29/01/2025
बच्चा बोलेतो फुल समझा क्या???
आज लेकीच्या पासपोर्टच्या नूतनीकरणासाठी ठाण्याच्या पासपोर्ट ऑफिसमध्ये गेले होते. आत शिरल्याशिरल्या एका 2 वर्षाच्या छोटीनं रडून गोंधळ घातलेला दिसला. रांगेत उभं राहून माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. शेवटी मला संधी मिळाली की मी तिच्या आईला तिच्या रडण्याचं कारण विचारलं, त्यावर तिची आई म्हणाली ,"तिला हे हॉस्पिटल वाटत आहे आणि ती डॉक्टर नको म्हणून रडत आहे.."
पुढच्या काउंटरवर दुसरा त्याच वयाचा छोटू दिसला, भोकाड पसरलेलाच. माझ्यातली सायकॉलॉजिस्ट गप्प बसत नव्हती. मी त्याच्याही रडण्याचं कारण जाणून घेतलं. त्याच्या पासपोर्टसाठी अंगठ्याचा ठसा घेतला होता आणि त्यासाठी बोटाला शाई लावलेली होती. ते त्याला अजिबात आवडलेलं नव्हतं.
वरच्या दोन्ही उदाहरणात नवीन वातावरण मुलांवर एकदम लादलं गेलं होतं. पालकांनी काही त्यांना त्रास देण्यासाठी असं केलं नव्हतं हे अगदीच मान्य. पण मुलांना येताना मानसिकदृष्ट्या तयार करूनही आणलं नव्हतं. आपल्याला कोणी अचानक एखाद्या ठिकाणी मनाची तयारी नसताना नेलं तर आपण मोठी माणसं रडणार नाही पण गोंधळून तर निश्चितच जाऊ. आपल्यावरून मुलांना समजून घेऊया. प्रत्येकाच्या मनात कमी अधिक प्रमाणात fear of unknown ( अज्ञाताची भिती ) असतेच. नवीन अनुभव, नवीन जागा या ठिकाणी नेताना मुलांच्या मनाची आधीपासून तयारी करा. त्यांच्याशी त्या जागेबद्दल, त्या कामाबद्दल बोला. त्यांच्या शंकांना उत्तरं द्या. मग बघा तिथं गेल्यावर ते गोंधळून नाही जाणार.
बच्चा बोलेतो फूल समझा क्या? रोना शुरू किया तो फायर है फायर...
तृप्ती कुलश्रेष्ठ