटून बसलेला कफ जास्त दिवस टिकून पुढे न्यूमोनियाला कारणीभूत होतो.

औषधांच्या जोडीला, पचायला हलके अन्न आणि रुक्षतेवर उष्णतेवर उत्तम काम करणारे घरी बनवलेले ताजे श्रीखंड अमृतासमान काम करते.

त्याचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात –
“रसाला बृहणी वृष्या स्ंनिग्धा बल्या रुचिप्रदा”

श्रीखंड गुणांनी स्निग्ध आहे , थंड आहे एव्हढेच नाही तर थकवा घालवणारे देखील आहे.
घरी लावलेल्या दहयाला मऊ सूती कापडात बांधून टांगून ठेवावे, त्यातले अनावश्यक पाणी निघून जाऊ द्यावे. हाती आलेल्या ताज्या घट्ट मऊ चक्क्यात प्रमाणात खडीसाखर घालून मनाला प्रसन्न ताजेतवाना करणारा गोडवा वाढवावा. वेलचीचे हिरवेगार आवरण काढून आतल्या दाण्यांचे चूर्ण श्रीखंडात घालून श्रीखंडाचा फक्त स्वादच नाही तर थंडावा देखील वाढवावा.

असे ताजे स्निग्ध मधुर श्रीखंड प्रमाणात खाल्ले असता, शरीरातली उष्णता कमी होते, रुक्षता / कोरडेपणा कमी होऊन घट्ट चिकटलेला कफ अलगद सुटतो, पिकतो आणि सहजतेने बाहेर पडतो. नाक, घसा आणि इतर सायनसेस मध्ये अडकून बसलेल्या कफाने वाढलेली बेचैनी, जडपणा आणि वेदना सगळेच उत्तम कमी होते.

ऐरवी तर तुम्ही दही खायला मज्जाव करता मग श्रीखंड कसे खायला सांगता असा प्रश्न पडणे साहजिक आहे. दुधापासून तुपापर्यंतच्या प्रवासात त्यावर जशा प्रक्रिया घडत जातात तसे त्याचे गुणधर्म बदलत जातात. दहयाचे आणि श्रीखंडाचे गुणधर्म पूर्णत: वेगळे आहे.

श्रीखंड हा वसंत ऋतुचर्येतील महत्वाचा भाग आहे. बनवण्यास अतिशय सोपं! ते पारंपरिक पद्धतीनेच बनवावे. उगाच त्यात फळांचे, टूतीफ्रूटीचे तुकडे टाकून, वेगवेगळे ईसेन्स टाकून त्याचे औषधी गुणधर्म कमी करू नये.

वसंत सुसह्य होण्यासाठी ,
वसंत येता दारी श्रीखंड तयार असावे घरी!

शुभ – स्वस्थ वसंत
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७

सीझन आऊटब्रेकचा उत्तरायण सुरू झाले की सगळ्यात महत्वाचा सीझन सुरू होतो  विविध आजारांच्या साथीचा! सर्दी, खोकला, ताप, ही ने...
26/01/2025

सीझन आऊटब्रेकचा

उत्तरायण सुरू झाले की सगळ्यात महत्वाचा सीझन सुरू होतो विविध आजारांच्या साथीचा!

सर्दी, खोकला, ताप, ही नेहेमीची लक्षणे कधी काळी पटकन बरी व्हायची. पण आताशा लक्षात आले असेल तर 2 ते 3 दिवसात बरा होणारा सर्दी खोकला ताप अंगदुखी हळूहळू दीर्घ काळ टिकतो, खोकला तर महिना महिना ठाण मांडून बसत न्यूमोनियाचे तर कधी bronchitis चे रूप धारण करतोय.

त्यातच पराकोटीचा थकवा, अंगात त्राण नसणे, स्नायुंची शक्ती गेल्यासाखी वाटणे, जुलाब, मळमळ प्रचंड अंगदुखी अशा लक्षणांची सुरुवात झाली आणि सुरू झाला विषय नव्या विषाणूचा आणि नव्या आऊटब्रेकचा.

खरं तर या लक्षणांची जवाबदारी अजून या नव्या विषाणूने घेतलेली नाही. म्हणजे सगळ्यांनाच हे GBS झाले आहे असे नाही.

आजार कुठलाही असो, औषधांच्या जोडीला महत्वाचे काम करत असते, आपली प्रतिकार क्षमता.

आणि या विशिष्ट प्रकारच्या सिंड्रोम मध्ये म्हणे ही प्रतिकार क्षमताच आपल्या विरुद्ध शडडू ठोकून उभी राहते. का? या प्रश्नाला नेमके असे उत्तर नाही. आजवर autoimmune म्हणून बारस झालेल्या अनेकविध आजारांच्या बाबतीत देखील या ‘का’ चे उत्तर मिळालेले नाही.

