06/03/2023
#रास्तेवाडा_दत्त_मंदिर
मागे माझ्या कुठल्यातरी पोस्टवर कुणीतरी कमेंटस मध्ये "आता पुण्याला आला आहात रहायला तर पुरातन रास्तेवाडा दत्त मंदिरात अवश्य जाऊन या" असं सुचवलं होतं. आता माझी ती पोस्ट कुठली आणि त्यावर कुणी ही कमेंट केली होती हे मला काही काही म्हणून आठवत नाही. फेसबुकवर सर्च इंजिन वापरून शोधण्याचा प्रयत्न केला पण यश नाही आलं. पण तेव्हापासून मनात होतं या मंदिरात जायचं. अनेकदा ठरवलं, पण योग काही येईना. पण ईश्वरेच्छा असल्याशिवाय योग येत नसतो हेच खरं. पण ती असली की सगळं आपसूकच जुळून येतं. आपल्याला फार काही नाही करावं लागत.
तर रास्ते वाडा दत्त मंदिरात जाण्याचा योग असाच अवचित जुळून आला. काही कामानिमित्त मला परवा मंडई परिसरात जायचं होतं. पाषाणहुन गावात जाणं तसं लांब पडतं. तसं अंतर फार नाहीये, पण बाय रोड जाण्याशिवाय पर्याय नसतो (कारण इथे मुंबईसारखी लोकल ट्रेनची सोय नाही) आणि त्यामुळे ट्रॅफीक हा प्रकार अपरिहार्य असतो. साधारण नऊ साडेनऊच्या सुमारास असलेलं पीक ट्रॅफीक टाळण्यासाठी म्हणून सईला सकाळी ८ वाजता स्कुल बसला ड्रॉप करून मी तशीच बाहेर पडले. रिक्षा केली. रिक्षात बसल्यावर लक्षात आलं आपण एवढ्या लवकर निघालोय खरं पण दुकानं काही १०.३०-११.०० शिवाय उघडायची नाहीत. मग इतक्या लवकर तिथं पोचून आपण काय करणार? मग एकदम रास्तेवाडा दत्त मंदिर आठवलं. रिक्षात बसताना रिक्षावाल्याला आधी मंडई सांगितलं होतं. त्याला म्हटलं "दादा, मंडई ऐवजी रास्ता पेठेत न्याल का? मला रास्तेवाडा दत्त मंदिरात जायचं आहे." पण त्याला काही हे मंदिर माहीत नव्हतं. तो म्हणाला "ताई, तुम्ही रस्ता सांगा मी नेतो". आता आली का पंचाईत. मला तरी कुठे माहीत होता रस्ता. नेमकं कसं कुणास ठाऊक जीपीएस ही सोय माझ्या मोबाईल मध्ये आहे याचा मला सपशेल विसर पडला (बहुतेक मी त्यांना स्वतः शोधावं अशी महाराजांची इच्छा असावी. कारण एरवी अगदी सर्रास जीपीएसचा वापर करणारी मी, नेमकं त्याच दिवशी असं का घडावं?). पण एवढं माहीत होतं की हे मंदिर केईएम हॉस्पिटल जवळ आहे. त्याला म्हटलं "केईएम हॉस्पिटल माहीत आहे ना? बस, तिथे सोडा". त्यानुसार, साधारण ३५ मिनिटांनी त्यांनी मला केईएम हॉस्पिटलच्या मेन गेटला सोडलं. गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला विचारलं तर त्याला माहित नव्हतं. गेटच्या बाहेरच एक चहाची टपरी होती. तिथे दोघे तिघे चहा पीत बसले होते. हॉस्पिटलच्या गणवेषात असल्याने तिथलाच स्टाफ असणार हे कळत होतं. त्यांनी "बाजूच्या रस्त्याने सरळ आत जा, डाव्या बाजूला काका हलवाईचे दुकान लागेल. त्याच्या बरोबर समोर एक गल्ली आहे. त्या गल्लीत सरळ आत जा, तिथेच आहे रास्ते वाडा आणि दत्त मंदिर" असं अगदी अचूक मार्गदर्शन केलं. त्यानुसार, साधारण ७ एक मिनिटं चालले. पण त्या गल्लीत इतकं खोदकाम आणि नवीन बांधकाम सुरू होतं, मोठमोठ्या मशिन्स लावलेल्या होत्या, त्यामुळे क्षणभर शंका आली मनात "नक्की इथेच असेल ना मंदिर?" कारण त्या परिसरात कुठेच दत्त मंदिराकडे जाण्याचा रस्ता किंवा अशी तत्सम पाटी दिसली नव्हती. शेवटी एका बांधकाम मजुराला विचारून घेतलं आणि शंकेचं निरसन करून घेतलं. हो, मी योग्य मार्गावरच होते.
