25/08/2025
*Missing tile syndrome/अपूर्णतेची रूखरूख*
🙁☹️☹️☹️
आपल्याला टक्कल पडल्यावर आजुबाजूला अचानक सगळे केसाळ दिसायला लागतात.... दुचाकीवरून जाताना चारचाकी हवी वाटते....गाडी छोटी असल्यास मोठी असावी वाटते....रेल्वेत प्रवास करणाऱ्याला विमान प्रवासाची ओढ वाटते....फ्लॅट मध्ये राहत असल्यास बंगला घ्यावासा वाटतो... जाड्यांना पातळ व्हावे वाटते तर पतल्यांना जाडे...खोटे दागिने घालणाऱ्यांना सोने खुणावते तर सोन्यावल्यांना हिरे...नोकरदारांना व्यवसाय भारी वाटतो तर व्यावसायिकांना नोकरी...कुणाला अजून थोडी गोरी बायको हवी असते तर कुणाला अजून उंच नवरा....जवळ पर्यटनास जाणाऱ्यांना देशाटन करायचंय तर देशाटन करणाऱ्यांना जग खुणावतंय...लखपतींना करोडपती व्हायचंय आणि करोडपतींना अब्जाधीश...नगरसेवकाला आमदार बनायचंय तर आमदाराला मंत्री...मंत्र्याला मुख्यमंत्री बनायचंय तर मुख्यमंत्र्याला पंतप्रधान....अंतराळात गेलेल्याला चंद्रावर जायचंय तर चंद्रावर गेलेल्याला मंगळावर... मित्रांनो ही यादी न संपणारी आहे....
सांगण्याचा मतितार्थ असा की, आजच्या आधुनिक समाजात बरेच लोक त्यांच्याकडे असणाऱ्या गोष्टींबद्दल समाधानी नाहीत....कारण जी गोष्ट आजमितीला त्यांच्याकडे नाही तीच त्यांना रात्रं दिवस खुणावते आहे आणि ती गोष्ट आपल्याकडे या क्षणी नसल्याची सलही मनात राहते... मित्रांनो हाच आहे *"missing tile syndrome" किंवा हीच आहे "अपूर्णतेची रुखरुख..."*
*अनोलॉजी समजू*
समजा आपण एखाद्या भव्य हॉटेलच्या उद्घाटनास जाता...त्याची दर्शनी भिंत अगदी रंगी बेरंगी टाईल्स ने सजवली असेल पण नेमकी गडबडीत भिंतीवरील एखादी टाइल लावायची राहिली तर आपले लक्ष पूर्ण झालेल्या कामाकडे न जाता नेमके जिथे टाइल लावायची राहिली आहे तिथेच जाईल...आणि इतर टाईल्स चांगल्या लावल्या असतील तरीही प्रत्येकालाच काम अपूर्ण असल्याबद्दल रूखरूख वाटेल...
आपले जीवनही अगदी असेच आहे...अगदी रंगीबेरंगी टाईल्सने भरलेले...यात आपल्याकडे काही टाईल्स आहेत तर काही नाहीत...माझ्याकडे असणाऱ्या टाईल्स आणि दुसऱ्याकडे असणाऱ्या टाईल्स अगदी भिन्न असतील किंवा माझ्यापेक्षा दुसऱ्याकडे काही टाईल्स जास्तही असतील....जसे की कुणाकडे सुखी कुटुंब असेल, भौतिक सुखं असतील पण स्वतः साठी वेळ नसेल... कुणाकडे बक्कळ पैसा असेल पण आरोग्य नसेल...कुणाकडे सामाजिक प्रतिष्ठा असली तरी कुटुंबात मान सन्मान नसेल...कुणाकडे बक्कळ वेळ असेल पण खायला अन्न नसेल आणि हीच असेल आपली दुखरी नस...आपली "missing tile" जी आपल्याला आपल्याकडे असणाऱ्या गोष्टींचा आनंद घेण्यापासून परावृत्त करते...भलेही ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण काबाड कष्ट केले असतील ती हासिल झाल्यावर मात्र आपण उपरे होतो आणि नवीन मिसिंग टाइलच्या मागे धावायला लागतो...ती मिसिंग टाइल मिळवली की दुसरी नवीन मिसिंग टाइल दिसते मग पुन्हा पळापळ सुरू आणि दुर्दैवाने ही पळापळ माणूस मेल्यावरच थांबते ...आणि जमवलेल्या साऱ्या टाईल्सही इथेच सोडाव्या लागतात....
