28/09/2025
*मैत्री च्या तऱ्हा*
© वृषाली आठले
प्रत्येकाच्या मैत्रीत एखादा नाका, एखादा कट्टा, किंवा एखादा अड्डा असतोच. एका विशिष्ट वयात तो जितका खास असतो तितका तो नंतर राहतोच असं नाही. ह्याची कारणं अनेक असतात. सामान्य कारणं अशी की लहानपणीचे मित्र किंवा तरुणपणातले मित्र आपापल्या उद्योग, व्यवसाय, करिअर मध्ये स्वतःला सिद्ध करत असतात, मग प्रत्येकाचा "तो" किंवा "ती" आयुष्यात येते, आपापल्या संसारात ते रमतात. जबाबदाऱ्या वाढतात, अनेक अडचणींना तोंड देत असतात. वगैरे वगैरे.. पण हे सगळं अगदी स्वाभाविक आहे. तरीही ह्या नाक्याची मैत्री घट्ट रहाते. अगदी सगळा नाका किंवा कट्टा अशा घट्ट मैत्रीत बांधला जातो असं नाही. पण तरीही एकमेकाला भेटून फ्रेश वाटण्या इतपत ही मैत्री नक्की असते. जिथे भेटलो की तेच तेच विषय, तेच तेच विनोद असूनही मन हलकं होतं, पुन्हा लवकर भेटू असं ठरवलं जातं. जे प्रत्यक्षात मात्र कधीही होत नाही. पूर्वी वाटायचं की ह्याची कारणं अगदी प्रॅक्टिकल म्हणता येतील अशीच असणार. पण कालांतराने जशी भेटण्या मध्ये खूप gap पडायला लागली तसं जाणवलं की आपण समजत होतो तसं नाहीये. कदाचीत वारंवार भेटावं अशी फार शी ईच्छा नसावी ,किंवा ईच्छा असली तरी लोक म्हणतात तसं त्यांना भेटायला जमत नसावं, किंवा सहज भेट झालीच तर ठीक पण भेट नाहीच झाली तरी फार काही फरक पडत नसावा..आता ह्यातलं नेमकं काय हे ज्याचा तोच जाणे.
बऱ्याच काळाने गणपती निमित्त भेट झाली तेव्हा एका मित्राजवळ न आलेल्या दुसऱ्या मित्राची चौकशी करता फार मजेशीर उत्तर मिळालं...ते असं...की "अगं तो मजेत आहे, तुझ्या आयुष्यात त्याचा जेवढा सहवास होता तेवढा पूर्ण झाला असं समजायचं" भेटलेल्या मित्राने इतक्या सहजपणे हे म्हटलं की मी उडालेच.. हे विधान माझ्यासाठी मजेशीर वगैरे न राहता फार गंभीर तत्त्वज्ञान असल्यासारखं आरपार शिरलं माझ्या मनांत. आणि मग जाणवलं मानसशास्त्र आणि तत्वज्ञान कोळून प्यायलेली बाई आहे मी, पण मी इतक्या सहज हे सत्य पचवू शकत नाही. कारण मी अती जास्त सकारात्मक आहे. वास्तवातल्या गोष्टींकडे सतत सकारात्मक विचारांनी पहात असते मी. आणि ते तसंच असावं ह्यासाठी धडपडते. पण अलीकडे लक्षात आलं आहे की ही धडपड एकतर्फी आहे. मग आपोआप withdrawal घडतं. मनातून नाही, पण कृती नी अलिप्तता येते.
आमच्या मित्रांचे किस्से काही कमी नाहीयेत. आमच्या नाक्याची एक खास (पण माझ्या शब्दशः डोक्यात जाणारी) खासियत म्हणजे ग्रूप मधे अत्यंत आलतुफलतू पोस्ट वर react होतील, पण आपण जर वैयक्तिक नावं घेऊन (@) msg लिहिला तर वाचल्या नंतर सुद्धा अजिबात वाचलंच नाही असं दुर्लक्ष करतील. कोण वागतं असं??? असा प्रश्न मला गेली अनेक वर्ष भेडसावयचा....पण अलीकडे मी ते पचवलं आहे की हे फक्त आणि फक्त आपल्याच "जवळच्या" मैत्रीत घडतं. मला खरंच प्रश्न पडतो की जर काहीही संवाद च नसेल तर ही मैत्री जवळची असं आपण का म्हणतो? क्वचित कधीतरी भेटल्यानंतर थोडा वेळ चक्कलस केली की मैत्री जवळची होते का?? मग ह्या प्रश्नाचं उत्तर माझं मलाच मिळालं की मी च जास्त अपेक्षा ठेवत होते.. कदाचीत मैत्री ही अशीच असावी अनेकांसाठी. त्यात मी बसत नव्हते. आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीत ठीक ठाक बसत नाही ना, तेव्हा आपल्यामध्येच प्रोब्लेम आहे म्हणावं आणि गप्प बसावं. कारण जेव्हा उरलेल्या समस्त मित्र मैत्रिणी ना हे खटकत नाही तेव्हा उघड असतं की आपण च 'Odd man Out' आहोत. आपण म्हणजे मी.
