12/10/2020
आज 12 ऑक्टोबर जागतिक संधिवात दिन म्हणून पाळला जातो.
Happy म्हणावं , सेलिब्रेशन करावं असं या दिवसात काहीही नाही.
सर्व काही उपाय करूनही न जाणाऱ्या वेदनेचा दिवस आहे हा.
जगभर कोट्यवधी रुग्ण विविध प्रकारच्या संधिवातजन्य लक्षणांनी जर्जर अवस्थेत जगत आहेत. असंख्य वेगवेगळी औषधे , मलमे ,यंत्रसामग्री इ. वापरून सुद्धा
`त्राहिमाम् 'अवस्था त्यांच्या नशिबी आलेली आहे.
मनुष्याने अनेक क्षेत्रात डोळे दिपून टाकेल एवढी उत्तुंग अशी प्रगती करूनसुद्धा वेदनानिर्मूलन अजून तरी दृष्टिक्षेपात नाही . असे होण्याला,उपाय न सापडण्याला सुद्धा कारण आहे.
गणितातील प्रमेय सोडवताना सुरुवातीलाच एक गृहितक धरले जाते .पुढे अपेक्षित उत्तर आले तरच ते गृहीतक बरोबर होते असे समजतात . बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल असा काहीसा प्रकार. त्याचप्रमाणे वर्षानुवर्ष चिकित्सा घेऊन सुद्धा जर गुडघे बदलावे लागत असतील किंवा पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रियाच करावी लागत असेल तर यामागील प्रचलित गृहीतक नक्कीच बरोबर नाही. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होत नसतील तर संधिवात होण्यामागची दिली जाणारी कारणे व सुरू असलेली चिकित्सा यामध्ये नक्कीच चुका आहेत .उत्तर मिळत नसलेलीच समस्या मोठी वाटू लागते. अजून मोठी होत जाते.
* संधीवात म्हणजे आहे तरी काय? -
संधिवात( arthritis ) हा लॅटिन शब्द आहे निदान नाही.
लॅटिनमध्ये artho = joint
its= inflammation
inflammation म्हणजेच सांध्यांवर सूज येणे, लाल होणे ,गरम स्पर्श जाणवणे ,दुःख उत्पन्न होणे , हलवता न येणे हा लक्षणसमुच्चय होय.
म्हणजेच बोलीभाषेत रुग्णांनी वर्णन केलेलेच त्याला किचकट शब्दात पुनरुक्ती करून सांगितल्या सारखे नाही का ?
सूज ,वेदना इ. ही सर्व लक्षणे आहेत, कारणे नाहीत. इथे आपण लक्षणांना कारण समजण्याची गल्लत केलेली आहे. जोपर्यंत आपण कारणांवर काम करत नाही तोपर्यंत लक्षणे वारंवार परत येतच राहणार.
वेदना ही शरीराला उपयोगी असते.ती त्या अवयवाकडे लक्ष द्यायला भाग पाडते.बरं होण्याची पहिली पायरी तीच आहे.
मग नक्की तिथे झाले तरी काय आहे?-
( आकृती 1) मानवी शरीर हे अभियांत्रिकी व स्थापत्य यांचे सुरेख उदाहरण आहे .प्रत्येक हाडाचा आकार, प्रमाण, उंचवटे ,खोलगट भाग ,स्नायूंची ,अस्थीबंधांची रचना इत्यादी सर्व तसेच असण्याला कारण आहे .
सांध्यांमधील हाडांचे एक दुसऱ्याशी अनेक कोनांमधून सामंजस्य असते .
एकाच वेळी तिथे हालचाली मधील मोकळेपणा(flexibility& range of movement) असतो व सोबत भक्कमपणा (strength & stability) सुद्धा .
आपले शरीरवजन सतत हाडांमार्फत जमिनीकडे स्थलांतरित होत असते.
