03/07/2025
शासकीय नर्सिंग कॉलेज, लोखंडी सावरगाव च्या वतीने आरोग्य दिंडी:आरोग्याची वारी, जनजागृतीचा संदेश घरोघरी!
लोखंडी सावरगाव: आज, गुरुवार दिनांक ३ जुलै २०२५ रोजी लोखंडी सावरगाव, ता. अंबाजोगाई, जि. बीड येथे शासकीय नर्सिंग कॉलेजच्या वतीने "आरोग्याची वारी आली आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत भव्य आरोग्य दिंडी उत्साहात पार पडली. या दिंडीच्या माध्यमातून आरोग्य जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आला.
आरोग्याची वारी आपल्या दारी हा कार्यक्रम स्त्री रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक श्री. चंद्रकांत चव्हाण, वृधत्व आजार व मानसिक आरोग्य केंद्र येथील वैद्यकीय अधीक्षक श्री. सुनील जाधव, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य श्री. सोमनाथ सोनवणे, पाठ्यनिर्देशक श्री. माधव सरवडे श्री. श्रीधर भांगे, श्री. आशित तरकसे, श्री. भागवत गिरी, श्रीमती शीतल मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही आरोग्य दिंडी यशस्वीपणे संपन्न झाली.
नर्सिंग कॉलेजपासून सुरू झालेली ही दिंडी रुग्णालय मार्गे श्रीपतराय वाडी येथे पोहोचली. दिंडीदरम्यान रुग्णांना संसर्गजन्य आजारांविषयी माहिती देऊन आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. श्रीपतराय वाडी येथील ग्रामस्थांना विविध आजार, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय, लसीकरणाचे महत्त्व, आरोग्य चांगले कसे राखावे, स्वच्छ पाण्याचा वापर आणि वेळेवर दवाखान्यात जाऊन तपासणी व उपचार घेण्याचे महत्त्व यावर सर्व अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
ए.एन.एम विद्यार्थिनींनी पोस्टर आणि बॅनरच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती केली. विशेष म्हणजे, सर्व ए.एन.एम विद्यार्थिनींनी अभंग आणि विठ्ठलाच्या गाण्यांवर अतिशय सुंदर आणि कौतुकास्पद नृत्य सादर केले. या नृत्याने दिंडीला एक वेगळीच शोभा आली. गावातील महिलांनीही अभंग आणि गौळणी गाऊन या आनंदात सहभाग घेतला.
या आरोग्य दिंडीमध्ये सर्व अधिकारी, सर्व परिसेविका, अधीपरीचारिका, एल.एच. व्ही आणि ए.एन.एम विद्यार्थिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अतिशय उत्साही आणि आनंदी भक्तीमय वातावरणात हा आरोग्य दिंडी सोहळा पार पडला.