19/02/2020
फोनची रिंग कंटीन्युअसली वाजत होती. समीक्षाच्या आईने तिला फोन घेण्यास सांगितले पण ती एका पुतळ्यासारखी शांत बसली होती जणु कोणताही आवाज तिच्या कानापर्यंत पोहोचतच नव्हता. आईने तिला जोरात हलवले आणि परत फोनबद्दल सांगितले. यावेळेस एखादे भयानक स्वप्न पाहिल्याप्रमाणे समीक्षा जोरात किंचाळली, ‘नाही घ्यायचा मला तो काॅल, फेकुन दे तो फोन दूर कुठेतरी’. आपले रडू दाबत आई दूर झाली. समीक्षा जोरजोरात हुंदके देत रडायला लागली. मधुनच ‘पिल्लू परत ये ग, मम्मा तुझी खूप काळजी घेईल’ असे म्हणायची.
चाळीशीची समीक्षा एक व्यावसायिक होती. लग्नाआधी डी फार्मसी केले होते तिने. नंतर मुलं थोडी मोठी झाल्यावर न्यूट्रिशियनची पदविका घेतली. डी फार्मा आणि या नवीन पदविकेची सांगड घालून तिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. विविध प्रकारच्या न्यूट्रिशियस पावडर जसे सुदृढ शरीरयष्टीसाठी प्रोटीन पावडर, स्मरणशक्तीसाठी च्यवनप्राश वगैरे. तंदुरुस्त राहण्याचे लोण सर्वत्र सारखेच पसरले आहे तर बघता बघता तिच्या धंदयाचा पसारा वाढत गेला. आधी लेकाला, लेकीला चारीठाव जेवण बनवुन खायला घालणारी समीक्षा सकाळीच संध्याकाळचे जेवणही बनवुन ठेवू लागली. वरच्या कामाला बाई लावली. घरी सासूबाई होत्याच कमीजास्त पाहायला म्हणून काही चिंता नव्हती.
वर्षामागुन वर्षे सरली. छोटी पिंकी आता नववीत गेली होती. आई बिजनेसमुळे नेहमी फोनवर व्यस्त राहायची. वडील त्यांच्या आॅफिसच्या कामात तर दादा M.B.B.S. करायला दूर गेला होता. राहता राहिली आजी, तिच्याशी काय आणि किती बोलणार. पिंकीची घरात घुसमट होवू लागली. आईने सकाळी बनवलेलं जेवण तिला दुपारी जेवावस वाटत नव्हते. आजीला सांगावं तर ती बिचारी वार्धक्याने थकलेली. तिने आईला सांगायचा प्रयत्न केला, समीक्षाने हातावर पैसे ठेवले आणि सांगितले, ‘जा, जे आवडते ते ओर्डर कर.’ पिंकी निघून गेली तिथुन. तिचा उदास चेहरा पाहून आजीने तिला प्रेमाने विचारले, ‘पिंकू काय झाले बाळ, अशी काय बसली?’ पिंकीने सांगितले, ‘आजी मला जेवण गोड लागत नाही ग, सारखा थकवा येतो, मांला सांगितले तर ती मनावर घेत नाही.’ ‘हे बघ बाळा, तुझी आई जे काय करतेय ते तुमच्यासाठीच करते, तुझं, दादाचं भविष्य सुरक्षित व्हावं म्हणून कष्ट घेतेय, दादा आता डाॅक्टर होईल, तुपण शिकून काहीतरी होशील. या सगळ्यासाठी पैसे लागतात राणी. आणि उदया आपण दोघे डाॅक्टरकडे जावू, पाहू काय म्हणतात ते.’
दुसऱ्या दिवशी आजी पिंकीला दवाखान्यात घेवूनगेल्या. तिचा निस्तेज चेहरा आणि इतर लक्षण पाहून डाॅक्टरांनी ब्लडटेस्ट करायला सांगितली. संध्याकाळी रिपोर्ट पाहून त्यांनी समीक्षाला बोलावले आणि सांगितले की मुलीला कावीळ झाली असून लगेच अॅडमिट करायची गरज आहे. पिंकीला अॅडमिट केले गेले. समिक्षा आणि तिचे मिस्टर आळीपाळीने मुलीजवळ बसायचे. मिस्टर आले की समीक्षा घरी जावून जेवण बनवून घेवून यायची. पिंकीला भरवायची. पण भरवतानाही कानाला फोन लावून आॅर्डर घेत असायची. ते दृश्य हळव्या मनाच्या किशोरवयीन पोरीच्या मनावर आघात करुन जात होते. बरे वाटल्यावर पिंकीला डिस्चार्ज मिळाला. ती घरी आली पण पुर्णपणे बदलून. आता ती कोणाशीच अगदी आजीसोबत पण जास्त बोलत नव्हती. कसली तक्रार करत नसे. भूक लागली तर कधी घरचे कधी बाहेरचे खाणे, चुपचाप आपल्या खोलीत गाणी ऐकत पडुन राहणे इतकेच करायची.