वरील आकृती मधील डाव्या बाजूचा गुडघा नॉर्मल आहे तर उजव्या बाजूचा संधीवाताचा आहे. दोन अस्थीमधील अंतर नॉर्मल 'A' इतके असते .हेच रुग्णांमध्ये कमी होऊन 'a ' इतके होताना दिसते. म्हणजेच ही दोन हाडे एकमेकांच्या जवळ आलेली आहेत.
इथे जवळ येण्याने प्रेम नाही तर घर्षण निर्माण होते. या घर्षणातून इजा होत जाते व inflammation ची ती पाच लक्षणे उत्पन्न होतात .आलेली वेदना ही अस्थीबंधनांना अजून आक्रसून टाकते.
Pain brings more stiffness,
Stiffness brings more pain.
त्यामुळे अजून घर्षण असे दुष्टचक्र सुरूच राहते. इथे गुडघ्यातील कोन बदलणे हे कारण आहे तर उरलेली सर्व लक्षणे परिणामस्वरूप आहेत .
म्हणूनच लक्षणांवर दिली जाणारी औषधे तात्पुरती मलमपट्टी ठरतात.
गुढघ्यातील बिघडलेला कोन पुनःस्थापित करण्यासाठी ठराविक स्नायूंचा अगदी योग्य, विशेष पद्धतीने व्यायाम केला तरच आराम मिळतो व दुखणे थांबते.
आधी झालेली हानी भरून काढण्यासाठी आपले शरीर सक्षम आहे .
अतिशय थोड्या रुग्णांमध्ये जंतूसंसर्ग किंवा Gout हे कारण असते . त्यांना औषधे आधी घ्यावीच लागतात .
आता संधिवात होण्याची खरी कारणे पाहू-
आपले वैयक्तिक कारण शोधणे इथे अपेक्षित आहे.
वैयक्तिक कारण शोधून ते सुधारल्यास लवकर फायदा होतो.
1)काम करतानाची चुकीची शरीरस्थिती (wrong working postures) -:
हे सर्वात महत्त्वाचे व दुर्लक्षित कारण आहे .उठणे ,उभे राहणे, कॉम्प्युटर वापरणे इत्यादी कामे चुकीच्या पद्धतीने केल्यास शरीरावर पडणारा दाब बदलतो.
आकृती 2 पहा .
उदा. दोन्ही पाय जवळ ठेवून उभे राहिल्यास एका पायांमधून जास्ती वजन जमिनीकडे जाते, मग त्याच बाजूचा गुडघा ,खुबा, टाच दुखतात .
उपाय = योग्य शरीरस्थिती शिकणे व त्या वापरणे.बिघाड कमी होतो.
2) वाढलेले वजन- : जेवढे वजन जास्ती तेवढाच सांध्यांवर पडणारा दाब जास्ती व होणारी हानी सुद्धा !
एक मजली घरावर अजून दोन मजले चढवल्यानंतर पाया खचणार नाही तर काय ?
उपाय -भुकेपोटी, अतिशय सावकाश, चवीने खाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत क्रमाने आहार कमी करत जाणे. घरातील स्वयंपाकघरात निर्माण होणारेच अन्न खाणे .
3)चुकीचे व्यायाम -:
व्यायाम करणे चांगले आहे परंतु चुकीच्या पद्धतीने केल्यास तो हमखास वेदना उत्पन्न करतो. त्यामुळेच अगदी कोणताही व्यायाम हा चुकीचा ठरू शकतो हे लक्षात घ्यावे. जिम ,मैदानी खेळ ,योगदिन हे रुग्ण निर्मितीचे कारखाने बनताहेत .
उपाय -व्यायाम करण्यापूर्वी त्यातील अज्ञान दूर सारावे. आपल्या मगदुरानुसार सुरुवात असावी .
हळूहळू तीव्रता वाढवत न्यावी.
4) खेळ-: सुटलेले पोट घेऊन बॅडमिंटन सारखा खेळ जोशात खेळणे म्हणजे वेदना आज की उद्या एवढेच बाकी असते.