आपल्याला एक सामान्य रुग्ण म्हणून या संशोधनाच्या खोलात न शिरता ‘बरे व्हायचे’ असते किंवा ‘हे आपल्याला होऊच नये म्हणून काळजी घ्यायची असते’.
करोंनाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. त्यावेळी वापरलेली त्रीसूत्री लंघन, पचन आणि अनुलोमन ही यावेळीच फक्त नाही तर कुठल्याही आउटब्रेकच्या वेळी उपयोगात येणारी आहे.

• सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा – ऋतु बदल आहे. आपण वसंताच्या दिशेने प्रवास करतोय. हळूहळू वाढत जाणारी उष्णता शरीरात फक्त फुफ्फुसातच नाही तर संपूर्ण शरीरात वेळोवेळी साचलेला कफ पातळ करणार आहे. या कफाचा निचरा नीट झाला नाही तर त्यातूनच विविध लक्षणे निर्माण होतात.

• आपल्या मज्जा तंतुंच्या अवती भवती असलेल्या मायलीन शिथ या स्निग्ध आवरणावर होणारे परिणाम हे तुमच्या डिस्टर्ब metabolism चे फलित आहे.

• लक्षात ठेवा – इम्यून अथवा प्रतिकार क्षमता कुठल्याही औषधांनी नाही तर ऋतुनुसार आणि भुकेच्या वेळी घेतलेल्या आहारातूनच येत असते.

या परिस्थितीत स्वत:ची काळजी कशी घ्याल ? त्रीसूत्री अमलात कशी आणाल ?
१) भूक लागल्याशिवाय जेवू नका.
२) संध्याकाळी शक्यतो ७ च्या आत जेवा.
३) ऋतूच्या आधी आलेली द्राक्षे, कलिंगड, टरबूज, आंबे इत्यादि फळे खाऊ नका. खोकला झाला असेल तर कुठलेच फळ खाऊ नका.
४) मासे, दही, उडीद डाळीचे पदार्थ, तसेच मांसाहार, पूर्णपणे टाळा.
५) वाढत्या उन्हात काहीतरी थंड प्यावेसे वाटेल अथवा खावेसे वाटेल, अशा वेळी कोल्डड्रिंक्स, आइस क्रीम, मिल्क शेक, फ्रीजमधले पाणी यांचा मोह टाळा.
६) ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, थकवा, जुलाब, मळमळ अशी लक्षणे सुरू झाल्यावर तुमच्या नेहेमीच्या डॉक्टरांच्या औषधांच्या जोडीला ‘लंघन’ सुरू करा – म्हणजे मऊ भात-वरण अथवा मुगाची मऊ खिचडी एवढ्याच आहारावर रहा.
७) शरीरात साचलेल्या कफाचे किंवा साचलेल्या इतर दोषांचे ‘पचन’ नीट होण्यासाठी आले+ गूळ+ सैन्धव असे मिश्रण नियमित घ्या.
८) रोज पोट साफ होईल याकडे विशेष लक्ष पुरवा .
या अगदी साध्या साध्या गोष्टींनी तुम्ही अगदी स्वस्थ राहू शकता, लक्षणे लवकर आटोक्यात आणू शकता.

‘दुर्घटनासे देर भली’ या चालीवर ‘आजारी पडण्यापेक्षा ऋतुचर्या आणि लंघन बरे’ असे आपण नक्कीच म्हणू शकतो.

स्वस्थ रहा
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
बळवंत आयुर्वेद क्लिनिक

तयारी उत्तरायणाची दक्षिणेकडे मकर वृत्तापर्यन्तची मजल मारून आता सूर्याचा प्रवास पुन्हा उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्ताकडे सु...
18/01/2025

तयारी उत्तरायणाची

दक्षिणेकडे मकर वृत्तापर्यन्तची मजल मारून आता सूर्याचा प्रवास पुन्हा उत्तरेकडे म्हणजे कर्क वृत्ताकडे सुरू झालाय. ही घटना उत्तर गोलार्धवासियांसाठी इतकी महत्वाची आहे की आपण भारतीय ती आनंदाने साजरी करतो, कुठे उत्तरायण म्हणून, कुठे संक्रांत म्हणून, कुठे लोढी, तर कुठे भोगली बिहू तर कुठे पोंगल म्हणून!

आपले सगळेच सण आणि ते साजरा करण्याच्या विशिष्ट पद्धती ‘ऋतु बदलाचे आणि त्यानुसार बदल करण्याचे ज्ञान’ बिंबवण्याची एक अतिशय उत्तम आणि अर्थपूर्ण प्रथा!

