18/09/2025
दशावतार सिनेमामुळे दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय पुन्हा चर्चेत आला. मनावर ठसा उमटवणारा अभिनय असतो. असाच एक सिनेमा 'चौकट राजा '. चौकट राजा मध्ये त्यांनी एका वयाने वाढलेल्या ; पण बुध्दीची वाढ खुंटलेल्या, लहान मुलाचा मेंदू असलेल्या व्यक्तीची व्यक्तीरेखा साकारलेली मनात घर करून गेली. त्यात स्मिता तळवलकर, सुलभा देशपांडे, अशोक सराफ वगैरे सर्वच कलाकारांनी छानच काम केले. या सिनेमाचे कथानकही मनात ठसलेले. याचा विषयच वेगळा आहे. यातील नंदूचे ,लहाणपणी डोक्यावर पडल्यामुळे वय वाढते पण बुध्दीची वाढ झालेली नसते. त्याच्या बरोबरीच्या मुलांची लग्न होतात. त्यांना मुलंबाळं होतात. पण नंदू मात्र बुध्दीने लहानच राहतो. त्याचे वागणे , राहणे सारे लहान मुलासारखेच असते. त्याच्या अशा असण्यामुळे त्याला नि त्याच्या कुटुंबाला बराच त्रास सहन करावा लागतो. त्याची आई, मामा, मैत्रीण , समाजातील लोकं, त्यांचे विचार , या साऱ्यांचे चित्रण एकदम मनाला भिडलेले. सिनेमा बघताना वारंवार डोळे पाणावतात. मन भरून येतेच.
समाजामध्ये वावरताना नंदुसारखे बरीच पात्र आपल्या आयुष्यात डोकावून जातात. अशी व्यक्ती भेटली की, डोळ्यासमोर 'चौकट राजा ' येतो. नि त्या व्यक्तीविषयी मनात कणव निर्माण होते. अशी व्यक्ती वागताना तिच्या बुध्दीप्रमाणे वागत असते. पण इतरांना तिच्या वयप्रमाणे वागण्याची अपेक्षा असते. नि इथेच त्रासाला सुरूवात होते. इतरांनी तिच्या बुध्दीचा विचार करून वागणूक दिली तर नक्कीच तिचे आयुष्य सुरळीत चालेल. 'वय जास्त नि बुध्दी लहान मुलाची' , अशा व्यक्तींसोबत राहणे म्हणजे एक दिव्यच असेल. बुध्दीची वाढ खुंटलेले एक लहान मुल ,आयुष्यभर सांभाळावे लागते.अशा व्यक्ती पाहिल्यास खूप अस्वस्थ होते. पण आपण काही करू शकत नाहीत. प्रारब्ध.... दुसरे काय? 'चौकट राजा' .....
डाॅ. सौ. अनिता जाधवपाटील ...