04/12/2023
■ दत्तजयंती निमित्ताने गुरुचरित्राचे पारायण.
■ संकलन : नक्षत्र ज्योतिष, सोलापूर.
● गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेपासून आठ दिवस आधी पारायण सुरू करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच ' दत्तजयंती ' होय.
● गुरुचरित्राचे पारायण शनिवारी प्रारंभ करुन शुक्रवारी या पारायणाची सांगता करण्याचा प्रघात आहे. परंतु काही दत्तभक्त दत्तजयंतीच्या पवित्र दिवशी उद्यापन करता येईल या हिशेबाने पारायण करतात.
● या वर्षी दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी ' दत्तजयंती ' असून त्यापूर्वी आठ दिवस अगोदर म्हणजे...
●दि. १९ डिसेंबर २०२३,पासून
गुरुचरित्र पारायणास प्रारंभ.
● दि. २५ डिसेंबर २०२३,गुरुचरित्र पारायण समाप्ती.
● दि. २६ डिसेंबर २०२३,
' दत्त जयंती ' दिवशी गुरुचरित्र पारायणाचे उद्यापन.
● दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा १४८०च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच ‘गुरुचरित्र’ हा ग्रंथ. या प्रासादिक ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत व त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे.
◆ सप्ताह पद्धती
१ ला दिवस :- १ ते ९ अध्याय
२ रा दिवस :- १० ते २१ अध्याय
३ रा दिवस :- २२ ते २९ अध्याय
४ था दिवस :- ३० ते ३५ अध्याय
५ वा दिवस :- ३६ ते ३८ अध्याय
६ वा दिवस :- ३९ ते ४३ अध्याय
७ वा दिवस :- ४४ ते ५३ अध्याय
श्री गुरुचरित्र पारायण असे करावे.
◆ अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा सामान्य संकेत व नियम
● वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असे असावे. उरकण्याच्या दृष्टीने ऊच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणा-या अर्थाकडे असावे.
● वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तरा भिमुखच बसावे.
● वाचनासाठी ठरविक वेळ, ठरविक दिशा व ठरविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्मात बदल होऊ देऊ नये.
● श्रीदत्तात्रायांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व तीत श्रीदत्तात्रायांना अवाहन करावे.
● सप्ताहकालात ब्रम्हचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत पणाने व स्वच्छ धूत आणि पांढरे वस्त्र परिधान करुन करावे . सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूधभात. (मीठ-तिखट, अंबट, दही, ताक वर्ज. साखर घ्यावी. गूळ घाउ नये. गव्हाची पोळी (चपाती), तूप,साखर घेता येते.)
● रात्री देवाच्या सन्निध्यात चटईवर अथवा पांढ-या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीचा दृष्टीने संदेश ऐकू यातात, असा श्रद्धेने अनुष्ठान करणा-यांचा अनुभव अहे.
● वाचनाच्या काळात मध्येच असनावरून उठू नये किंवा दुस-याशी बोलू नये.
● सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात. कारण शुक्रवार हा श्रीगुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय.
● सप्ताह पूर्ण झाल्यानंतर सातव्या दिवशी, शक्य तर अठव्या दिवशी, सुपारीतून श्रीदत्तात्रायांचे विसर्जन करावे, आणि नैवेद्य, आरती करून, भोजनास सवाष्ण, ब्राम्हण सांगून सांगता करावी. महा नैवाद्मात शक्यतो घेवड्याची भाजी असावी.
● ' गुरुचरित्र ' या पवित्र ग्रंथाचे वाचन स्त्रियांनी करावे का ? का करु नये ? या वादात न पडता, स्त्रियांनी वासुदेवानंद सरस्वती ( टेंबे स्वामी ) यांनी रचलेले ' सप्तशती गुरुचरित्र ' या ग्रंथाचे वाचन करावे कारण या ग्रंथाच्या वाचनाने, पारायणाने देखील ' गुरुचरित्र ' ग्रंथाच्या वाचनाचे, पारायणाचे फल मिळते, असे स्वतः टेंबे स्वामी यांनी सांगितले आहे.
|| श्री गुरुदेव दत्त | श्री गुरुदेव दत्त | श्री गुरुदेव दत्त ||