उत्तरायण हमी देतो हळूहळू दिवसाचा म्हणजे प्रकाशाचा आणि उष्णतेचा कालावधी वाढत जाण्याची! या दोन्ही गोष्टींवर संपूर्ण जीवसृष्टीचे अस्तित्व अवलंबून असते.

उत्तरायण तीन ऋतु घेऊन येतो - शिशिर – वसंत आणि ग्रीष्म!
या संपूर्ण सहा महिन्याच्या कालावधीला आयुर्वेदात – ‘आदानकाल’ म्हंटलं आहे.
आदानकाल शरीरातून / निसर्गातून सगळं बल काढून घेणारा काल आहे. वसंत आणि ग्रीष्म ऋतूंची ऋतुचर्या त्या त्या वेळी देणार आहेच, पण आता लक्षात ठेवायचे आहे की संपूर्ण उत्तरायणात हळूहळू वाढत जाणारे ऊन बळ कमी करत जाणार. उन्हाची तीक्ष्णता प्रखरता जशी वाढत जाईल तसे कोरडेपणा आणि उष्णता वाढीस लागेल. त्यामुळे इथून पुढे उष्ण खाणे टाळायचे. ज्यामुळे वायु वाढेल असा आहार आणि वागणे दोन्ही प्रयत्नपूर्वक टाळायचे.

बळ मुळातच कमी असणार त्यामुळे यापुढे ‘अर्धशक्त्या’ व्यायाम करायचा.
म्हणजेच २५ सूर्य नमस्कार करण्याची क्षमता असेल तर १२ च करायचे. शरीराला अति प्रमाणात थकवायचे नाही. ऋतूचा परिणाम जाणून न घेता खाण्याचे आणि व्यायामाचे आहे तेच रुटीन सुरू ठेवणे अनेकविध आजारांचे कारण होऊ शकते.

ऋतुचर्या स्वस्थ राहण्यासाठी सर्वोत्तम मार्ग आहे. सध्या उत्तरायणाचा काल सुरू झाला आहे आणि त्यातल्या तिन्ही ऋतूंमध्ये एकच समान गोष्ट लक्षात ठेवायची आहे – शरीराला आणि मनाला उगाचच ताणायचे नाही, आपली शक्ती मुळातच कमी असणार आहे त्यामुळे अती थकवणारी कामे कमी करायची, उष्ण- तीक्ष्ण आणि शरीराला कोरडे करणारा आहार घ्यायचा नाही.

यंदा हेमंत आणि शिशिर दोन्ही ऋतु ढगाळ हवामानामुळे नेहेमीप्रमाणे अनुभवायला मिळालेच नाहीत.
पण पुढे येणारा ‘वसंत’ आपला प्रभाव नक्कीच दाखवणार, त्याची ऋतुचर्या लवकरच तुमच्या भेटीस येईल.
तो पर्यन्त ‘काळाचा महिमा’ लक्षात घेता त्यानुसार बदल करत स्वस्थ रहा.

शुभ उत्तरायण
वैद्य ज्योत्स्ना पेठकर
९७६४९९५५१७

भटाला दिली ओसरी – बॅक्टीरिया आणि वायरस  प्रत्येक जीवाला जगण्यासाठी ‘अनुकूल’ गोष्टींची गरज असते. अन्न, हवा, पाणी, निवारा ...
08/01/2025

भटाला दिली ओसरी – बॅक्टीरिया आणि वायरस

प्रत्येक जीवाला जगण्यासाठी ‘अनुकूल’ गोष्टींची गरज असते. अन्न, हवा, पाणी, निवारा अशा सगळ्या गोष्टींच्या अनुकूलतेत सजीव जगतात आणि स्वत:ची प्रजाती वाढवत असतात. सजीवांच्या अनेक जाती प्रजाती आहेत. काही महाकाय तर काही अत्यंत सूक्ष्म ! प्रत्येक जीव स्वत:च्या अस्तित्वासाठी धडपडत असतो. त्याला वायरस आणि बॅक्टीरिया इत्यादि सूक्ष्मजीव अपवाद कसे असतील?

ते देखील टिकून राहण्यासाठी, वाढण्यासाठी ‘अनुकूलता’ शोधत असतात.
सगळ्या जीवांत प्रगत असलेला ‘मानव’ या सूक्ष्मजीवाना टिकवून ठेवण्यासाठी त्यांच्या वाढीसाठी ‘नकळत पणे’ सतत प्रयत्नशील असतो.

अजाणता थारा मिळालेले हे पाहुणे शरीरात वाढीस लागले की बाहेरुन आलेल्यांशी दोन हात करताना आपली प्रतिकार क्षमता उत्तम असेल तर ठीक नाहीतर आपण ‘मस्त आजारी’ पडतो. मग त्यांचा नायनाट करण्यासाठी विविध anti तत्वाच्या औषधांचा ( antibiotic, antiviral )मारा सुरू होतो.

