16/09/2025
किती पटकन आपण आपल्याला नको वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा स्विकारायला शिकतो नाही..? आधी वाटायचं खूप फिरायच. ट्रिप्स प्लॅन करायच्या. हवं ते खायचं. हवं ते घ्यायचं. कालांतराने तेच नको नको वाटायला लागतं. पूर्वी पैशांची देवाणघेवाण किंवा उसने पैसे मागायचे म्हटलं तर इज्जत का सवाल वाटायचा. आता एकदम हात पसरायला सुद्धा काही वाटत नाही. आपल शिक्षण होऊन कामाला जॉइन झाल्यानंतरच्या.. म्हणजे एकंदरीत कामात गुंतायचे जे वय असते. पंचवीस सव्हिसचा आयुष्याच्या मोठ्या वळणाचा काळ म्हणू आपण. या वयात एवढ्या गोष्टी आपल्या अंगावर येतात आणि त्या इतक्या अलगद येतात की आपसूक आपण सुद्धा त्यात गुंतून जातो. कधी मोकळा वेळ मिळालाच विचार करायला तेव्हा कळत सुद्धा नाही की एवढ कसं प्रवाहात आलो आपण.
एवढ्या शिताफीने जबाबदाऱ्या येतात ही खरतर चांगली गोष्ट आहे असं मला वाटत. भसकन अंगावर आल की पेलायचे बळ राहत नाही. त्यांचं शिताफीने हळूहळू आपल्याला काबीज करण म्हणजे हिपनोटाइजसदृष्य काहीतरी स्थिती वाटत राहते. त्यातून बाहेर आलोच तर ते सवईच झालेलं असतं. कधीकधी ओझ वाटत सुद्धा. पण जबाबदारी अस नाव दिलेलं असल्याकारणाने ते उचलावच लागतं.
आधी पाणीपुरी थोडी तिखट झाली म्हणून उर बडवायचो.
आता पाणीपुरी मागितली असताना चुकून भेळ जरी दिली तरी ती गुपचुप खाऊन घ्यावी वाटते. आता चव आणि आवड नाही फक्त भूक महत्वाची वाटायला लागली आहे. आता सवयी बदलायची सवय झाली आहे शांताराम !
©बा.ल.ऋषि ❤️🌿