पाहता पाहता ते वर्ष संपले. पिंकी दहावीत गेली यावर्षी. सगळी मरगळ झटकुन अभ्यासाला लागली. बाकीचे सगळे आणि सगळं अजुन तसेच होते. आता परत ती अधुनमधून आजारी पडू लागली. कोणाला काही सांगणे बंद केले होते तिने. ताप आला घेतली क्रोसीन, खोकला आला बेनेड्रिल घेतला असं सुरू झाले. समीक्षाला तर काही माहितच नव्हते. झोपलेल्या पिंकीकडे पाहून समीक्षा एकच विचार करायची, ‘माझ्या पिल्लूला शिकवून खूप मोठी करायच आहे, तिचे चांगले भविष्य घडवायचे आहे.’ पण या सगळ्यात मुलीच्या मनाची ओढाताण तिला दिसत नव्हती.
एकेदिवशी रूममध्ये गाणे ऐकत बसलेली पिंकी अचानक धाडकन खुर्चीवरून खाली पडली. आवाज ऐकून समीक्षा धावत आली. पाहते तर काय पोरगी हालचाल न करता जमिनीवर पडुन होती. लगेच तिला हाॅस्पिटलला नेण्यात आले. वेंटिलेटरवर ठेवण्यात आले. उपचारांना पिंकी अजिबात प्रतिसाद देत नव्हती. दोन दिवसांनी ती शुद्धीवर आली. आईला जवळ पाहून तिला आनंद झाला. आईला पाहून पिंकी खोल गेलेल्या आवाजात बोलली, ‘मां, लग जा गले की फिर ये हँसी रात हो ना हों, शायद फिर इस जनममें मुलाक़ात हों ना हों’। पिंकीचे आवडते गाणे हे. समीक्षा हसून बोलली, गप नौटंकी, पण कुठेतरी तिच्या मनात खोलवर धोक्याची घंटा वाजली. हाॅस्पिटलमध्ये पिंकीच्या खूप टेस्ट झाल्या, ब्लडटेस्टपासून ते बोनमॅरोपर्यंत. दुर्दैवाने प्रत्येक टेस्टमध्ये काही ना काही निगेटिव निघतच गेले. डाॅक्टर सांगायला लागले, शरीरात खोलवर मुरलेले दुखणे आहे हे, लहानसहान आजारावर मनाने औषध घेवून शरीर आतून पुर्णपणे कमजोर झाले आहे आणि त्यातून मुलीची इच्छाच नाही बरे होण्याची. आता समीक्षाच्या पायाखालची वाळू सरकली. ती सतत मुलीच्या सोबत राहू लागली, तिला धीर देवू लागली. पण पिंकी शून्य नजरेने पाहत राहायची फक्त.
आजी पिंकीला भेटायला आली. तिला पाहून पिंकीच्या डोळ्यात थोडी चमक आली. हळूच आजीच्या कानात ती बोलली, ‘आजी आता बघ आई कशी माझ्याजवळ बसली आहे!’ आजीला त्याक्षणी दुखण्याचे मूळ सापडले. त्याच रात्री पिंकी हे जग सोडुन निघून गेली.
समीक्षाला सासूबाईंनी पिंकीचे शेवटचे शब्द सांगितले तेव्हापासून तिने मोबाईलला हात नाही लावला. परतपरत ती हेच म्हणायची, ‘माझी पिल्लू तिचे दुखणं घेवून माझ्याकडे येत होती तेव्हा मी तिच्या भविष्यासाठी पैसे साठवत होते, मला हे का नाही कळलं ती असेल तरच तिचे भविष्य असेल.’
आपण सगळेच आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याची स्वप्न पाहतो, त्यासाठी कष्ट घेतो. पण मुलांना फक्त त्यांचा आज आनंदात जायला हवा असतो. आपले आईवडील आज आपल्यासोबत आहेत म्हणजे आपण त्यांच्यासाठी महत्वाचे आहोत असे त्यांना वाटते. नेहमी आॅफिसच्या, घरच्या कामात बुडालेले पालक पाहून मुलांना आपण दुर्लक्षित आहोत असे वाटू शकते. लक्षात ठेवा, पालक किती आणि कोणासाठी कमावतात याच्याशी मुलांना जास्त देणंघेणं नसतं infact ती कधी म्हणतही नाहीत आमच्यासाठी इतकं कमवा असं, हे तर आपण स्वतःलाच पटवुन देतो की मी हे मुलांसाठी करतो/करते. आपले करियर ही नक्कीच महत्वाचे आहे परंतु करियर आपण परत बनवू शकतो पण एकदा मुलांचे बालपण सरले की ते परत आणता येत नाही. So enjoy the phase of motherhood and parenthood when still there is time. आपण या जगात मुलांना आणले म्हणून आपले आद्य कर्तव्य आहे त्यांची शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या काळजी घेणे, त्यांना क्वालिटी टाईम देणे. मुलांना समोर बसवून हजेरी घेतल्याच्या थाटात हं आज काय झाले शाळेत असे विचारणे म्हणजे काळजी नव्हे तर जेव्हा जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हा तेव्हा उपलब्ध असावे. किशोरवयीन मुलं हा तर अजुन अवघड विषय. त्यांच्यावर हेलिकाॅप्टरसारखे घिरट्या घालणं किंवा पुर्ण स्वातंत्र्य देणे दोन्ही चुकीचे. समीक्षाने पिंकीच्या बाबतीत अक्षम्य चूक केली. दुरचे पाहण्याच्या नादात ती जवळचं पाहणे विसरूनच गेली. पण पुढच्यास ठेच मागचा शहाणा या न्यायाने आपण सर्व बोध घेवू.