त्यांच्यापैकी काही जीव मरतात तर काही या औषधाना पुरून उरण्यासाठी स्वत:त आवश्यक ते जनुकीय बदल करत अस्तित्व टिकवून ठेवतात. त्यांना संपवण्यासाठी जितकी advance औषधे येतात तितकेच ते स्वत:त जनुकीय बदल करत जास्त advance होत आहेत.

या सगळ्या ‘मारमारीत’ आपले स्वास्थ्य मात्र पणाला लागत असते.

आयुष्य 180 डिग्रीत फिरवणार्‍या कोरोंनाचा अनुभव अगदी ताजा आहे अजून आणि त्यात पुन: पुन: हा वायरस, तो नवा वेरीयंट अशा बातम्या अस्वस्थता वाढवत असतात.

कुठलाही नवा वेरीयंट येवो अथवा बारसे झालेला नवा वायरस, आपल्याला एकच कराचे आहे की ‘त्यांच्या वाढीसाठी अनुकूल वातावरण’ त्याना द्यायचे नाही. इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण बाहेरील स्वच्छतेबाबत जितके जागरूक असतो, तितकेच आतील स्वच्छतेबद्दल असायला हवे आहे.

काय असते त्यांच्यासाठी अनुकूल?

भूक लागलेली नसताना, वेळी अवेळी काहीही खाण्याने झालेले अपचन, आपल्या फक्त फुफ्फुसातच नव्हे तर पूर्ण शरीरात साचून राहिलेला कफ, पोट नीट साफ न झाल्याने साचून राहिलेला मल, विविध कारणांनी वाढलेली उष्णता या गोष्टी त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असतात. अत्यंत साध्या साध्या वाटणार्‍या या गोष्टी आजारपणाची मुळे असतात.

त्यांना थारा द्यायचा नसेल तर भूक ओळखून, ऋतुनुसार आहार घ्या, पोट नीट आणि रोज साफ होतेय न लक्ष द्या,

गेल्या काही दिवसात हवामानात पदोपदी बदल होत आहेत. हिवाळा असूनही काही दिवस ढगाळ वातावरण होते, तर काही दिवस ऑक्टोबर हिट प्रमाणे उष्णता होती आणि आता अचानक पुनः एकाएकी थंडी वाढली आहे.

या बदलणाऱ्या हवामानाशी जुळवून घेताना अनेक जणांना जाणवले असेल की ‘भूक नीट लागत नाहीये’, थोडा कफ जाणवतो आहे, घसा दुखतोय किंवा सर्दी होतेय – घरगुती अथवा डॉक्टरांनी सुचवलेली औषध आपण घेत असालच, पण यासोबत महत्वाची तीन सूत्रे पाळली तर कुठल्याही इतर तक्रारी न वाढता आपण पटकन बरे व्हाल!

1) लंघन – भूक लागल्याशिवाय काहीही खाऊ नका, भूक लागली की मऊ भात+ आमटी/ भात, मुगाची खिचडी असा साधा सोपा आहार घ्या.
2) पाचन – शरीरात साचलेल्या दोषांचे सहजपणे पचन होण्यासाठी – आल्याचा रस+ गूळ + चिमूटभर सैंधव हे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या.
3) अनुलोमन – पोट रोजच्या रोज साफ राहील याची काळजी घ्या. त्यासाठी वैद्यांना विचारून योग्य औषध घ्या.

रोज आपल्या शरीरात अनेको सूक्ष्मजीव शिरत असतात, या ‘बिनबुलाये’ पाहुण्यांना निपटण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता उत्तम असणे गरजेचे आहे, जी आपल्याला भुकेचे - खाण्याचे नियम पाळल्यानेच मिळते.

अन्यथा भटाला ओसरी दिल्यावर तो चांगलेच हातपाय पसरत complications वाढवतो.

स्वस्थ रहा
शुभं भवतु

वैद्य ज्योत्स्ना पेठकर

9764995517

Perfect hair is not a myth! परवा कुठेतरी वाचलं  – ‘life may not be perfect but your hair can be’आणि ते अगदीच पटलं. आपल्य...
04/01/2025

Perfect hair is not a myth!

परवा कुठेतरी वाचलं – ‘life may not be perfect but your hair can be’आणि ते अगदीच पटलं.

आपल्या सौंदर्यात भर घालणारे केस, आपल्या व्यक्तिमत्वाची खास ओळख असलेले आपले केस. ते दाट, मऊ, लांब, चमकणारे आणि bouncy असावेत अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते.

