18/06/2020
माझ्या प्रिय मित्रांनो,
(बाबा, काका, मामा, दादा, आजोबा, समस्त पुरूष मंडळींना हा लेख समर्पित.. पण म्हणून स्त्रियांनी वाचायचा नाही असं नाही हा.. स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हणून जे लिहीलंय ते स्त्रियांनाही लागू पडेलच)
सांगा कसं जगायचं...?
कण्हत कण्हत की गाणं म्हणत...?
तुम्हीच ठरवा..
पाडगावकरांची ही कविता म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा बूस्टर डोसच जणू. सातत्याने गुणगुणली की मग मन स्वतःहूनच ठरवतं... गाणं म्हणत जगायचं..🙂
I wish.. सुशांत सिंग राजपूतला ही कविता माहिती असती. 😔
आपला नसूनही आपलंच कोणी तरी गेलंय इतका आपलेपणा निदान मला तरी कुठल्याच अभिनेत्या बद्दल नाही वाटला.. पण छिछोरे चित्रपट दोन वेळा पाहिला तेव्हा पासून त्याला hats off केलं होतं जो प्रत्यक्ष जीवनात back off करून अचानक निघूनही गेला.
व पु काळेंनी आपल्या पुस्तकात म्हटलंय... I think Partner मधे..
"एकाकीपण वेगळं, एकांत वेगळा.
परिसराचं मौन म्हणजे एकांत आणि
परिवारात असताना पोरकं वाटणं हे एकाकीपण.
एकाकी पडलो तर "मनसोक्त रडावं."
अश्रू म्हणजे दुबळेपणा नव्हे.
पावसाळी ढग जसे बरसल्यावर हलके होतात
आणि दिसेनासे होतात तसाच माणूसही हलका होतो,
आकाशाजवळ पोहचतो..
असंच कोणतंतरी दुःख पार केल्यावर तुकाराम ‘तू का आकाशाएवढा’ असं लिहून गेला असेल...!!"
परिच्छेद मोठा आहे पण कायमचा काळजावर कोरला गेलाय.. आणि हसता हसता रडणंही शिकवून गेलाय ..
आज अष्टावधानी स्त्री बद्दल नव्हे तर भावनिक पुरूषांबद्दल लिहीणार आहे. कारण आपल्या समाजात बऱ्याचदा रडणं आणि तेही जाहीरपणे..चारचौघांत.. आणि तेही पुरुषमाणसाने... म्हणजे उपहासाचा विषय होतो. रडणं म्हणजे कमीपणाचं, emotionally weak असल्याचं लक्षण वगैरे.. अश्रूंचा बांध फुटला म्हणजे sympathy गोळा करायची नाटकं किंवा अरे तो बाई सारखा ढसा ढसा रडला..अशी दूषणं.
पण तुम्हाला गंमत माहितीये का.. हे अश्रू.. आनंदाचे म्हणा किंवा दुःखाचे, हे मोत्याचे दाणे खऱ्या अर्थाने तुमच्या भावनांचा निचरा करत असतात. In short emotional overload होऊ न देता मनावरचा आणि सर्वार्थाने हृदयावरचा भार हलका करत असतात.
आमचे सर म्हणायचे.. Heart attack चं प्रमाण बहुतांशी पुरूषांमधे आढळतं आणि cancer स्त्रीयांमध्ये. मन मोकळं करता येत नाही अशांना हा आजार आपलं लक्ष्य बनवतो. अहो साहजिकच आहे ना.. एवढंस मन तुमचं. काय नि किती धरून ठेवणार ते..
जबाबदारीचा डोंगर, अपेक्षांचं ओझं, आर्थिक गणिताचा ससेमिरा, performance चं pressure, बायका मुलांच्या स्वप्नासाठी स्वतः शिडी आणि कुटुंबाची नाव हेलकावू नये म्हणुन भक्कम शिड होऊन सातत्याने फक्त झटत रहायचं.. आणि इतकं सगळं सांभाळून जर कधी मनासारखं नाही घडलं तर चक्क रडायचं सुद्धा नाही? How Mean ??
पुरुषाच्या वाट्याला आलेलं हे दुःख cover up करायला मग अधिकच straight forward, strict, dashing पर्यायाने कधी Rude, फटकळपणे, वाईटपणा घेत जगायचं. उदा: लहानपणापासून "तू मुलगा आहेस, रडूबाई नाही हा व्हायचं मुलीसारखं", थोडं मोठं झाल्यावर "अरे मुलींना माचो मॅनच आवडतो भाई rough and tough... लग्न झाल्यावर बायकोचे सर्वेसर्वा तुम्हीच म्हणून अजून मन घट्ट करायचं तर मुलं झाल्यावर "बाबांना तू हे केलेलं आवडणार नाही..ते ओरडतील.." असं ऐकत विनाकारण विलन होऊन जगायचं. इतकं की सरतेशेवटी "माझ्या मना बन दगड " असं म्हणावं ही लागत नाही ते आधीच पत्थरदिल झालेलं असतं..
