21/02/2022
*कुष्ठरोगाला असलेले लांछन कमी करणे*
थोडी पार्श्वभूमी म्हणून सांगायचे झाल्यास, १९८३ पर्यंत कुष्ठरोगावर फारसा प्रभावी उपचार उपलब्ध नव्हता. कुष्ठरोग बाधित व्यक्तींना तीन ते पाच वर्षे, तर काहींना मरेपर्यंत उपचार घ्यावा लागत होता. काहींना ते बरे झाल्याचे घोषित केल्यानंतर सुद्धा मेंटेनन्स डोस म्हणून तोच उपचार त्याच मात्रेत सुरू ठेवला जायचा. त्यामुळे त्यांना आपण बरे झाल्याची खात्री नसायची. मज्जा बाधित झाल्या तर उपचार सुरू असताना, फार काय, बरे झाल्याचे घोषित केल्यानंतर सुद्धा हातापायांना विकृती येत असत. परिणामी, कुष्ठरोगाभोवती भीतीचे गूढ वलय होते. सर्व सामान्य लोकच नव्हे तर वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर वर्ग इत्यादींमध्ये सुध्दा प्रचंड भीती आणि गैरसमज होते. कुष्ठपीडित व्यक्ती, त्यांचे नातेवाईक, एवढेच नव्हे तर काही प्रमाणात कुष्ठकार्यकर्त्यांना सुद्धा कुष्ठरोगाला चिकटलेल्या लांच्छनाचा नकारार्थी प्रभाव जाणवत होता. कुष्ठरोगाला असलेले लांच्छन आणि परिणामी समाजाकडून कुष्ठपीडितांना देण्यात येणारी भेदभावाची वागणूक अतिशय गुंतागुंतीची समस्या आहे.
कुष्ठरोग हा नेहमीच एक भयानक रोग मानला गेला होता.कुष्ठरोगाशी निगडित सामाजिक लांच्छनामुळे काही दुर्दैवी कुष्ठपीडितांना त्यांच्यासारख्या पीडितांच्या वसाहतीत किवा भिकाऱ्यांचे जीवन जगण्यासाठी, त्यांच्या जिवश्च कंठश्च नातेवाईकांकडून कायमचे सोडले जात होते. या आजाराशी संबंधित लांच्छनामुळे कुष्ठपीडित लोकांचा वर्ग निर्माण होतो जो कौटुंबिक वर्ग किंवा जातीसारख्या सामाजिक गटांपेक्षा वेगळा असतो. मानवजातीच्या इतिहासात असा एकही आजार नाही ज्यांच्या परिणामी एखाद्या व्यक्तीचे सामाजिक मान्यता असलेल्या गटांशी संबंध तोडले गेले आणि त्याच गटातील पीडित व्यक्तींशी बांधले गेले.
तत्कालीन अस्पृश्य आणि निग्रो यांनाही सामाजिक लांच्छन सहन करावा लागत होता. काही कुष्ठपीडितांना कुष्ठरोगामुळे लांच्छनाच्या स्थितीत टाकण्यास भाग पाडले जाते. याउलट तत्कालीन अस्पृश्य आणि निग्रो यांना जन्मामुळे लांच्छनाची स्थिती प्राप्त होत होती. तत्कालीन अस्पृश्य आणि निग्रो लोकांच्या स्वतःच्या कुटुंबात आणि सामाजिक गटात आपुलकीच्या जैव- मानसिक गरजा भागविल्या जात. मात्र बहिष्कृत कुष्ठपीडितांना त्यांच्या जैव-मानसिक आवश्यकतांपासून वंचीत ठेवले जाते. एखाद्या सामाजिक प्रणालीमध्ये व्यक्ती विशिष्ट स्थान आणि दर्जा प्राप्त करून समाजात राहते. व्यक्ती एक पिता, आई, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण आणि समाजाचा एक उत्पादक सदस्य म्हणून जगते. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्थितीनुसार समाजात काही विशिष्ट भूमिका बजावते. व्यक्तीला समाजात परिपूर्तीची आणि आपण उपयुक्त असल्याची भावना प्राप्त होते. तथापि, काही कुष्ठपीडितांना आपल्या कुटुंबात आणि समाजामध्ये व्यक्ती म्हणून गणले गेले नाही. तो पितृत्व, मातृत्व, पतीत्व पत्नीत्व इत्यादी प्राप्त झालेला, तसेच कामाच्या ठिकाणी मिळविलेला दर्जा गमावतो. बहिष्कृत कुष्ठपीडितांना देण्यात आलेली स्थिती म्हणजे त्याचा सामाजिक मृत्यू होय. त्यांच्यासाठी समाजात कोणतीही भूमिका नसते.