पण, कितीही महागडी तेलं, शॅम्पू, conditioners लावा, परिस्थिती जैसे थे. बरं पार्लर मधून महागड्या treatments घेऊन पालटलेले केसांचे रुपडे महिना दोन महिन्यात पुन: मूळ पदावर येते.

वरवर केले जाणारे उपचार शाश्वत नसतात. केसांचे खरे स्वास्थ्य त्याना तुम्ही अन्नातून काय पुरवताय यावर अवलंबून असते. केसांच्या मुळाशी तेल जिरवणे जितके महत्वाचे आहे तितकेच महत्वाचे आहे त्याच्या मुळाना आतून पोषण मिळणे.

त्यांच्या पोषणात महत्वाचा घटक असतो – ‘स्ंनिग्धता’!

तूप, तेल, लोणी, नारळाचे दूध यांच्या व्यवस्थित वापराने शरीर स्निग्ध राहण्यास मदत होत असते.
या पदार्थांना आहारातून वगळणे, पोषण मूल्ये नसलेल्या पॅकेट बंद आहाराचे नियमित सेवन करणे, वारंवार होणारी जागरण, विविध शॅम्पू आणि केसांचे डाय यांचे दुष्परिणाम, वारंवार होणारा ‘मलावष्टंभ’ या सगळ्यामुळे शरीरात ‘कोरडेपणा’ वाढीस लागतो आणि पर्यायाने केसांची मुळे कोरडी होऊन तुटू लागतात. कंगवा फिरवला की खाली जमिनीवर केसांचा खच पडतो आणि हे बघून आपण ‘खचतो’!

आपले केस आणि आपल्या डोक्यावरची त्वचा यांच्यात ‘फेविकॉलचा’ मजबूत बॉन्ड मिळवणे तसे कठीण नाही. पोटातून उत्तम आहार - केसांच्या मुळाशी उत्तम औषधी तेलाचे पोषण आणि या दोन्ही गोष्टींचे सातत्य असेल तर – Life may not be perfect but your hair can be’ definitely!

Keep your hair on

वैद्य ज्योत्स्ना पेठकर

Book your appointment for healthy hair - 9764995517


साबुदाणा –  आहे चविष्ट जरी साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा खीर, साबुदाणा थालीपीठ इत्यादि पदार्थ खाण्यासाठी आपल्या...
29/12/2024

साबुदाणा – आहे चविष्ट जरी

साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाणा खीर, साबुदाणा थालीपीठ इत्यादि पदार्थ खाण्यासाठी आपल्याला उपवास या निमित्ताची गरज नसते. शिवाय ‘उपवासा’ चा आणि साबुदाण्याचा अर्थार्थी संबंध देखील नसतो.

जिभेला अत्यंत तृप्त करणारा पदार्थ – साबुदाणा !

पण जे काही जिभेला तृप्त करते ते शरीरासाठी उत्तम असतेच असे नाही.
पचायला अत्यंत जड, शरीरात ‘जडपणा’ निर्माण करणाऱ्या, कफं आणि पित्ताची आम्लता वाढवणाऱ्या अशा साबुदाण्याला दही टाकून खाणे म्हणजे शरीराला अधिकाधिक सक्त मजुरीची शिक्षा करण्यासारखे आहे.

ऋतु, वय, पचनशक्ती अशा कुठल्याही गोष्टींचा विचार न करता नियमित खाल्ले जाणारे असे पदार्थ अनेक आजारपणांची ‘समजून न येणारी नांदी’ असतात.
उपवासाची मूळ संकल्पना कधीच ‘लोप’ पावली आहे. चतुर्थी, एकादशी, नवरात्री, अशा नियमित उपवसांच्या जोडीला विविध देवांचे विविध वारांचे उपवास. उपवास करणार्‍या व्यक्तिसोबत घरातल्या प्रत्येकाचा ‘साबुदाण्याचा फराळ’’! बहुतांशी व्रत वैकल्ये पावसाळ्याच्या दरम्यान (चातुर्मास) येतात आणि त्या दरम्यान साबुदाणा आहारात असेल तर आम्लपित्त उत्तमरीत्या वाढीस लागते.

अशक्तपणात ‘साबूदाण्याची खीर’ दिली जाते कारण साबुदाणा साखरेचा म्हणजेच ऊर्जेचा उत्तम स्त्रोत आहे.
पण वारंवार खाल्ला जाणारा साबुदाणा ‘रकतातली न पचलेली साखर’ वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतो.

लहान मुलांचा अत्यंत आवडणारा पदार्थ असतो साबुदाणा! पण त्यांचे कफाचे वय लक्षात घेता त्यांच्या आहारात जर वरचेवर साबुदाणा असेल तर त्यांच्या शरीरात कफाचे प्रमाण अजाणता वाढवले जात आहे.

