19/03/2019
होळी......
खेळा! पण जरा जपून
सौजन्य : खासदार डॉ. विकास महात्मे व महात्मे आय बँक आय हॉस्पिटल ची चमू
“होळी’ – शब्द ऐकताच आपल्याला उत्साहाचं उधाण येतं ; एका चैतन्यमय कल्पनेनं मन आनंदित होतं; आणि मरगळ झटकून आपण सगळे सिद्ध होतो – होळी खेळायला आणि स्वतःचा ‘बचाव’ करत इतरांना रंगवायला! अगदी कृष्णालाही या सणाचा मोह आवरला नव्हता. पण एक नेत्रतज्ञ म्हणून ‘होळी’ म्हटले कि माझ्या मनात मात्र जरा काळजी उत्पन्न होते.
होळीचे रंग आणि अपार आनंद हे समीकरण जरी खरं असलं तरी हेच रंग आरोग्याला घातकही ठरू शकतात. तेव्हा होळीचे रंग खेळताना डोळ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काय करता येईल ते बघू.
डोळ्यात रंग गेला तर काय करावे?
हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. डोळ्यात रंग गेल्यास ताबडतोब नळाच्या पाण्याने डोळा धुवावा. ‘डोळा धुवायचा’ म्हणजे पापण्या पुसायच्या असे नसून पापणी उघडून डोळ्याच्या कडेने पाण्याची धार सोडून २ मिनिटे पर्यंत डोळा धुवायचा आहे. या प्रक्रियेद्वारे हानिकारक रंग – रसायन डोळ्यातून काढून टाकता येतात. तरीही पापण्यांच्या खोबणीत रंग अडकलेला असतो. त्यासाठी जवळच्या दवाखान्यात (नेत्र तज्ञाकडे गेल्यास अधिक बरे) अथवा फ̆मिली डॉक्टर कडे जाऊन प्राथमिक उपचार घेता येतील. एवढे सगळे केले तरी शक्य तितक्या लवकर नेत्र तज्ञास दाखवायलाच हवे.
डोळ्यात रंग गेल्यास डोळा लाल होणे, डोळ्यावर सूज येणे, दुखणे, डोळा आतून खुपणे इत्यादी त्रास उदभवतात. रंगात हानिकारक द्रव्ये असतील तर डोळ्याचे बुबुळ (Cornea) अपारदर्शक होवून पांढरे पडू शकते – ज्याला आपण डोळ्यात टीक पडली असे म्हणतो. यामुळे अंधत्व ही येऊ शकतं.
सुरक्षित होळी साठी काय करावे?
· हानिकारक रासायनिक द्रव्ये असलेले रंग होळी करता वापरू नयेत. बहुतांश वेळा आपल्याला त्या रंगात कुठले घटक असतात तेच ठाऊक नसते. तेव्हा नैसर्गिक व सुरक्षित रंग वापरावेत.
· रंग खेळताना सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही कडेने बंद असलेला चष्मा वापरता येईल.
· वौर्निश सदृश रंग, ओईल पेंट इत्यादी होळी खेळण्यासाठी वापरू नयेत.
· रंग डोळ्यात जाण्याव्यतिरिक्त रंग लावताना होणाऱ्या झटापटी मुळे डोळ्याला मार लागण्याची शक्यताही असते. तेव्हा पिचकारी वापरताना अणकुचीदार टोक असलेली पिचकारी वापरू नये.
· रंग खेळण्यासाठी काचेच्या बाटल्या वापरू नयेत.
· रंग अथवा पाणी भरलेल्या पिशव्या अथवा फुगे फेकून मारल्या मुळेही गंभीर इजा होऊ शकते. तेव्हा याचा वापर टाळावा.
होळी आनंद साजरा करण्याचा सण असून एकमेकांना मारण्याचा अथवा इतरांचे खच्चीकरण करण्याचा सण नव्हे ही बाब मनात रुजवायला हवी. अशी मानसिकता असेल तर होळी सर्वासाठी सुरक्षित व आनंददायक ठरेल.
चला तर मग... खेळू या होळी... सावधानता बाळगून...