समाजशास्त्रज्ञ इर्व्हिंग गाॅफमननुसार, '"While a stranger is present before us, evidence can arise of his possessing an attrubute that makes him different from others in the category of persons available for him to be, and of a less desirable kind- in the extreme , a person who is quite thoroughly bad, or dangerous or weak. He is thus reduced in our minds from a whole and usual person to a tainted, discounted one. Such an attribute is the stigma especially when its discrediting effect is very extensive; sometimes it is called a failing a shortcoming a handicap."
थोडक्यात सामाजिक वैशिष्ट्यांच्या आधारे इतर सदस्यांपेक्षा भिन्न असल्याचे समजून एखाद्या व्यक्तीचे बाबतीत नकार किंवा भेदभाव केला जातो ते लांच्छन होय.
लांच्छन ही विशेषतः व्यक्तीने अनुभवलेली अगर त्याला अपेक्षित अशी सामाजिक प्रक्रिया आहे, जी व्यक्ती /गटाचा बहिष्कार, त्यांच्याविषयी सामाजिक निर्णयाची अनुभूती, समज किंवा वाजवी अपेक्षेचा परिणाम होतो. लांच्छन म्हणजे कोणाला तरी किंवा एखाद्या गोष्टीकडे पाठविलेल्या प्रतिकूल मनोवृत्ती आणि श्रद्धा याचा संदर्भ असतो.ILEP च्या guidelines ' to reduce stigma' नुसार लांच्छनाचे व्यापकपणे पुढील ४ गट केले जाऊ शकतात.
१. गृहीत धरलेले/ भासलेले जाणवलेले लांच्छन-
विशेषतः लांच्छनाच्या स्थितीत असलेल्या व्यक्तीने अगर समाजाला जाणवलेले अगर आकलन केलेल्या नकारात्मक मनोवृत्तीचा येथे संदर्भ आहे.
२. अंतर्गत /स्व लांच्छन- पीडितांना नकारात्मक मनोवृत्तीने जसे लोक समजतात तेच बरोबर आहे असे ते मानतात त्याला स्व-लांच्छन म्हणतात.
३. संस्थागत लांच्छन-
पूर्वी सार्वजनिक आरोग्य खात्यामध्ये कुष्ठरोग निर्मूलनाकरिता एक स्वतंत्र विभाग होता. त्यांचे उपचार केंद्र वेगळे असायचे. कुष्ठ पीडितांना जाचक असे ११९ कायदे होते. त्यांचेपैकी अद्यापी १०० कायदे अस्तित्वात आहेत.
४. अमलात आणलेले लांच्छन-
हे लांच्छन भेदभावाची वास्तविक घटना दर्शविते.
*लांच्छनाचे निर्धारक घटक*
१. ज्ञानाचा अभाव-
कुष्ठरोगाची कारणमीमांसा, तो बरा होण्यायोग्य असल्याबद्दल, रोगाचा प्रसार कसा होतो, अनुवंशिकता आहे किवा नाही याविषयी ज्ञानाचा अभाव असल्यास अविविकी कृत्य घडते.सुशिक्षित आणि आदरणीय व्यक्ती देखील कुष्ठरोगाविषयीच्या चुकीच्या धारणांचे बळी असू शकतात.
