20/04/2023
#मला_डिप्रेशन_आलंय_कि_एन्झायटी?
ुन_घ्या
हल्ली “डिप्रेशन” हा शब्द बर्यापैकी ‘कूल’ आणि ‘कॉमन’ वाटायला लागला आहे.
‘कूल’ यासाठी कारण आपण डिप्रेशन मध्ये आहोत हेच हल्ली सहानुभूती मिळवायचं शस्त्र झालेलं आहे असं दिसुन येतं, आणि ‘आय एम् इन अ डिफरंट फेज’ म्हणण्यात काहीतरी औरच समाधान मिळतं असं म्हणायला हरकत नाही.
‘कॉमन’ यासाठी कारण सध्याच्या स्ट्रेस युक्त जगात हा मानसिक आजार प्रत्येक तिसर्या व्यक्तीमध्ये पाहायला मिळतो असं दोन वर्षांआधीच जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेलं आहे, त्यातल्या त्यात भारतीय लोकांमध्ये हा काहीसा आटोक्यात आहे. पण किती दिवस? किती दिवस हा असा आटोक्यात राहील? किती दिवस हा अटकाव टिकुन राहील? आपण एवढं स्ट्रेसफुल आयुष्य जगण्याची खरंच गरज आहे का? हे प्रश्न उपस्थित होतात.
स्ट्रेस हा आजच्या काळात स्वाभाविक आहे असं जर वाटत असेल तर कुठवर? हा ही प्रश्न आहेच.
शारीरिक स्ट्रेस आणि मानसिक स्ट्रेस यात फरक आहे हे आधी समजुन घेणं महत्वाचं आहे. शरीराला झालेला स्ट्रेस ‘कणकण येऊन’ किंवा ‘कसंतरीच होतंय’ या उपमांकित वाक्यांतुन आणि साधी ‘पॅरासिटेमॉल’ची गोळी खाऊन दूर होण्यासारखा आहे! पण तेच मानसिक स्ट्रेस बाबतीत थोडं वेगळं आणि कधीकधी किचकट आहे. मनाला झालेला ताण हा अशा वाक्यांतून किंवा फक्त गोळ्या औषधांनी ठिक होण्यासारखा नक्कीच नाही! हे समजुन घेणं महत्वाचं आहे.
———————————————
बरं मघाशी ‘कूल’ म्हणालो त्याचं दुसरं कारण असं की स्ट्रेस हा दोन प्रकारचा असतो. मेडीकलच्या भाषेत किंवा डॉक्टरांच्या भाषेत ‘अक्युट (Acute)’ म्हणजे तात्पुरता आलेला आणि ‘क्रॉनिक (Chronic)' म्हणजे बर्याच काळापासून असलेला. तात्पुरता आलेला स्ट्रेस हा काही काळानंतर काहीही न करता ठीक होणारा आहे पण बर्याच काळापासुन असलेल्या स्ट्रेससाठी औषधी उपचार आणि डॉक्टरांचा सल्ला महत्वाचा असतो. परंतु आजच्या ‘यूथ’ मध्ये तात्पुरता आलेल्या स्ट्रेसलाही ‘डिप्रेशन’ अशी संज्ञा देऊन आपण मोकळे होतो.
खरंतर, डिप्रेशन हा विषय अजुनही पुर्णतः अभ्यासला गेला नसुन त्यावर रिसर्च सुरूच आहे आणि याचसाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक आहे.
———————————————
सततची चिंता, उदासिनता, अपराध्याची भावना, नैराश्य, कुठल्याही कामात मरगळ किंवा स्वारस्य कमी होणे, सततचे मूड स्वींग्स, लवकर जाग येणे, सतत झोपावेसे वाटणे किंवा झोपच न येणे, खूप भूक लागणे किंवा भूकच न लागणे, थकवा, आळस, सतत रडू येणे, चिडचिड, समाजापासुन स्वतःला दूर ठेवणे, कुठल्याही कामात लक्ष न लागणे, कामांमध्ये मंदता, जगण्याची उमेद नाहीशी होणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, वारंवार कुठलातरी विचार सतावणे ही सगळी डिप्रेशनची लक्षणं आहेत. सगळ्याच रूग्णांमध्ये सगळीच लक्षणे दिसतील असे नाही पण यातली बरीच लक्षणे नीट लक्ष दिल्यास दिसुन येतात.
बरं यातली बरीच लक्षणं शारीरिक नसल्या कारणाने रूग्णाच्या जवळच्या लोकांना हे जाणवुन येत नाही आणि म्हणुनच हा मानसिक विकार धोकादायक ठरतो.
त्यासाठी रूग्णाच्या जवळच्या लोकांना रूग्णाच्या वागण्या बोलण्यात बदल दिसुन आल्यास त्याच्याशी बोलुन, त्याच्या कारणांची उकलफोड करून तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य तो उपचार सुरू करावा अन्यथा सर्दी- खोकल्यासारखा हा आजार स्वतःहुन ठीक होईल या भ्रमात कृपया राहु नये!
———————————————
त्याचसारखा वाटणारा, कॉमन झालेला पण डिप्रेशन नसणारा दुसरा आजार म्हणजे ‘एन्झायटी (सततची चिंता). हा आजार तंतोतंत डिप्रेशन सारखाच वाटतो, त्याची लक्षणेही थोडीफार फरकाने तशीच पण इथे फरक पडतो तो अक्युट आणि क्रॉनिकचा!
———————————————
एन्झायटी हा बर्याचदा अक्युट असतो आणि डिप्रेशन हे क्रॉनिक असते!
———————————————
हल्ली तात्पुरता आलेल्या नैराश्यालाही लोक डिप्रेशन असं नाव देऊन उगाच ‘फ्लेक्स’ वगैरे करताना दिसतात ज्यामुळे या विकाराकडे बहुतेक जणांचा दृष्टीकोन बदलताना दिसुन येतोय.
कृपया ‘एन्झायटी अटॅक्स (अचानक सतावणारी चिंता) (आयुर्वेदोक्त नाव - चित्तोद्वेग) यात बर्याचदा फक्त तात्पुरता नैराश्य आलेले दिसुन येते आणि ‘डिप्रेशन’ (नैराश्य) (आयुर्वेदोक्त नाव - मनोवसाद) यात नैराश्य हे बर्याच काळापासुन आलेले असते.
डिप्रेशनच्या लक्षणांमध्ये एनझायटी हे एक लक्षण आहे परंतु प्रत्येक एनझायटी हे लक्षणं डिप्रेशनचेच आहे असे नसते. हे दोन्हीही वेगवेगळे मानसिक आजार आहेत हे समजुन घेणे गरजेचे आहे आणि त्यासाठीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
-डॉ. उमेश सोनवणे
एम.डी (आयु.)
ओज केअर क्लिनिक
पत्ता - रामबाग ४, गुरूनानक शाळेसमोर, कल्याण (प.), ४२१३०१