30/05/2020
गेल्या 30 वर्षांपासून विलेपार्ले येथे वैद्यकीय चिकित्सा करणारे *वैद्य श्री.राजीव कानिटकर* यांनी कोरोनापासून वाचण्यासाठी किंवा व्याधिक्षमता वाढवण्यासाठी सुचवलेले काही उपाय –
१. सर्वांनी दिवसभर कोमटच पाणी प्यावे. तापवून निवालेले नको.
२. अर्धा चमचा हळद घालून सकाळी एकदा अर्धा ते एक कप कोमट दूध प्यावे.
३. आलं, पातीचा चहा, धने, जेष्ठमध, तुळशीची पानं, काळी मिरी, अळशी, पुदिना, लवंग या पैकी जे उपलब्ध असेल त्याचा उकळवलेला काढा (दीड कप पाण्याचा आटवून एक कप शिल्लक ठेवणे) गाळून तो गरम असतानाच पिणे.
४. हळद+सुंठ पावडर+गूळ (प्रत्येकी २५ ग्रॅम) एकत्र करून, त्यात घरचे किंवा गाईचे तुप घालून त्याच्या वाटाण्यापेक्षा थोड्या मोठ्या गोळ्या करून, रोज एक एक गोळी दिवसातून दोन वेळा चघळून खाऊन वर गरम पाणी प्यावे.
५. ज्यांना पित्ताचा त्रास होत नाही, त्यांनी सकाळी नाश्त्यानंतर हळद आणि दुधाबरोबर एक चमचा च्यवनप्राश घ्यावा. (अर्कशाळा सातारा किंवा धूतपापेश्वरचा’ ’स्वामला’ च्यवनप्राश चांगला आहे)
६. एक ग्लास गरम पाण्यात पाव चमचा हळद व पाव चमचा मीठ घालून दिवसातून दोन वेळा गुळण्या कराव्यात.
७. दिवसातून दोन वेळा (सकाळी लवकर व रात्री झोपताना) गरम पाण्याची वाफ घ्यावी.
८. सूर्यनमस्कार, प्राणायाम, योगासने, चालणे यापैकी आपल्याला जमेल त्याप्रमाणे, प्रत्येकाने किमान २० मिनिटे तरी व्यायाम करावा.
९. औषधांमध्ये सेप्टिलिन गोळी (हिमालया) व संशमनी वटी (म्हणजेच गुडुची घनवटी) (ही कोणत्याही कंपनीची चालेल.)या दोन्हीची एकेक गोळी दिवसातून दोन वेळा गरम पाण्यातून घ्यावी.
१०. १२ वर्षांखालील मुलांना फक्त सेप्टिलिन सिरप दोनदोन चमचे दुप्पट कोमट पाण्यात मिसळून द्यावे. १२ वर्षांखालील मुलांना च्यवनप्राश न देता चरक कंपनी चे मेनॉल सिरप १-१ चमचा दिवसातून दोन वेळा कोमट पाणी किंवा कोमट दूधाबरोबर द्यावे.
११. ज्या लहान मोठ्यांना वारंवार सर्दी,कफ,खोकला याचा त्रास होत असेल त्यांनी सीतोपलादी चूर्ण व जेष्ठमध चूर्ण समभाग करून, (लहानांनी अर्धा चमचा व मोठ्यांनी एक सपाट चमचा) दुप्पट प्रमाणात अडुळसा सिरपबरोबर दिवसातून दोनदा चाटण करून घ्यावे. वर गरम पाणी प्यावे.
१२. व्याधीक्षमता/प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपलब्ध असलेली ही काही औषधे आपापल्या वैंद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत – अभिनव कंपनीचे इम्युजेन (सिरप/गोळ्या), लामार कंपनीच्या ऑप्टिलाईफ कॅपसूल्स, हिमालयाच्या शतावरी/अश्वगंधा/गुडूची कॅपसूल्स
*दैनंदिन जीवनामध्ये पाळावयाचे नियम*
१. दिवसातून दोन वेळा साबणाने स्वच्छ आंघोळ करा. बाहेरून घरी आल्यावर चपला,बूट शक्यतो घराबाहेर काढूनच आत या. आल्याबरोबर मास्कच्या इलॅस्टिकला धरूनच मास्क काढावा व नंतर दोन्ही हात साबणाने स्वच्छ धुवून मगच इतर वस्तूंना स्पर्श करावा. केव्हाही बाहेरून घरी आल्यावर अंगावरचे सर्व कपडे गरम पाण्यात भिजवून धुवायला टाका व आंघोळ करून मगच घरात वावरा.
