20/09/2016
जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।
'श्राद्ध' : हिंदु धर्मातील एक पवित्र संस्कार !
'श्राद्ध' म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात 'अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर', अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. धर्मशिक्षणाचा अभाव, अध्यात्म समजून घेण्याविषयीची अनास्था, पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव, धर्मद्रोही संघटनांकडून हिंदु धर्मातील प्रथा-परंपरा यांवर सातत्याने होणारी द्वेषमूलक टीका इत्यादींचा हा परिणाम आहे. श्राद्धाविषयी पुढीलसारखी विचारसरणीही समाजात आढळून येते. पूजाअर्चा, श्राद्धपक्ष यांवर विश्वास न ठेवणारे किंवा समाजकार्यच सर्वश्रेष्ठ आहे, असे म्हणणारे, 'पितरांसाठी श्राद्धविधी न करता त्याऐवजी गरिबांना अन्नदान करू किंवा शाळेला साहाय्य करू', असे म्हणतात ! त्याप्रमाणे कित्येक जण करतातही ! असे करणे म्हणजे, 'एखाद्या रोग्यावर शस्त्रक्रिया न करता त्याऐवजी आम्ही गरिबांना अन्नदान करू, शाळेला साहाय्य करू', असे म्हणण्यासारखे आहे. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची क्षमता असल्याने श्राद्धविधीतून पितरांना गती मिळणे शक्य होते; म्हणून वरील विधाने हास्यास्पद ठरतात. वरील प्रकारची विचारसरणी असणार्या व्यक्तींच्या डोळ्यांवरील अज्ञान आणि अंधविश्वास यांचे पटल दूर सारून त्यांना 'श्राद्ध' या हिंदु धर्मातील पवित्र संस्काराकडे पहाण्याची सकारात्मक अन् अध्यात्मशास्त्रीय दृष्टी लाभावी, हाच ही माहिती प्रसिद्ध करण्यामागील प्रयोजन आहे.
भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. त्या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. लहानपणी तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपणार्या आपल्या माता-पित्यांचा मृत्योत्तर प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
श्राद्धाचे महत्त्व
१. पितृऋण फेडणार्या श्राद्धामुळे देवऋण आणि ऋषीऋण फेडणे सुलभ होणे : पितृऋण हे कर्मवाचक असल्याने ते फेडायला अत्यंत सोपे आणि सहज आहे. श्राद्धविधीकर्मातून हे आपल्याला शक्य होते; म्हणून प्रत्येकाने इतर ऋणे चांगल्या तर्हेने फेडता येण्यासाठी देव आणि ऋषी यांना जोडणार्या पितृऋणरूपी दुव्याचा आश्रय घेऊन त्यांना विधीतून संतुष्ट करून त्या योगे मोक्षाची गती धारण करण्याचा प्रयत्न करावा. श्राद्धविधीकर्म केल्याने पितरांच्या साहाय्याने आपल्याला हळूहळू देव आणि ऋषी यांच्यापर्यंत पोहोचता येऊन वसु, रुद्र अन् आदित्य ('वसु' म्हणजेच 'इच्छा', 'रुद्र' म्हणजेच 'लय' आणि 'आदित्य' म्हणजेच 'तेज', म्हणजेच 'क्रिया'), या तिन्हींच्या संयोगाने अनुक्रमे पिता, पितामह आणि प्रपितामह यांचा उद्धार करता येणे शक्य होऊन देवतांचा आशीर्वाद मिळवणे शक्य होते, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.