*असं का होतं*
उत्क्रांतीच्या प्रक्रियेत मानवी मेंदूत अनेक बदल घडले. रानटी अवस्थेत असताना जगण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी रोजच जीवघेणा संघर्ष करावा लागे. *"जगणे हे आपल्याकडे "काय आहे" यापेक्षा आपल्याकडे "काय नाही" यावर जास्त अवलंबून होते..."*
जसे की "कळपात शिकार न" केल्यास आपणच शिकार होण्याची शक्यता अधिक म्हणून कळप तयार झाले.... "कळपात हत्यारं नसल्यास" शिकार मिळण्याची शक्यता कमी...आणि शिकार न मिळाल्यास जगण्याची शक्यता कमी म्हणून *पूर्ण उत्क्रांती प्रक्रियाच या आपल्याकडे "नसलेल्या" गोष्टींचा निरंतर शोध घेणे आहे* जेणे करून मी आणि माझा वंश जगावा...
या Missing tiles शोधण्याच्या भावनेनेच मानवाने आपल्या अनेक मर्यादांचे परीघ अजून दूर लोटले...यशाची अनेक शिखरं विद्यानाच्या मदतीनं काबीज केली...पण यात एक गोची झाली..
उत्क्रांत होत होत हीच जनुकं जगण्यासाठी गरजेची असल्यानं टिकली....आधुनिक समाजात आज कुणालाही शिकारीला जावं लागत नाही...कुणालाही स्वतः शिकार होण्याची भीती नाही.....पण आजही आपल्याकडे असलेल्या गोष्टींपेक्षा आपल्याकडे नसलेल्या गोष्टीबद्दल आजही मेंदू अधिक सजग असतो...कारण उत्क्रांती प्रक्रियेत मेंदूवर हे पक्क बिंबलयं की *अभाव अथवा उणीव ही आपली जगण्याची शक्यता कमी करू शकते म्हणून अभाव शोधा आणि ते पूर्ण करा म्हणजे जगण्याची शक्यता वाढेल*...आणि हेच समूळ मानव जातीचे survival instict बनले...
म्हणूनच मला सर्वोत्तम बनायचंय...
माझी टाईल्स ची भिंत ही इतर कोणाहीपेक्षा बहरलेली असावी...
ही आपली इतरांशी तुलना करण्याची सवय ही देखील एक survival instinct आहे... कारण मी सर्वोत्तम बनलो नाही तर माझा निभाव लागू शकणार नाही हे मेंदूवर वर्षानुवर्षे कोरल गेलंय.... हा विचार आहे आपल्या reptilian ब्रेनचा जुन्या मेंदूचा ...ज्याचे विचार अगदी सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे आहेत...ज्याला जगायचंय...पोट भरायचंय आणि आपली जनुकं पुढं पाठवायचीयेत....त्याला केवळ आजचा विचार आहे....भलेही त्यासाठी दुसऱ्याला पाण्यात पाहावं लागेल भलेही त्यासाठी कुणाचा जीव घ्यावा लागेल...पण मी सुरक्षित हवा...
मित्रांनो ...हा मेंदूचा भाग आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी जोखीम घेऊ देत नाही...असणाऱ्या गोष्टीचं सुख अनुभवू देत नाही...कायम तो तुम्हाला अपूर्णतेची अनुभूती देतो जेणे करून तुम्ही जास्तीत जास्त अपूर्णता पूर्ण कराल आणि तुमची जगण्याची शक्यता वाढवाल...भलेही तुमची missing tiles पूर्ण करण्यात दमछाक होवो..भलेही तुम्ही दिवस रात्र काम करो...हा तुमच्याकडून अजून मागेल...अगदी मरेपर्यंत...
*Missing tiles ची चर्चा आज का*
Social media च्या जमान्यात आज आपल्या आयुष्यात होणारी प्रत्येक "चांगली" गोष्ट प्रत्येकाला हमखास दाखवयाची आहे कारण ते माझे survival instinct आहे... प्रत्येक गोष्ट शेअर केली जाते..घर घेतलं...गाडी घेतली....ट्रिप केली ....हॉटेलमध्ये गेले की टाक फोटो....असा समाजातील बरा वाईट असा कित्तेक गिगा बाईट/टेराबाईट डेटा मेंदू कळत नकळत रोज प्रोसेस करत असतो...
याचा परिपाक म्हणजे मग मनात तुलना सुरू होते...माझ्याकडे असणाऱ्या गोष्टींपेक्षा इतरांकडे असणाऱ्या गोष्टींचा मला हेवा वाटतो.....माझ्या missing tiles मला प्रकर्षाने दिसायला लागतात...
आणि मग जीवघेणी स्पर्धा सुरू होते. याचा अतिरेक झाल्यास नैराश्य वाढतं, तणाव येतो, आरोग्य बिघडतं आणि सगळं असूनदेखील तुम्ही सदैव दुःखी राहता...