साबुदाण्याचे सगळेच पदार्थ चविष्ट असतात पण जिभेला तृप्त करताना लक्षात ठेवा की,
पावसाळ्यात,
ढगाळ हवामान असताना,
भूक नसताना,
कफ आणि आम्लपित्त असताना
दही टाकून,
रात्री,
साबुदाणा खाणे टाळा, स्वास्थ्य राखा!

वैद्य ज्योत्स्ना पेठकर
976499557

  कॅलेंडर प्रमाणे अधिकृतरीत्या हिवाळा सुरू झालेला असला तरी सध्या गेले 2 ते 3 दिवस वातावरण पावसाळी आहे. ढगाळ कुंद हवा सुर...
27/12/2024



कॅलेंडर प्रमाणे अधिकृतरीत्या हिवाळा सुरू झालेला असला तरी सध्या गेले 2 ते 3 दिवस वातावरण पावसाळी आहे. ढगाळ कुंद हवा सुरू झाली आणि लगेचच आजारपणं सुरू झाली आहेत.
अजून काही दिवस हेच वातावरण असणार आहे. आजारी पडण्यास अतिशया उत्तम असे वातावरण असले तरी तुम्ही आजारपण नक्कीच टाळू शकता -

1) भूक लागल्याशिवाय काही खाऊ नका
2) रात्रीचा आहार संध्याकाळी सातच्या आधी आणि अत्यंत हलका आहार घ्या.
( मुगाची खिचडी/ दलिया/ वरण भात) .
3) थंडी वाजून आली अथवा बारीक कणकण जाणवू लागली की आल्याचा रस + गूळ + सैंधव मीठ असे मिश्रण गरम पाण्यासोबत घ्या.
4) फळे / icecream/ कोल्डड्रिंक्स टाळा .

लंघन ही सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे - तुम्ही बरेही पटकन होता आणि औषधांचा खर्च वाचतो.

काळजी घ्या.

वैद्य ज्योत्स्ना पेठकर
097649 95517

आवळा – एक परिपूर्ण रसायन बाजारातून हिंडत असताना रसरशीत, हिरवट – पिवळसर आवळ्यांनी तुम्हाला खुणावले नसेल तरच नवल. त्याला ब...
26/12/2024

आवळा – एक परिपूर्ण रसायन

बाजारातून हिंडत असताना रसरशीत, हिरवट – पिवळसर आवळ्यांनी तुम्हाला खुणावले नसेल तरच नवल. त्याला बघताक्षणी त्याची आंबट – गोड – तुरट चव जीभेवर रेंगाळायला लागते.

कधी नुसत्या फोडी करून तिखट मीठ लावून चाखले जाते तर कधी मोरवळा बनवून त्याची गोडी वाढवली जाते. वैद्य मंडळी कधी चवनप्राश तर कधी केश्य तेलं बनवण्यात गुंग होतात.

पित्तासाठी मोरवळा इतका मर्यादित आवळ्याचा उपयोग नाही.

मायग्रेन असो अथवा मधुमेह, खोकला असो अथवा हृदयरोग, अशक्तपणा घालवायचा असो अथवा केसांचे – त्वचेचे सौंदर्य वाढवायचे असो, सगळ्यासाठीच आवळा अतिशय उत्तम!

या दिवसात म्हणजे हिवाळ्यात शरीर उष्णता आत कोंडून ठेवतो. शरीरात वाढलेली उष्णता वेगवेगळी लक्षणे / आजारपणं निर्माण करते. अशा वेळी ताजा आवळा अतिशय उत्तमरीत्या उष्णता कमी करतो.

या दिवसात येणारा आवळा आपण मोरवळा स्वरुपात किंवा आवळा सुपारी स्वरुपात, चवनप्राश स्वरुपात, चूर्ण स्वरुपात preserve करून ठेवू शकतो आणि वर्षभर त्याचे औषधी फायदे मिळवू शकतो.

आवळ्याकडे बघताना या गुणधर्मांसोबतच अजून एक महत्वाचा आणि आपल्याला चटकन समजेल असा गुणधर्म म्हणजे ‘it is great / rich source of vitamin C’! इतर कुठल्याही सिट्रस ( आंबट) फळाच्या तुलनेत 20 % जास्त विटामीन C आवळ्यात असते. शिवाय ते शरीरात पटकन शोषले जाते.

Immune function, iron absorption, antioxidant अशा विविध कामांसाठी लागणारे विटामीन C आपल्याला आवळ्यातून सहजतेने मिळते.

कधी कधी आश्चर्य वाटते की विटामीन – मिनरल ही परिभाषा ठाऊक नसलेल्या आपल्या पूर्वजांनी किती युक्तीने याचे गुणधर्म ओळखून चवनप्राश सारखा कल्प बनवला असेल. जो फुफ्फुसानाच नव्हे तर शरीरातील सातही धातुना उत्तम बळ देत आपली ‘प्रतिकार क्षमता’ वाढवत असतो, म्हणूनच तर त्याला धात्री असे पर्यायी नाव आहे.