२.वृत्ती-
वृत्ती लांच्छनाचे निर्धारण करणार्या असतात. वृत्ती बहुतेक वेळा विश्वास, प्रभाव आणि वर्तन प्रवृत्तीच्या संदर्भात परिभाषित केल्या जातात. त्या शिकलेल्या प्रतिक्रिया असतात आणि भूतकाळातील अनुभवांचे प्रकटीकरण करीत असतात. त्या सामाजिकरित्या सामायिक असतात. सामुदायिक दृष्टिकोन ( वृत्ती ) हा सांस्कृतिक श्रध्दा आणि मुल्य प्रणालीचा भाग असताे. ज्या संस्कृतीत बाह्य सौंदर्य खूप महत्त्वाचे आहे, अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीला चेहऱ्यावर भुवयाचे केस गळालेले/ आणि बसके नाक असते अशा व्यक्तीच्या बाबतीत ते विद्रूप दिसतात
म्हणून लोकांच्या मनात नकाराची भावना निर्माण होते. ३.भीती-
भीती लांच्छनाची प्रमुख कारक शक्ती आहे. भीती ही धोका किंवा धमकीमुळे प्रेरीत एक भावना आहे, ज्यामुळे शारीरिक बदल होतात आणि शेवटी पळून जाणे, लपवून ठेवणे किंवा क्लेशकारक गाळण उडणे सारखे वर्तन बदल होतात. कुष्ठरोगाचे बाबतीत सांगायचे म्हणजे लोकांना मुख्यत: दोन गोष्टीची भीती असते- विकृती आणि सामाजिक बहिष्कार. बहिष्कारामुळे मुला-मुलींचे लग्न होणार नाही,आणि मालक कामावरून कमी करतील. परिणामी, कमाई घटेल याची भीती असते. म्हणून रोग लपविण्याची प्रवृत्ती असते किंवा घरून पळून जावेसे वाटते. भीती खोलवर रुजलेली असू शकते आणि रोगाच्या प्रसार होण्याच्या जोखमीशी संबंधित असू शकते. रोगाचा प्रसाराच्या भीतीपोटी कुष्ठपीडिताचा स्पर्श टाळण्याची प्रवृत्ती दिसून येते
४ दोष आणि लाज-
कुष्ठबाधित व्यक्ती ज्या समाजात राहतात त्याच समाजाचे आणि संस्कृतीचे ते सदस्य असतात. त्या समाजातील प्रचलित वृत्ती आणि श्रद्धा यांचा त्यांच्यावर प्रभाव पडतो आणि ज्या समाजात कुष्ठरोग पूर्वजन्मीच्या अगर या जन्मीच्या पापांचे फळ आहे अशी श्रद्धा असते तीच मान्यता काही कुष्ठ पीडितांची सुद्धा असते. परिणामी, बहुतेकांना त्यांना कुष्ठरोग होण्याचे कारण त्यांचा स्वतःचा दोष असावा असे वाटते. अशा प्रकारच्या शिक्षेसाठी त्यांनी काहीतरी वाईट केले असे सुध्दा वाटत असते. त्यामुळे त्यांना कुष्ठरोग झाल्याबद्दल लाज वाटते. त्यांच्या उपस्थितीमुळे कुटुंबावर गंभीर नकारात्मक प्रभाव पडेल असे मानून काही रुग्ण स्वतःच कुटुंब सोडतात. लोक त्यांना पापी समजत असतील असे वाटून ते लोक लांच्छनाच्या भीतीने जीवन जगतात कीवा ज्यांचे बाबतीत वास्तविक भेदभाव झाला असे लोक स्वतःला दोषी मानून स्व लांच्छनाचे बळी ठरतात आणि त्याचा त्यांचे वर्तनावर प्रभाव पडतो. समाजाची अशा लोकांकडून ज्या वर्तनाची अपेक्षा असते तसेच वर्तन ते करतात. उदा. कौटुंबिक अगर सामाजिक समारंभात ते भाग घेत नाहीत. त्यांच्या वर्तनाने ते समाज बहिष्कृत होतात.
*भेदभाव*
एखादा व्यक्ती किंवा गटाशी पक्षपात करणे आणि पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन ठेवून वागणूक देणे याला भेदभाव म्हणतात. आरोग्य सेवा, रोजगार, न्याय व्यवस्था, समाज कल्याण, प्रजनन आणि कौटुंबिक जीवन यासह विविध क्षेत्रात मानवाधिकार आणि हक्काच्या संदर्भात बहुधा भेदभाव परिभाषीत केला जातो.
*लांच्छन आणि भेदभाव*
लांच्छन एक वृत्ती प्रतिबिंबित करते तर भेदभाव ही एक क्रिया किंवा वर्तन आहे. भेदभाव हा उद्देशाने किंवा नकळत लांच्छनयुक्त विचारांना व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे.लांच्छन आणि भेदभाव यांचा परस्पर संबंध आहे. लांच्छन बाधित व्यक्तीचे बाबतीत भेदभाव होतो आणि त्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन होते. एखाद्या व्यक्तीचे लांच्छनाचे विचार त्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीच्या सेवा किंवा हक्क नाकारण्यास प्रवृत्त करू शकतात.
