26/12/2023
आज (मार्गशीर्ष पौर्णिमा – २६ डिसेंबर) श्री दत्त जन्मोत्सव...
आज संपूर्ण देशभरात श्री दत्तात्रेयांचा जन्मोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होत आहे. दत्तात्रेय हा शब्द ‘दत्त’ व ‘आत्रेय’ या शब्दांनी बनला आहे. ‘दत्त’ शब्दाचा अर्थ आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला आहे असा. आणि ‘आत्रेय’ म्हणजे अत्री ऋषी व माता अनसूयेचा पुत्र. श्री दत्तात्रेय हे श्री विष्णूचा अवतार होत.
संपूर्ण भारतात, विशेषत: महाराष्ट्र व कर्नाटकात श्रीदत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. दत्त जन्मोत्सवासाठी शास्त्रोक्त असा विशिष्ट विधी नाही. या उत्सवापूर्वी सात दिवस गुरुचरित्राचे पारायण केले जाते. दत्त मंदिरामध्ये भजन, कीर्तनादी कार्यक्रम आयोजित केले जातात. दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून सुंठवड्याचा प्रसाद वाटप करतात.
श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री माणिकप्रभू, श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री भालचंद्र महाराज हे श्री दत्तप्रभूंचे महत्त्वपूर्ण अवतार आहेत. चराचरांतील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचे अस्तित्व पाहण्याच्या उद्देशाने श्री दत्तगुरूंनी अग्नी, पृथ्वी, पाणी, आकाश, वायू, सूर्य, चंद्र, समुद्र, हत्ती, मधमाशी, कपोत इ. चोवीस गुरु केले. सर्वगुणसंपन्न कोणीच नसते, प्रत्येकामध्ये एखादा तरी चांगला गुण असतोच, हे जाणून श्री दत्तात्रेयांसारखा विशाल दृष्टिकोन ठेवला तर व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल, समाज अधिक निकोप होईल, ह्यात शंका नाही.
जन्मोत्सवाच्या निमित्ताने मनोभावे श्री दत्तात्रेयांना नमन करू, नामस्मरण करू. दत्तात्रेयांची कृपा सर्वांवर राहो, हीच प्रार्थना...
‘दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा...’
#श्रीदत्तप्रभू #श्रीदत्तजन्मोत्सव #अत्री_ऋषी #माता_अनसूया #गुरुचरित्र #नमन