तसं नाही नाही म्हणत म्हणत आम्ही मित्रांनी काही छोट्या trips आणि मोठे tours एकत्र केले..खरच खूप धमाल केली. पण त्यात पण गंमत म्हणजे एखाद्या मित्राला प्रत्यक्ष ट्रिप ला जाण्यापेक्षा ट्रिप ठरवण्यासाठी meeting म्हणून भेटण्यात आणि चर्चा करण्यात जास्त इंटरेस्ट.. एकाला काय तर ठरत आलेली ट्रिप cancel करण्यातच जास्त इंटरेस्ट.. एखादा ह्यातलं काहीही कधीही आपल्या साठी नाहीच आहे असं समजून वरून ते तुम्हालाच कसं समजत नाही म्हणून हा तुमचाच कसा प्रोब्लेम आहे हे तुम्हालाच जाणवून देणारा...एखादा सगळ्यात सहभागी होईल पण ग्रूप वर मात्र कधीही न बोलणारा.. एखादा काहीही कारण नसताना उगीचच सगळ्यांचं विचित्र वागणं सांभाळून घेणं ही जणू त्याचीच जबाबदारी असल्या सारखं बोलणारा, मात्र स्वतः ही फार seriously कधीही काहीही न वाचणारा.. एखादा त्याला ग्रूप मधे add कराल तितक्या वेळा ग्रुप सोडणारा.. एखादा फक्त जसं काही दुसऱ्यांना good morning करणं एवढीच त्याच्यावर कुणीतरी जबाबदारी टाकल्या सारखा..इतकं की त्याच्या आगे मागे काय लिहिलंय ह्याचा सुतराम संबंध त्याच्याशी नाहीच असं वागणारा..एखादा कुणी कुठलीही पोस्ट करो राजकीय किंवा विनोदी.. सगळ्या पोस्ट ला आवर्जून अंगठा दाखवणारा, लाईक करणारा..एखादा एखाद्याच msg ला "मी अंगठा दाखवला होता" अशा defensive mode वर असणारा...तर असे आमचे मित्र... अर्थात ह्या एखाद्याच्या यादीत एखादा आणि एखादी दोन्ही आले बरं का.
कुणाचाही वाढदिवस असला की आवर्जून आठवणीने msgs असतात ग्रूप वर. जसे सगळे वयाने मोठे झालो तसे वाढदिवसाचं कारण काढून भेटलो, खास करून प्रत्येकाच्या ५० व्या वाढदिवशी नक्की भेटलो. आता एक एक करत आमची सगळ्यांची "साठी..बुद्धी नाठी" होणार हे उघड च आहे. ५० शी साजरी करण्याचा उत्साह ६० मध्ये राहतो की नाही कळेल च. असो...
मैत्री मध्ये boundaries असतातच. किंवा काही बाबतीत त्या असाव्याच. पण त्या कुठल्या बाबतीत असाव्या, आणि किती असाव्या हे मात्र प्रत्येकावर अवलंबून असतं. नेमका तिथे फरक पडतो. मला स्वतःला अभिप्रेत असलेला मोकळेपणा मला समोरून दिसला नाही की मी अस्वस्थ होते. किंवा मैत्रीत खूप जास्त boundaries असतील, आणि त्या स्पष्ट न सांगता वागण्यात दिसत असतील तर मग नेमकी मैत्री आहे म्हणजे काय आहे असे प्रश्न मला पडतात. निदान जे असेल ते खुलेपणाने सांगता येतं आणि जरूर सांगावं अशी जागा म्हणजे माझ्यासाठी मैत्री..अर्थात मी कोण? प्रत्येकासाठी ही गोष्ट वेगळी असूच शकते. पण निदान ते पोचतं करावं अशी सरळ साधी अपेक्षा असते. आणि जेव्हा हे घडत नाही तेव्हा अंतर वाढतं. कुणाला ते कळतं कुणाला कळत नाही. पण अंतर वाढतं नक्की. ह्यावर ह्यातल्याच "एखाद्याचं " म्हणणं असतं की मुळात मैत्रीत इतकं काही seriously घ्यायचंच नसतं. आणि काहीच seriously न घेणं मला फार झेपत नाही. तर अशी ही आमची मैत्री..म्हटली तर निखळ, स्वच्छ, कुठलंही राजकारण न शिरलेली, घरच्यांनाही सामावून घेणारी मैत्री. पण पारदर्शकता आणि भावनिक गरज ह्या महत्वाच्या दोन गोष्टींचा अभाव असलेली. आणि म्हणून आपण एकमेकांच्या जवळ आहोत असं भासवणारी पण अंतर असलेली. हे अंतर काहींना जाणवत असेल ही कदाचित, पण खटकत नसेल. किंवा अनेकांची भावनिक गरज च कमी असेल. ही शक्यता जास्त आहे. आपल्या प्रत्येकाला आपल्या अनेक मित्र मैत्रिणींच्या बाबतीत असे अनेक अनुभव येतात. कुणी त्याची मोकळेपणी वाच्यता करतं, कुणी करत ही नाही. कुणी मैत्रीत मोकळं बोलणं झालंच पाहिजे अशा आग्रही मतांचं असतं तर कुणी बोलणं प्रशस्त नाही अशा विचाराचं असतं. एक मात्र नक्की की मैत्री हे नातं पूर्णतः निस्वार्थी असावं. तर अशी ही आमची संवादाविना असलेली मैत्री निस्वार्थीपणा मुळे टिकून असावी. थोडक्यात ह्या मैत्री च्या बाबतीत ठेविले अनंते तैसेचि रहावे.. हे धोरण ठेऊन मी माझ्या चित्ती समाधान बाळगून आहे!
© वृषाली आठले