२. दिवसातून चार वेळा तरी किंवा बाहेरून घरी आल्यावर प्रत्येक वेळी, बाहेरून आणलेली प्रत्येक गोष्ट जागेवर ठेवून नंतर हात साबणाने स्वच्छ धुवा.
३. घराबाहेर सॅनिटायझर ठिक आहे पण घरात शक्यतो साबणाचाच वापर करा. भाज्या किंवा फळे सॅनिटायझरनी धुवू नका.
४. घरातही शिंकताना / खोकताना तोंडावर टिश्यू पेपर ठेवा व तो लगेच कचऱ्याच्या डब्यात टाका.
५. फ्रिजमधले किंवा बर्फाचे सर्व प्रकारचे थंड पदार्थ, दही, चिंच, लोणचं, सॉस, श्रीखंड, व्हिनेगर, कच्चे टोमॅटो यासारख्या आंबट वस्तू, तळलेले सर्व पदार्थ या सर्वांमुळे सर्दी, खोकला, घसा खवखवणे हे विकार होऊ शकतात, त्यामुळे यांचे सेवन सध्या शक्यतो वर्ज्यच करावे.
६. शारीरिक अंतर पाळणे, मास्कशिवाय घराबाहेर न पडणे या गोष्टी सर्वांना माहितच आहेत पण घराबाहेर पडल्यावर या गोष्टींचे तंतोतंत पालन करा. एकदा मास्क लावल्यावर त्याला सारखा सारखा हात लावू नका.
७. दिवसातून एकदा इ-पेपर वाचा किंवा फक्त सह्याद्रीच्या (नॅशनल न्युज) बातम्या ऐका. बाकी दिवसभर बातम्या सोडून टिव्हीवरचा कोणताही कार्यक्रम बघा.
८. सर्दी, कफ, खोकला, ताप या लक्षणांनी घाबरून जाऊ नका. आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहा. पल्स ऑक्सिमीटर वर ऑक्सिजन पातळी ९२ च्या खाली जात नाही ना एवढे बघता आले तर बघा. डॉक्टरांच्या औषधांबरोबरच वर सांगितलेले घरगुती उपायही चालू ठेवा.
९. ही लक्षणं दिसताच स्वत:ला घरातील इतर माणसांपासून शक्यतोवर दूर ठेवण्याचा प्रयत्न करा पण घाबरून जाऊ नका. ही लक्षणं नसलेल्या अनेक व्यक्तीसुद्धा करोना पॉझिटिव्ह आहेत किंवा करोना नसतानाही केवळ भीतीपोटी अनेकजण हॉस्पिटलमध्ये जाऊन आलेले आहेत.
१०. मधुमेह, रक्तदाब, दमा हे विकार असणारे, तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी आपली नेहमीची औषधे नियमितपणे घेणे आणि घराबाहेर न पडणे हेच महत्त्वाचे.
*शेवटचे पण महत्त्वाचे*
आज corona pandemic पेक्षा ही लोकांना fear pandemic ने जास्त ग्रासले आहे.
एका विशिष्ट पातळीपुढे डॉक्टर्स, हॉस्पिटल्स, नातेवाईक किंवा प्रशासन आपली मदत करू शकणार नाही हे लक्षात असू द्यावे. यासाठी आहार-विहार-आचाराचे नियम, नियमित व्यायाम आणि मानसिक संयम यांच्या सहाय्याने आपले आरोग्य हे ज्याचे त्याने सांभाळायचे आहे.
पुढील काही महिन्यात आपल्या सर्वांनाच करोनाची बाधा होण्याची शक्यता आहे. कदाचित आपल्यापैकी काही जणांना तो आत्ताही झालेला असेल, किंवा होऊन गेलाही असेल. आपण घाबरतोय ते फक्त या विकारावर अजून खात्रीलायक उपाय किंवा औषध सापडलेलं नाही म्हणून! आपण तर खाऊन पिऊन सुखी आहोत. परंतु रस्त्यावरचे भिकारी, सिग्नलवर दिसणारी कुपोषित मुलं, रस्त्याकडेने, झोपड्यांमध्ये राहणारी असंख्य माणसं यांची प्रतिकारशक्ती आपल्यापेक्षा जास्त आहे का? आणि तसं असेल तर मृतांमध्ये त्यांचा आकडा कितीतरी जास्त असायला हवा होता, नाही का?
*म्हणूनच सांगतो, काळजी घ्या... काळजी करू नका!*