24/10/2022
#तीर्थोदक
नलूआजी आम्हा नातवंडांची सगळ्यात लाडकी आजी. म्हणायला ती बाबांची काकू. पण ती सगळ्यांचीच माऊली होती. नियतीने तिला मातृत्वाचं सुख दिलं नाही; पण ममतेचं वरदान भरभरून दिलं होतं. बाबांचं शालेय शिक्षण तिच्या घरी झाल्याने तिला त्यांचा पुत्रवत् लळा होता.
नलूआजी आपल्या काळाच्या बरीच पुढे होती. आपल्या संस्कारांची कास न सोडता देखील आधुनिक विचारांचा प्रासंगिक अवलंब करणं हे तिचं वैशिष्ट्य! सणावारांमध्ये, बाळंतपणांमध्ये, लग्नामुंजींमध्ये तिचा तना-मना-धनाने सर्वांना पाठिंबा असायचा. सोवळ्याला स्वच्छतेनं, परंपरांना कर्तृत्वानं आणि अहंभावाला उदारतेनं रिप्लेस करणारी एक silent revolutionary वाटायची ती मला.
वसंताआजोबा आणि नलूआजीची जोडी म्हणजे राम-सीता. सदैव इतरांच्या उपयोगी पडणे, इतरांच्या जीवनात आनंद आणणे हा दोघांचाही स्वभाव होता. वसंताआजोबा हे मैफिली स्वभावाचे, राजस, खुशरंग वृत्तीचे होते; तर नलूआजी काहीशी विरक्त, सात्त्विक, ऋजु स्वभावाची. पण दोघांचं प्रेम हे अगदी उदाहरण द्यावं असं आदर्शवत् होतं. वसंताआजोबांनी हौसेनं तिला सारे दागिने घडवावे, आणि नलूआजीने साधे मंगळसूत्र घालून सुती साड्यांमध्ये वावरावे. सीता-रामांच्या भाळी वियोगाचे भोग होते; यांच्याही नशीबी तेच आले. आजोबांच्या पश्चात् ती २१ वर्ष एकटी राहिली; त्यातली १८ वर्ष आजारपणात!
नलूआजीनं आयुष्यभर सर्वांना लळा लावला, पण कोणाचाही पाय गुंतवून ठेवला नाही. तिचं “नलिनी” नांव होतं, अन् आत्मभाव कमलपत्रावरच्या जलबिंदुसारखा निर्लिप्त होता. तिचं माहेर इंदूरचं असल्यानं तिच्या बोलण्यात मधून-मधून एखादा हिंदी शब्द यायचा. “ज्याला आपल्या कोख मधून जन्म दिला, त्याच्याच कडून अपेक्षा करता येते, पण तोही पूर्ण करेल याची काय गॅरंटी?” असं वाक्य मी एकदा तिच्या तोंडून ऐकलं होतं. ती तिची अगतिकता नसून निरपेक्ष स्वीकारोक्ति होती.
ती आध्यात्मिक पातळीवर अतिशय उन्नत होती. स्वतः मीरा-भावाने कृष्णभक्तीत तल्लीन असायची. बाहेरून सर्वांत मिसळलेली दिसली, तरी आतून तिचं अनुसंधान सुरु होतं. जीवनाच्या शेवटच्या काळात देहभान व्यवस्थित नसतांना देखील तिची जपमाळ सुटली नाही.
सुरुवातीला आजारपणातून ती तशी बरी झाली होती. पण तेंव्हापासून ती एकटेपणाच्या कोषात बंदिस्त होऊन राहिली. नरेंद्रनगरातल्या घरातून ती शेवटच्या जवळ-जवळ एक दशकापासून बाहेर पडली नाही. आमचे ममता काकू आणि राजू काका यांनी तिची यथाशक्ति सेवा केली. पण काही अपरिहार्यतांमुळे तिचा अंतकाळ मात्र हेल्थकेयर सेंटर मध्ये गेला. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आमच्या नलूआजीची जरारोगाने पार रया गेली होती. नियतीने तिचे एक एक गात्र शिथिल करीत तिच्याशी पाठशिवण खेळली. शेवटी दिवाळीतल्या चतुर्दशीला ही कृष्णभक्तीची ज्योत कृष्णतत्त्वात विलीन झाली.
माझी मौंज वसंताआजोबा-नलूआजी यांच्या मांडीवर लागली होती. त्या नात्याने ते माझे धर्मपालक होते. त्यांचं, विशेषतः नलूआजीचं दुःख हलकं करण्यासाठी मी काहीच उपयोगात येऊ शकलो नाही, याची मला फार खंत वाटते.
तिचं जीवन दुःखमय असलं, तरी केविलवाणं अजिबात नव्हतं.
बोरकरांच्या शब्दात सांगायचं झाल्यास,
“देखणी ती जीवने जी तृप्तीची तीर्थोदके
चांदणे ज्यातून फाके शुभ्र पार्यासारखे”
श्वेत-धवल सुती किंवा कोसाच्या साडीतलं नलूआजीचं रूप आठवलं, की परहिताच्या तृप्तीची तीर्थयात्रा घडते.
आज ती इहभोगातून मुक्त झाली. तिचा सत्कर्मांचा पुण्यसंचय बघता, तिला सद्गति मिळणार हे निश्चित. पण मला मात्र तिची क्षमाच मागावीशी वाटते.
आणि कृष्णाकडे तिच्या बंधमुक्तीचं दान मागावंसं वाटत.
नलूआजीला साश्रु श्रद्धांजली!
🥲🙏🏻