*लांच्छनाचे परिणाम*
लांच्छनाचा परिणाम मानसिक असू शकतो. लांच्छनाला बळी पडलेल्या व्यक्तीला भीती आणि आजार असल्यामुळे लाज वाटू शकते. नंतर त्या व्यक्तीस सतत चिंता असते. चिंता ही अस्पष्ट आणि अप्रिय भावनिक अवस्था आहे, ज्यामध्ये भीती त्रास आणि अस्वस्थता सारखे गुण असतात. भीती ही चिंते सारखीच असते; परंतु विशिष्ट कारकाने असते. सततच्या चिंतेमुळे त्या व्यक्तीस नैराश्य येऊ शकते. अपेक्षित लांच्छन किंवा भेदभावाच्या अनुभवाने ती व्यक्ती सामाजिक उपक्रमांत भाग घेणे टाळते. त्यामुळे सामाजिक सहभागाला मर्यादा पडतात आणि ती व्यक्ती वाळीत टाकली जाते. सामाजिक बहिष्कारामुळे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या कुटुंबावर ओझे बनते. त्यामुळे गरिबी येते किंवा आधीच गरिबी असल्यास ती विकोपाला जाते.
२. अपेक्षित लांच्छनामुळे व्यक्ती आजार लपविते. उपचार घेत नाही अगर अनियमित उपचार घेते. त्यामुळे आजार वाढतच जातो. दृश्य स्वरूपातील विकृती येऊ लागतात. अशा प्रकारे प्रभावी उपचार आणि व्यक्तीची काळजी यात लांच्छन आडकाठी आणताे.
३. मूलतः सार्वजनिक स्वास्थ्याचा प्रश्न असणारे सांसर्गिक प्रकारचे रोगी सुरुवातीच्या अवस्थेत ओळखले जात नाहीत. त्यांना विकृतीसुध्दा मध्यम किवा प्रगत अवस्थेत येतात. लांच्छनाचे भीतीपोटी ते आपला आजार असांसर्गिक प्रकारच्या कुष्ठपीडितांच्या तुलनेत जास्त काळ लपवू शकतात.अशाप्रकारे सांसर्गिक रोग्यांच्या बाबतीत लांच्छन रोगावर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये गुंतागुंत निर्माण करु शकते. त्यामुळे रोगनिदान आणि उपचाराला विलंब होतो आणि समाजामध्ये कुष्ठरोगाचे संक्रमण अनिर्बंध सुरू राहते.
कुष्ठरोग आणि कुष्ठपीडित व्यक्तींकडे समाजाचा पाहण्याचा जुना दृष्टिकोन किती बदलला आहे हे तपासण्याची आता वेळ आली आहे. असे म्हटले जाते की, बहुतेक धर्मांच्या प्राचीन धर्मग्रंथांमध्येही कुष्ठरोगाविषयी खोलवर रुजलेली भीती व्यक्त केली गेली आहे आणि ती मानव जातीच्या मानसिकतेत रुजलेली आहे.कुष्ठपीडितांना समाजासोबतच वैद्यकीय व्यावसायिकांच्या या रोगाविरुद्धच्या पूर्वग्रहामुळे खूप त्रास सहन करावा लागला.त्यांना आधुनिक वैज्ञानिक ज्ञान असूनही ते अत्यंत अवैज्ञानिक आणि तर्कहीन पद्धतीने वागले.