त्या उलट स्त्री.. ओक्साबोक्षी रडते, आनंदात दुःखात अश्रूचे पाट वाहतात.. पण मैत्रीणीशी फोनवर तासंतास गप्पा मारते तेव्हा फोन ठेवतानाही..अगं बाई हे सांगायचंच राहिलं म्हणत अजून मन मोकळं करतंच बसते. अर्थात काही अपवादही असतात. पुरुषांसारख्याच धीरगंभीर. त्याचं ही hormonal कारण आहे.
पण सांगायचा मुद्दा असा.. Stress कुणाला चुकलाय? शरीरासाठी व्यायाम, पोटासाठी पथ्य, आत्म्या साठी ध्यान आणि मनासाठी मन मोकळं करणं हा सर्व आजारांवरचा रामबाण उपाय!
तुमच्या आयुष्यात अशी अत्यंत जवळची व्यक्ती असेल जिला सगळं सांगितल्या शिवाय तुमचं पानही हलत नसेल तर तुम्ही भाग्यवान.. पण अशी व्यक्ती आयुष्यात नसेल तर?
उठसूठ सगळ्यांना सगळं सांगितलं तर त्याचं गाॅसिप होणार.. मानवी स्वभावाच आहे तो, मोजक्याच मित्र मैत्रिणींना सांगितलं तर सारे घडीचे सोबती, आज आहेत उद्या नाहीत, जोडीदाराला सांगितलं तर आपला ताण त्याच्या वर जाईल, आणि मुला बाळांकडे वेळ नाही.. मग मन मोकळं कसं करायचं...
सोप्पय.. स्वतः स्वतःशी रूबरू व्हायचं!!
तुका म्हणे होय मनासी संवाद । आपुलाची वाद आपणासी...
मनमोकळं हसा, धाय मोकलून रडा, आणि सर्वात महत्वाचं Self Talk जाणा. खोल अंतर्मनात डोकावून पहा. तुम्हाला कळेल फावल्या वेळात तुमचं मन गुजगोष्टी करत असतं... काय कमावलं, काय गमावलं.. मन लावून ऐका ते.. कसलं दुःख मला सलतंय, काय केल्याने मला आनंद मिळतो, काय करायचं बाकी आहे, कुठली गोष्ट खटकतेय, कुठली चिंता सतावतेय, काय केलं तर हा गुंता सुटेल, मनच उत्तरं देत जाईल.
जेव्हा मनाकडून उत्तरं मिळणार नाही तेव्हा जरा मनाला ब्रेक द्या. ट्रॅक चेंज करा. मन दुसरीकडे वळवा. छंद जोपासा. गप्पा मारा, फोन लावा, गाणी ऐका म्हणा, वाचा, झाडं लावा, घर लावा... काही तरी रूटीनच्या वेगळं करा. आणि मन जरा ताजंतवानं झालं की नव्याने विचार मंथन करा. मनाला उभारी देताना तुमचं वय किती ही असलं तरी मन चिरतरूण कसं राहील याची काळजी तुम्हालाच घ्यायचीय.
कारण मनात आलं म्हणून टोकाचा निर्णय घेतला.. मनात आलं तर त्यातून माघारही मनच घेऊ शकतं.
सुदैवाने गेल्या अकरा वर्षांत अशा हजारो मनांमधे डोकवायची संधी डाॅक्टर म्हणून counselling करताना मला मिळाली . आणि मला ' दुःख पाहता जवापडे.. सुख पर्वता एवढे' असं काहीसं वाटू लागलं. जे स्वतःला मदत करू शकत नव्हते त्यांना मी मदत केली. मी विसरूनही गेले होते पण त्यांनी स्वतःहून आठवण करून दिली की ती मदत आज त्यांच्या जगण्याचं कारण बनून गेलीय... कधी कधी शब्दांचं मलमच मनाच्या जखमेवर अलगद फुंकर घालतं.
Moral of the story:- हसा, रडा, पडा, घडा, छंद जपा, मनात डोकावून बघा, निःसंकोच professional मदत मागा पण कुठल्याही परिस्थितीत जगा.
Don't quit... Fight Forever !!!!
PS: Father's day जवळ येतोय. तुमचा Godfather तुम्हीच हे नेहमी लक्षात ठेवा 🙂