खेळ तंदुरुस्त होऊन खेळावेत , होण्यासाठी नाही.
5)असमान शरीरवापर /व्यायाम-:
कुठलीही एकच हालचाल वारंवार करणे हे वेगवेगळ्या प्रकारच्या हालचाली पेक्षा जास्त हानिकारक असते.उदा. कारखान्यातील असेम्ब्ली वर काम करणारे कामगार एकच हालचाल वारंवार करतात .
बैठका जोर ,सूर्यनमस्कार ,जिम मधील असंतुलित व्यायाम यामध्ये देखील सांध्यामधील एका बाजूचे स्नायू खूप जास्त तर दुसर्या बाजूचे खूप कमी वापरले जातात .
या दोन्ही गोष्टी संतुलन बिघडवतात.
उपाय - दुसरी बाजू वापरून काम व व्यायाम करणे .
6)मानसिक ताण- राग आल्यास मुठी आपोआप वळतात .तसेच पूर्ण शरीर सुद्धा बराच काळ आक्रसून राहते . तेथील घर्षण वाढते.
हे अतिशय दुर्लक्षित कारण आहे.
7)अतिस्वच्छता ठेवणे -: स्वच्छ राहणे व अतिटापटीप ठेवणे यातील फरक स्त्रियांना न समजल्यामुळे त्या या कारणामुळे आपला वेळ, ऊर्जा , आणि सांधे गमावून बसतात .
नवरात्रि निमित्त होणारी स्वच्छता मोहीम संपली की पुढच्या आठवड्यात स्त्रियांची रुग्णसंख्या नक्की वाढते.
उपाय -: काय आणि कश्या साठी हे करतो आहोत याची सतत जाणीव ठेवणे.
*आणखी इतर काही कारणे सुद्धा आहेत .
संधिवातावर उपाय काय ? -
1) स्वतःचे वैयक्तीक कारण शोधून त्यात सुधारणा करणे.
2)वेदनामुक्तीचे व्यायाम हे फिटनेससाठीच्या व्यायामांपेक्षा वेगळे असतात .गुडघा दुखत असताना अगोदर तो नीट करण्याचे व्यायाम करावेत, नंतर चालायला जावे. अगोदर चालण्यास गेलात तर गुडघा अजून जास्त दुखतो व चालणेच बंद करून टाकतो. अश्या वेळी कमरेएवढ्या पाण्यात चालता येते .
वेदना मुक्तीचे व्यायाम हे शक्यतो स्थिर प्रकारचे, सुखकारक असणारे असावेत त्यामध्ये नेमकेपणा हवा, सर्वसाधारणपणा नको .
दुःख निवारणासाठी डॉक्टरांनी रुग्णाला सुरुवातीस एक ठराविक कालावधी देता यायला हवा .
'करते रहो ,करते रहो ' काही कामाचे नाही.
3) X-Ray , MRI reports महत्वाचे आहेतच . परंतु आलेल्या रिपोर्टला पाहून, न घाबरता योग्य व्यायाम करावेत. शरीर स्थिती शिकून घ्याव्यात .
शस्त्रक्रिया हाच सर्वोत्तम पर्याय आहे असे समाज मनावर बिंबवले जात आहे. तसे न करता स्वतःच्या शरीराच्या बरे होण्याच्या क्षमतेवर डोळे उघडे ठेवून विश्वास ठेवल्यास इच्छित परिणाम सहज दिसू शकतात.
आपण कुणालाही वेदना न होवो हीच सदिच्छा .
पोस्ट आवडल्यास नावासहित share करा.कुणालातरी नक्की त्याचा उपयोग होईल.
धन्यवाद .
डॉ.अमोल बाबासाहेब खांदवे
तारकपूर बस स्टँड समोर , कोर्टयार्ड , पहिला मजला ,
अहमदनगर
Pin -414001
Mobile-8421193878 /8308868797
अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा
Please click link to know more about us
https://g.co/kgs/PMpbxL
#जागतिकसंधिवातदिन