Social media च्या जमान्यात कधी नव्हे एव्हढे मानसिक प्रॉब्लेम वाढलेत... याचं महत्वाचं कारण आहे की माणूस म्हणून आपण प्रगल्भ तर झालोय पण मेंदूचा एक हळवा कोपरा अजूनही रानटी आहे आणि हा कोपरा आपल्या आधुनिक मेंदूपेक्षा जुना असल्याने त्याचीच चलती होते... जसं की आपल्या घरात ज्येष्ठांचं आपल्याला एकावचं लागतं अगदी तसंच नव्या मेंदूला हा जुना मेंदू दाबून टाकतो...
*यापासून कसे वाचावे*
*१. कृतज्ञता भाव जोपासणे*
कुणालाही सगळ्या गोष्टी कधीच भेटू शकत नाहीत...म्हणून आपल्याकडे नसणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा आपल्याकडे काय आहे याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा...
रोज आपल्या आयुष्यात काय काय चांगलं चालू आहे हे तुमच्या मनाला सांगा. चांगले आरोग्य असेल, जगण्यासाठी हाती पैसा असेल, डोक्यावर छत असेल, चांगला जोडीदार असेल कृतज्ञ व्हा...
कृतज्ञताभावात राहिल्यावर नक्कीच सकारात्मक गोष्टी रोज घडतील...आयुष्य सुखकर वाटेल....
*२. तुलना टाळा*
प्रत्येकाला आयुष्याचा वेगळा पेपर मिळाला आहे...कुणी आज आयुष्याच्या वर्गात पहिलीत आहे तर कुणी दहावीत...या दोघांचीही तुलना होऊ शकत नाही...म्हणून आपल्या वेगाने चला...दुसऱ्याला कॉपी करू नका...दुसऱ्यांच्या असणाऱ्या टाईल्स मध्ये आपले missing शोधू नका...
*३. वस्तुस्थितीला धरून स्वप्न रंजन करा*
कितीही फुगला तरी बेडकाचा बैल होऊ शकत नाही....बैल औत ओढेल पण बेडकासारखी पाण्यात बुडी घेऊ शकणार नाही...निसर्गात बेडकाला त्याचे स्थान आहे आणि बैलाला त्याचे....बैलाने बेडूक होऊ नये किंवा बेडकाने बैल...
असंच समाजात प्रत्येक माणूस विशेष आहे आणि समाजाला अशा प्रत्येक विशेष माणसाची गरज आहे कुणीही टाकाऊ नाही..म्हणून स्वतःचे महत्व ओळखा...
*४. "परिपूर्ण आयुष्य" नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही...*
आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी या अगदी नियमाने आणि टप्प्या-टप्प्याने घडाव्यात अशी आपली अपेक्षा असली तरी *आयुष्य हे बहुतांशी वेळा उश्रुंखल, अनिश्चित आणि नियमबाह्य गोष्टी पुढ्यात देते...*
म्हणून परिपूर्ण आयुष्यामागे दमछाक होईपर्यंत धावू नका....
आयुष्याची खरी मजा ही त्याच्या अपूर्णतेत आहे...झुंजून उत्तरं शोधण्यात जी मजा आहे ती रेडीमेड उत्तर कॉपी करून लिहिण्यात नाही...
*४. सुख ही मनाची अवस्था आहे..सुख ही भावना आहे...सुख हे अंतिम सत्य नाही...*
चिरकाल सुख कुठल्याही बाह्य गोष्टीवर नव्हे तर आतून निर्माण होते... म्हणून *स्वतःच्या जवळ जा*...बाह्यजगातील गोष्टींच्या मागे लागताना आज आपण स्वतःपासून खूप दूर गेलो आहोत...स्वतःला शोधलतं तरचं जग सापडेल...
*ढोबळ मानाने जगातील प्रत्येक गोष्ट "अर्थहीन" आहे .....त्यास अर्थ केवळ तुम्ही आणि मी दिला आहे...ज्याचे या ब्रह्मांडाला काही घेणे देणे नाही..आणि आपण दिलेल्या काही चुकीच्या अर्थांनी अनेक गोष्टींची आपण वाट लावली आहे*
म्हणून मस्त रहा...तुलना करू नका...दुसऱ्याला कॉपी करू नका...तुम्ही जसे आहात तसे निसर्गाला प्रिय आहात...आपल्या मिसिंग टाईल्स मोजण्यापेक्षा आपल्या भरलेल्या टाइल्स बघा...
तुमचे आयुष्य अनमोल आहे आणि तुम्हीही अनमोल आहात...
आनंद सर्वांनाच प्रिय आहे..
म्हणून आयुष्य कुढत कुढत जगण्यापेक्षा गाणी म्हणत जगले तर उत्तम नाही का...??
*डॉ प्रदीप इंगळे*
*स्री आरोग्य, दुर्बिण शस्त्रक्रिया व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ*
*अहिल्यानगर*
🙏🏻🙏🏻