या रोगाच्या नियंत्रणासाठी राष्ट्रीय योजना आखताना लांच्छनाचे महत्त्व लक्षात घेतले गेले नाही हे दुर्दैवी आहे. समाजाचा आणि वैद्यकीय व्यावसायिकांच्या या आजाराकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाचा विचार न करता हा निव्वळ तांत्रिक आणि प्रशासकीय सराव बनला होता.तथापि, बहुविध औषधोपचार पध्दतीची सुरूवात झाल्यानंतर काही आरोग्य शिक्षण उपक्रम राबविले जात असल्याचे दिसून आले आहे. *अशा आरोग्य शिक्षण उपक्रमांद्वारे दिले जाणारे ज्ञान डॉक्टरांच्या दवाखान्यात, रुग्णालय, शाळा, पुनर्वसन केंद्र, नोकरीच्या ठिकाणी किंवा सामान्य सामाजिक परस्पर संबंधांमध्ये व्यावहारिक प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून व्यवहारात आणले जाते की नाही हे शोधणे आवश्यक आहे.*
जुने वैद्यकीय व्यावसायिक आणि सरकारी सेवेतील त्यांच्या समकक्ष अधिकार्यांवर प्रभाव पाडण्यासाठी आणि त्यांना वैज्ञानिक माहिती आणि रुग्ण तपासणीचे प्रात्यक्षिक देण्यासाठी कुष्ठरोग उजळणी प्रशिक्षण ( रिफ्रेशर कोर्सेस) आयोजित केले जात असल्याचेही दिसून आले आहे. अलर्ट इंडियाने केवळ अशा प्रकारचे अभ्यासक्रमच आयोजित केले नाहीत तर वैद्यकीय व्यावसायिक आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी निरंतर वैद्यकीय शिक्षण कार्यक्रम देखील आयोजित केले आहेत.अशा कार्यक्रमांव्दारे या आजाराविषयी त्यांचे वैद्यकीय ज्ञान वाढविण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कुष्ठरोग निर्मूलनाच्या तांत्रिक, सामाजिक आणि व्यवस्थापकीय पैलूंविषयी प्रशिक्षण देण्यात येते. पॅरामेडिकल कर्मचारी आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांनाही वेळोवेळी कुष्ठरोगाच्या तांत्रिक व सामाजिक पैलूंवर कुष्ठरोग अभिमुखता प्रशिक्षण दिले जात आहे. कुष्ठरोगाबाबत जागरुकता निर्माण करणे आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्याच्या दृष्टीने
समाजातील विविध घटकांसाठी विविध आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचे उपक्रमही घेण्यात आले आहेत.
*ज्ञान ही पूर्व शर्त असली तरी ती रोग किंवा रुग्णांबद्दलच्या दृष्टिकोनात बदल घडवून आणू शकत नाही. जे उपदेश केले जाते त्याचे व्यावहारिक प्रात्यक्षिक अत्यावश्यक आहे; मग ते डॉक्टरांच्या दवाखान्यात असो, रुग्णालयात असो, शाळेत असो, पुनर्वसन केंद्रात असो, नोकरीचे ठिकाणी असो किंवा सामान्य सामाजिक परस्पर संबंधांमध्ये असो इ. ठिकाणी निदर्शनास यावे.*
कुष्ठरोगाचे प्रमाण प्रती १०००० लोकसंख्येमागे १ पेक्षा कमी झाल्यानंतर सामान्य आरोग्य सेवा यंत्रणेमध्ये कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाचे एकत्रीकरण झाले. *सामान्य लोकांसाठी असलेल्या रूग्णालयांमध्ये रूग्णांना सहज प्रवेश मिळण्याच्या तरतुदीमुळे, समाजातील उर्वरित आणि कुष्ठरोगाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या एकूण मनोवृत्तीवर त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव पडेल अशी अपेक्षा आहे.*
भीती ही लांच्छनाची प्रमुख कारक शक्ती आहे. कुष्ठरोगाचे बाबतीत सांगायचे झाल्यास लोकांना विकृतीची भीती वाटते. कुष्ठबाधित व्यक्तींना विकृती येऊच नये याकरिता शासनाकडून *अपंगत्व प्रतिबंध आणि वैद्यकीय पुनर्वसन* अंतर्गत त्रिस्तरीय संदर्भसेवा तयार करण्यात आली होती. प्रथम स्तर- प्राथमिक आरोग्य केंद्रे, द्वितीय स्तर- ग्रामीण रुग्णालये उपजिल्हा रुग्णालये, तृतीय सत्र- जिल्हा रुग्णालय/ मान्यताप्राप्त कुष्ठरोग दवाखाने आहेत.