चालत चालत पुढे गेले आणि उजव्या हाताला एक अतिशय जुना वाडा दिसला. वाडा हा प्रकार माझ्यासाठी काही नवीन नाही, कारण आमच्या नाशकातही खूप वाडे पाहिले आहेत मी लहानपणापासून. पण हा वाडा काही औरच होता. वाड्याच्या बाहेरूनच आत काहीतरी दैवी, अलौकिक वसलं आहे हे जाणवत होतं. अतिशय शांत आणि तरीही स्ट्रॉंग स्पंदनं जाणवत होती. बाहेरची ती श्री गुरुदेवदत्त ही पाटी पाहून अगदी भारावूनच गेले मी. त्या तशाच अवस्थेत आत शिरले.
वाड्याच्या आत शिरल्यावर समोर राम मंदिर आणि उजवीकडे दत्त मंदिर आहे. आधी साहजिकच पाय दत्त मंदिराकडे वळले. आत गाभाऱ्यात गुरुजींची पूजा चालली होती. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारातच ते पाठमोरे बसलेले असल्याने समोर फक्त दत्त महाराजांची तसबीर दिसत होती. त्याखाली काय होतं ते कळत नव्हतं. काही वेळ मी इथून तिथून डोकावण्याचा प्रयत्न केला, पण दिसेना. म्हणून मग गुरुजींची पूजा सुरू आहे तो पर्यंत प्रदक्षिणा घालू असा विचार आला मनात. प्रदक्षिणा घालत असताना महाराज इथे औदुंबर वृक्षाखाली आणि पूर्वाभिमुख आसनस्थ असल्याचे लक्षात आले. पहिल्याच प्रदक्षिणेला उजव्या बाजूच्या जाळीदार झरोख्यातून आत पाहिलं आणि महाराजांच्या काळ्या पाषाणातील पादुकांचे दर्शन झालं. वाडीच्या मनोहर पादुकांची आठवण झाली एकदम कारण या पादुका तशाच भासल्या मला. तसंच, चंदन लेपन केलं होतं, पुष्प आणि तुलसीपत्र वाहिलेली होती. ते दर्शन नेत्रसुखद आणि मनाला खोलवर तोषवणारं होतं अगदी. पण हे दर्शन अगदी जेमतेम मिनिटभरच मिळालं मला. त्यानंतर गुरुजींनी त्या पादुकांवर एक मोठं आसन ठेवलं आणि त्यावर एक मुखी मुखवटा बसवला. चांदीचा मुकुट, कानात चांदीची मासोळीच्या आकाराची कुंडले आणि गळ्यात रुद्राक्षाची मोठी माळ. त्यानंतर, गुरुजींनी वेगवेगळ्या फुलांनी महाराजांना अतिशय सुंदर सजवलं. गाभाऱ्याबाहेर मंदिरातील त्रैमूर्तीचा फोटो लावलेला होता. त्यादिवशी मात्र एकमुखीच मूर्ती पहायला मिळाली. बहुतेक ती विष्णू प्रधान असावी कारण संपूर्ण पूजेत गुरुजी भरपूर तुळस वाहत होते, बेल अजिबात नव्हता (अर्थात हा मी लावलेला कयास).