धात्रीचे हे गुणधर्म आपल्यावर बिंबवण्यासाठीच फाल्गुन शुक्ल एकादशीला आपण आमलकी एकादशी साजरी करतो. भगवान विष्णुंना तुळशी सोबत आवळा देखील वाहतो. निसर्ग आणि स्वास्थ्याशी निगडीत आपल्या सगळ्याच चालीरीती अतिशय समृद्ध आहेत.

तर मग आता निसर्गाला धन्यवाद म्हणत स्वास्थ्यासाठी – चवनप्राश, ताजा आवळा खायला सुरुवात करूया!

आणि हो कुठलीही गोष्ट औषधी असली तरी ‘ योजक: तत्र दुर्लभ:” म्हणजे ते औषध म्हणून वापरायचे तंत्र ज्याला माहिती आहे तो दुर्लभ असतो, त्यासाठी वैद्य होणे गरजेचे असते. त्यामुळे कुठल्याही आजारांवर आवळ्याचा वापर करायचा असेल तर तो वैद्यांच्या सल्ल्यानेच करावा.

वैद्य ज्योत्स्ना पेठकर
9764995517


तळ टीप - चवनप्राश हा अत्यंत शास्त्र शुद्ध कल्प आहे – सोना चांदी, vanila, मॅंगो, चॉक्लेट इत्यादि फ्लेवरचे चवनप्राश हे त्याचे बाजारीकरण आहे, त्यात शुद्धता नाही.

आइसक्रीम – थंड की उष्ण लहान थोर, गरीब श्रीमंत सगळ्यांचे अत्यंत आवडते असे आइसक्रीम! जे जे काही जिभेला तृप्त करणारे असते त...
22/12/2024

आइसक्रीम – थंड की उष्ण

लहान थोर, गरीब श्रीमंत सगळ्यांचे अत्यंत आवडते असे आइसक्रीम!
जे जे काही जिभेला तृप्त करणारे असते त्याचे वैद्य मंडळींना वावडे असते असा आम्हा वैद्य मंडळींचा लौकिक.
पण काय आहे न पदार्थाची चव, रंग, त्याचे स्वरूप आणि त्यातील nutritional values या पलीकडे आम्हाला दिसतात ते गुण.

पचायला जड की हलके, शरीरात उष्णता वाढवणार की कमी करणार, कोरडेपणा निर्माण करणार की शरीर स्निग्ध करणार असे सगळे parameters आमच्याकडून लावले जातात. कारण प्रत्येक पदार्थाला ही पण बाजू असते आणि ती माहीत नसल्यामुळे आपले आवडते पदार्थ खाऊन आपल्याला त्रासच जास्त होतो.

खाताना स्पर्शाला गार असले तरी आइसक्रीम शरीरात गेल्यावर मात्र उष्णता निर्माण करते.

आइसक्रीमचे तापमान -14 ते -18 degree Celsius दरम्यान असते. इतकी गार गोष्ट जिभेवर ठेवताच शरीराच्या आणि त्याच्या तापमानात असलेली तफावत शरीराला लगेचच कळते. आणि मग शरीराची धडपड सुरू होते आपले सामान्य तापमान 36 च्या आसपास टिकवण्याची.

यासाठी पचना दरम्यान आइसक्रीम मधील fats आणि साखर यातून जास्तीत जास्त उष्णता निर्माण केली जाते ( diet induced thermogenesis). म्हणजेच तुम्ही उन्हाळ्यात किंवा ऑक्टोबर हीट मध्ये थंड वाटण्यासाठी जर आईसक्रीम खाताय तर तुम्ही actually शरीरात उष्णता निर्माण करताय! हीच उष्णता मग अनेकविध आजरांची नांदी ठरते, पण लॅब मध्ये प्रत्यक्ष दिसत नसल्यामुळे आपण आजारपणाची कारणं रीपोर्ट मध्ये शोधत बसतो.

आणि हिवाळ्यात? तेव्हा तर शरीरात उष्णता गरजेचीच असते , त्यामुळे आइसक्रीमने जिभेला तृप्त करण्यासाठी हा ऋतु उत्तम!
पण ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हा नियम सर्वत्र लागू पडतो त्यामुळे पण पचायला
जड आणि उष्ण असे आइसक्रीम, कोल्ड ड्रिंक्स प्रमाणात खाल्लेलेच बरे.

ऋतुप्रमाणे आहार असणे जसे महत्वाचे असते तसेच ‘ जे जिभेला छान वाटते ते शरीराला योग्यच असेल असे नाही’ हे देखील लक्षात ठेवूयात!