काही विशेष कार्यक्रमांसाठी अतिरिक्त निधी देण्यात आला होता. विकृती प्रतिबंध आणि वैद्यकीय पुनर्वसनाच्या शिबिराचे आयोजन करणे त्या विशेष कार्यक्रमांपैकी एक होता. पीडितांना संभाव्य विकृती येऊ नये, ज्यांना विकृती आहेत त्यांच्या विकृती दुरुस्त करण्याकरिताच्या प्रयत्नांसह ज्यांच्या विकृती दुरुस्त करता येत नाहीत अशा कुष्ठपीडित व्यक्तींच्या विकृती जास्त वाईटाकडे जाऊ नये त्याकरिता आवश्यक ती साधने पुरविणे आणि त्यांनी द्वितीय स्तर किंवा तृतीय स्तर संदर्भ सेवा केंद्र येथे संदर्भित करण्यासाठी ही शिबिरे साधारणपणे तालुक्याच्या ठिकाणी आयोजित केली जात. या शिबिरात उपचारा खालील अगर उपचार मुक्त कुष्ठपीडितांना (विशेषत: ज्यांना विकृती येण्याची शक्यता असते अशांना तालुक्याच्या हद्दीतील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीकरिता बोलावले जात होते. अशा लोकांची तपासणी होऊन त्यात मज्जेच्या कार्यात झालेल्या सुरुवातीच्या अवस्थेतील बिघाड झालेले रुग्ण शोधले जायचे. त्यांना वेळीच उपचार सुरू केला जायचा आणि होऊ घातलेल्या व्यंगांना वेळीच आळा घातला जात असे.
२. ज्यांना अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील विकृती असतील अशा कुष्ठपीडितांना तयार पट्टीबंध दिले जायचे. साधारणपणे तीन महिन्याच्या वापराने काही विकृती दूरुस्त व्हायच्या. प्रगत अवस्थेतील विकृती सुद्धा योग्य स्प्लिंटस्च्या वापराने, नव्याने आलेल्या विकृतीसारख्या झाल्यानंतर पुन्हा आवश्यक त्या स्प्लिंटस् दिल्याने विकृती दुरुस्त होतात.
३. पाणी, तेल, मेण आणि विद्युतचा उपचार सुध्दा तेथे केला जायचा. पाणी आणि तेलाचा उपचार घरी कसा करायचा त्याची प्रात्यक्षिक दिले जायचे. त्यांनी ते घरी नियमित केली पाहिजे याकरिता समुपदेशन दिले जायचे. ५. बधिर हाता-पायांची काळजी कशी घ्यायची याचे शिक्षण त्यांना प्रात्यक्षिकांव्दारे दिले जायचे. ६.पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेकरिता योग्य असणारे कुष्ठपीडित व्यक्ती त्या शिबिरात निवडले जात.
७.उपलब्ध असल्यास डॉ. अतुल शाह यांनी तयार केलेल्या ग्रीप-एड ज्या कुष्ठपीडित व्यक्तींची बोटे पूर्णतः झिजलेली आहेत अशांना पुरविले जायचे.
८. तेथे व्रणाचा उपचार केला जायचा.घरी गेल्यानंतर जखम साफ करणे,मलमपट्टी करणे याचे शिक्षण दिले जायचे. पुन्हा जखमा होऊ नये म्हणून हाता-पायांची काळजी स्वत: कशी घ्यायची याचे सुद्धा शिक्षण दिले जायचे. सेल्फ केअर किट त्यांना पुरविल्या जायच्या.
कुष्ठपीडित व्यक्तींच्या समुदायाधिष्ठित पुनर्वसनाकरिता शासनातर्फे त्यांना व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात आहे. एवढेच नव्हे तर अलर्ट इंडियाच्या माध्यमातून सासाकावा हेल्थ फाउंडेशन जपान या संस्थेकडून त्यांच्या व्यवसायाकरिता अर्थसहाय्य दिले जात असल्याचे समजते. कुष्ठपीडित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाल्याने त्यांना समाजात स्थान आणि चांगला दर्जा प्राप्त होईल असे अभिप्रेत आहे.समाजाचे सामान्य घटक म्हणून कुष्ठपीडित व्यक्ती राहत असल्यास कुष्ठरोगाची भीती कमी होईल.
एक जेष्ठ कुष्ठ कार्यकर्ता या नात्याने कुष्ठरोगाला असलेल्या लांच्छनाबाबत योग्य समज येण्यासाठी आवश्यक ती माहिती सामाईक करण्याचा मी प्रयत्न केला आहे. आशा करतो की, या माध्यमातून कुष्ठरोगाला असलेले लांच्छन कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती समज येण्यास मदत होईल कुष्ठरोग निर्मूलनास मदत होईल.
डॉ. वाय्.एस्.जाधव
M.A.,D.C.B.R., Ph.D.
सेवा निवृत्त अवैद्यकीयपर्यवेक्षक.
मो.नं. 7507891054