गाभाऱ्यासमोर उभी राहून सगळी पूजा, महाराजांचं शृंगार पाहायला मिळाला. तेवढ्यात राम मंदिरात आरती सुरू झाली. म्हणून तिथं गेले. छान आरती मिळाली, सुरेख दर्शन झालं. परत दत्त मंदिरात आले. एव्हाना तिथंही गुरुजींची पूजा झाली होती. नैवेद्य दाखवून त्यांनी आरती केली. आरतीच्या वेळी अतिशय प्रसन्न वाटत होतं. डोळे आणि मन भरून महाराजांचं दर्शन घेतलं. असं अवचितपणे आपली इच्छा पूर्ण करणारे आपले दत्त महाराज... किती कनवाळू माय आहे ती! ही भावना पुन्हा पुन्हा मनात उचंबळून येत होती आणि डोळे भरून येत होते.
गुरुजींकडे विचारणा केली असता असं समजलं की पेशव्यांचे सरदार श्रीमंत बळवंतराव रास्ते हे एकनिष्ठ दत्तभक्त होते. त्यांनी श्री क्षेत्र गाणगापुरी राहून श्रीचरणी खूप सेवा केली. या मंदिरातील प्राचीन औदुंबर वृक्षाच्या तळाशी उत्खनन केल्यावर श्रीदत्त पादुका निघाल्या. त्या पादुकांची रीतसर स्थापना करून तेथे एक छोटेसे मंदिर उभारण्यात आले. सरदार रास्ते यांचे देवभाविक कारभारी श्री. परांजपे यांनी रास्ते सरकारांची परवानगी घेऊन हे मंदिर मूळ स्वरूपात उभारले. सरदार रास्त्यांचा रास्तेवाडा इ.स. १७७८ मध्ये बांधण्यात आला व त्यानंतर म्हणजे सुमारे दीडशे, पावणेदोनशे वर्षांपूर्वी ह्या श्री दत्तमंदिराची स्थापना झाली असावी. मूळ दत्त पादुकांवर श्री दत्तात्रेयांची एकमुखी पाषाणमूर्ती असून त्यावर त्रीमुखी दत्ताचा मुखवटा चढवून, भोवती रंगीत फुलांची अतिशय सुंदर आरास करण्यात येते. श्री दत्तात्रेयांचे हे पुण्यातील पुरातन शक्तीपीठ असल्याचे दत्त भक्त मानतात व अत्यंत श्रद्धेने इथे येतात.
पुण्यात स्थायिक झाल्यापासून महाराजांच्या अधिक जवळ जायला मिळतं आहे, त्यांच्यावरील श्रद्धा अधिकाधिक दृढ करणारं दत्त वाङ्मय वाचायला मिळतंय, विविध जागृत दत्त क्षेत्रांना भेट देता येतेय या पेक्षा अधिक एका दत्त भक्ताला अजून काय हवं? त्यांची कृपादृष्टी, त्यांचं सान्निध्य सतत असंच लाभत राहो हीच त्यांच्याच चरणी प्रार्थना.
||श्री गुरुदेव दत्त||
रास्ते वाडा दत्त मंदिर पत्ता - ४४९, मुदलियार मार्ग, सोमवार पेठ, पुणे (जवळचा लॅन्डमार्क - केईएम हॉस्पिटल)
गुगल मॅप लोकेशन - https://g.co/kgs/Frzfgd
ता. क. - ज्या कुणी भल्या माणसाने मला रास्ते वाड्याच्या दत्त मंदिराबद्दल सांगितलं त्याचे आभार मानावेत तितके कमीच. कधी कधी कुणा ना कुणाच्या रूपाने महाराज आपल्या स्थानाबद्दल आपल्याला सुचवतात, माहिती देतात आणि मग दर्शनाचा योगही जुळवून आणतात. त्यामुळे, माध्यम ठरलेल्या त्या व्यक्तीचे आभार मानणे माझ्या दृष्टीने फार महत्वाचे आहे. हे स्थान सुचवणाऱ्या व्यक्तीच्या वाचनात हा लेख आल्यास कृपया या पोस्टवर कमेंट करून मला तसं सांगाल का प्लिज? मला आपले व्यक्तिशः आभार मानायचे आहेत.