वैद्य ज्योत्स्न पेठकर
9764995517

द्राक्षे आणि कलिंगड – सीझन आहे का?असं म्हंटलं जातं – समय से पहले और भाग्य से अधिक कैसी को कुछ नाही मिलता.पण काळावर मात क...
20/12/2024

द्राक्षे आणि कलिंगड – सीझन आहे का?

असं म्हंटलं जातं – समय से पहले और भाग्य से अधिक कैसी को कुछ नाही मिलता.

पण काळावर मात करण्याच्या प्रयत्नात माणसाने ‘समय से पहले कैसे नही मिलेगा?’ म्हणत निसर्ग चक्रात कमालीची ढवळाढवळ केलेली आहे.

आपले शरीर निसर्गाशी स्वभावत: ट्यून झालेले असते. निसर्गात होणार्‍या बदलांचा शरीरावर परिणाम होतो आणि त्याला balance करण्यासाठीची सोय देखील निसर्गच करतो.

उदाहरणार्थ उन्हाळ्यात शरीर आतून थंड राहण्याच्या प्रयत्नात घामाद्वारे उष्णता बाहेर टाकत असते, त्यावेळी शरीरात पाण्याची कमतरता भासते. ती भरून काढण्यासाठी वारंवार तहान लागते. अशा वेळी केवळ तहान भागण्यासाठी फक्त नव्हे तर शरीरातील आवश्यक घटक भरून काढण्यासाठी निसर्ग क्रमाक्रमाने रसाळ आणि मधुर फळे देत असतो.

वसंतापासून ग्रीष्मापर्यंत जस जसा उकाडा वाढत जातो आणि तहान देखील वाढत जाते त्याच क्रमाने निसर्गात द्राक्षे, कालिंगड , टरबूज आणि आंबे येतात. ही फळं याच क्रमाने खायला हवीत.

आता सुरू आहे हिवाळा. घाम येत नाही, पाण्याची कमतरता नसते, तहान त्या प्रमाणात लागत नाही, त्यामुळे या ऋतुत कलिंगड खाऊन गरज नसताना पाणी पुरवठा का कारयचा? हाच नियम द्राक्षाना देखील.

वसंत चांगला सुरू झाला झाल्याशिवाय द्राक्षे खाऊ नयेत. ( म्हणजे महा शिवरात्री नंतर).

मुलांच्या बाबतीत तर हे नियम आवर्जून पाळावेत. त्यांचे कफाचेच वय असते आणि त्यात कफ वाढीस लागला तर तो पटकन कमी होत नाही आणि मग प्रकरण अस्थमापर्यंत जाऊन पोहोचते.

बाजारात आले म्हणजे ते निसर्गाने दिलेत असे नाही, ते वेळेच्या आधी पिकवले गेले आहेत.

फळच तर आहे सीझन असो नसो खाल्ले म्हणून काय बिघडते? अशी मखलाशी कुणी केली, तर खूप काही बिघडते हे लक्षात ठेवा.

मागणी शिवाय पुरवठा कायम घातकच! या अतिरिक्त पाण्याचे कफात रूपांतर होते. हा कफ फक्त फुफ्फुसातच नाही तर शरीरात सगळीकडे साचून पुढे वसंतात त्रास देऊ शकतो. आणि मग त्यावेळी गोष्टी diagnose होत नाही, लक्षणे पटकन कमी होत नाहीत.

‘काल – अर्थ आणि कर्म या तिघांचा समतोल ढळला तर फक्त वैयक्तिक आजारपण येत नाही तर पूर्ण समाजाच्या स्वास्थ्याचा तोल ढळतो’!

ऋतूच्या आधी येणारी / आणली जाणारी फळं हा काळाचा विपर्यास आहे, तोल ढळणे आहे. आणि तशीच फळे मग आपल्याला मिळतात.

म्हणून ‘समय से पहले’ ही relative टर्म आहे हे लक्षात घेऊन त्या त्या ऋतुत येणारी फळे त्या त्या ऋतुतच खावीत.

ता. क. – सध्या आवळे, बोरं,अंजीर, गोड मोसंबी, सीताफळ, सफरचंद, डाळिंब अशा फळांचा ऋतु आहे. भूक लागेल तेव्हा आवर्जून खायला हवीत.

वैद्य ज्योत्स्ना पेठकर
9764995517
# AuthenticAyurved

Address

Balawant Ayurved 30 Bhagavti Madhav Bag KOthrud
Pune
411038

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Authentic Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Share on Facebook Share on Twitter Share on LinkedIn
Share on Pinterest Share on Reddit Share via Email
Share on WhatsApp Share on Instagram Share on Telegram