23/08/2021
nwin malika
आज पासून ‘न लिहिलेली पत्रे’ वर नियमित मालिका लेखन करणाऱ्या लेखिका व चित्रकर्ती जयश्री दाणी यांची एक वेगळी मालिका सुरु करीत आहोत मालिकेचं शीर्षक आहे “चित्रोक्ती”. ही मालिका सोमवार व बुधवारी प्रकाशित होईल,आज या मालिकेच्या विषयाचा परिचय देत आहोत.
जयश्री मनापासून स्वागत !
+++++
(विषयाचा परिचय करून देणारे पत्र)
प्रिय वाचकवृंद
अश्मयुगीन मानवाने शिलाखंडावर रेघोट्या ओढत चित्रकलेचा पाया घातला. आदिमानवाने त्याकाळी निर्मिलेली भित्तिचित्रे अनन्यसाधारण आहेत. आदिमानवाची कला म्हणजे त्याच्या यातुविद्येमधील एक विधी होता. यातुविद्या म्हणजे प्रतिकूलतेतही मनगुंग होऊन जीवनकलहास तोंड देण्याची अध्यात्मविद्या. मानवी बुद्धिशक्तींना दुर्गम अशा शक्तिसिद्धी यातुविद्येतून मिळत असल्याने प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या या चित्रकिमयेशी मानव आदिम काळापासून जुळलेला आहे.
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांमधली एक मुख्य कला म्हणजे चित्रयोग! चित्र म्हणजे शब्दांविना साधला, समजविला जाणार संवाद. चित्रकर्म म्हणजे असामान्य कृती व चित्रकर्मा म्हणजे चमत्कार करून दाखविणारा जादूगार किंवा कलावंत. तसेच चित्रोक्ती आणि चित्रकथालाप या शब्दांचे अर्थ म्हणजे अद्भुत कथा, सुसंवादी निरूपण असे होय. यातील सुसंवादित्व हीच सर्व कलेची अंगभूत प्रेरणा आहे.
रंग अथवा रंगद्रव्ये, लेखणी, कुंचला यांसारखी लेपनसाधने, रंगद्रव्यांच्या ग्रहण-प्रसरणासाठी लागणारी जल, तैल, गोंद, मेण यांसारखी ग्रहणद्रव्ये आणि लेपनासाठी आधारभूत चित्रफलक ही चित्राकृतीची प्रारंभिक माध्यम-साधने होत. भिंत, कापड, कागद, फळी अशी विविध वस्तुद्रव्ये चित्रफलक म्हणून वापरली जातात. गिलाव्यासाठी वापरलेले वस्तुद्रव्य, त्याची रंगग्रहणाची क्षमता यामुळे भित्तिचित्राच्या माध्यमाला मर्यादा पडतात. पण विपुल, सुरक्षित क्षेत्र आणि टिकाऊ स्थैर्य यांमुळे या मर्यादेतही जगातील बहुतेक प्राचीन संस्कृतींनी हे माध्यम सुप्रतिष्ठित केलेले आहे. पुढे चित्रफलक म्हणून कागदाचा वापर होऊ लागल्याचे सर्वश्रुतच आहे.
कलावंताच्या मनावर दृश्य विश्वातील वस्तूंचा, विशेषतः त्यांच्या आकारांचा भावनात्मक परिणाम होतो. त्याच्या अंतर्यामी काहीएक भावगर्भ आकृती प्रदीप्त होते. आशय, माध्यम आणि अभिव्यक्तिप्रकार यांनुसार ती आकृती रेखाटल्या जाते. त्यासाठी तैलचित्र, जलरंगचित्र, मेणरंगचित्र, रंगशलाकाचित्र, चिक्कणितचित्र असे माध्यमप्रकार हाताळल्या जातात.
तंत्ररीती आणि व्यावहारिक उपयोजनेनुसार भित्तिचित्र, लघुचित्र, अलंकृतपट्ट असे प्रकार होतात. वस्तुनिष्ठ आशयानुसार व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, सागरचित्र, स्थिरवस्तुचित्र, ऐतिहासिक, पौराणिक, लोकघाटी वा प्रायिक चित्र असे प्रकार होतात. कलावंतांच्या कलाविषयक भूमिकांनुसार अभिजाततावाद, वास्तववाद, स्वच्छंदतावाद, दृक्प्रत्ययवाद, घनवाद, रंगभारवाद, दादावाद, अतिवास्तववाद, अभिव्यक्तिवाद, बिंदुवाद, नवकालवाद, अप्रतिरूप कला, क्रियाचित्रण, दृक्भ्रमकला, जनकला असे अनेक कलासंप्रदाय रूढ आहेत.
आदिम काळापासून दृश्य विश्वाबद्दल माणसाला कुतूहल वाटत आले आहे. हाताच्या तळव्याचे ठसे भिंतीवर उमटवून जणू त्याने आपल्या अस्तित्वाचा ठसा आपल्या निवासावर उमटविला. ही आदिम मुद्रिताकृती होय. अशा हस्तमुद्रितांनी भिंतीवर सजावट करण्याची प्रथा आजही आढळते. भिंतीवर टेकलेल्या तळव्याभोवती रंग फुंकून ऋणचित्र उमटविण्याचे कसबही मनुष्यप्राण्याने हस्तगत केले. रंग कमी जास्त पातळ करून त्याने उठावांची विविधता मिळविली.
हिंदू धर्मातील विष्णूधर्मोत्तर पुराणामध्ये भारतीय चित्रकलेचा स्रोत आहे. भारत, चीन आणि इजिप्त या देशात प्राचीन काळापासून चित्रकला अस्तीत्वात होती.
आधी पुराणातील विविध प्रसंगानुरूप चित्रे रेखाटली जाऊ लागली, त्यास पौराणिक चित्रकला म्हणतात. मध्ययुगीन चित्रकला, युरोपीय चित्रकला, वास्तवदर्शी कला, आशियायी चित्रकला असे चित्रकलेचे विविध प्रकार आहेत.
चित्रकलेचा इतिहास अतिशय पुरातन आहे. राजा रवी वर्मा, रविंद्रनाथ टागोर, अवनिंद्रनाथ, अमृता शेरगिल, टर्नर, लिओनार्डो-द-व्हिन्सी, रॅफेल, मायकेल अँजेलो, व्हॅन गॉग, हुसेन, हेब्बर, रझा, गायतोंडे, बि. प्रभा यांसह अनेक महान चित्रकार एेतिहासीक कालखंडात होऊन गेलेत. अशाच सुप्रसिद्ध चित्रकारांचा परिचय आपण या पत्रमालिकेद्वारे करणार आहोत.
आपली
जयश्री