27/05/2021
२८ मे - जागतिक पोषण दिवस
अन्न, वस्त्र आणि निवारा - या खरंतर माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. नुसतेच उदरभरण करणे, काहीही-कोणत्याही प्रमाणात खाणे म्हणजे आहार नव्हे. आपण ग्रहण करत असलेल्या अन्नातून आवश्यक पोषक द्रव्ये मिळतं आहेत का ? हे जाणणे येथे आवश्यक आहे. खरं पहिले तर - काय खावें ? कश्या स्वरूपात खावे ? अन्नपदार्थांमध्ये बदल करण्याची आणि त्याची निवड करण्याची अद्भुत शक्ती हि निसर्गाने फक्त माणसाला दिली आहे . तरी सुद्धा आज २१व्या शतकात येऊनही कुपोषण आणि अन्नघटकांची कमतरता आपल्याला सर्रास बघायला मिळते.
स्त्रियांमध्ये तर हि कमतरता अधिकच असतें. कमी भाजी असली तर पोळी लोणचे -चटणी सोबत खाणे, दुध आवडतच नाही असे सांगून चहा पिणे , फळ-सलाड फक्त नवऱ्याला-मुलांना देऊनच तृप्त होणे आणि चिकन-मास्यांचे तुकडे सगळ्यांना वाढून कालवणावर संतुष्ट होणाऱ्या आपल्या महिला समतोल आहार नसल्याने आरोग्याची अपरिमित हानी करून घेतात. आणि त्यातच आजकाल लवकर येणारी पाळी, पाळीमध्ये होणार अतिरिक्त रक्तस्त्राव, एकामागे एक होणारी गर्भधारणे, गर्भपात , जास्त काळापर्यंत चालणारे स्तनपान, निकृष्ट आहार यामुळे विविध व्याधींना आमंत्रण देतात.
स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे अनेक महिलांचा आहार दिनक्रम कसा ? सर्वांगीण आहार, आहार-आरोग्य यांचा समन्वय आणि आरोग्यघटक याविषयीं त्यांचे ज्ञान किती ? हे कळते. आपल्याकडची परिस्थिति बघता खरंच कधी कधी खूप निराशा वाटते. घरातील सर्वांचा आहार जर योग्य आणि सर्वांगीण असेल तर बऱ्याच व्याधी आपण टाळू शकतो, आजारपणावर होणारा खर्च आपण टाळू शकतो,इतके साधे गणित अजून आपल्या काटकसरी महिलांना समजलेले नाही याचे मला खुपचं आश्चर्य वाटते.
घरातील स्त्रीने सर्वांगीण आहार आणि उत्तम आरोग्याविषयी दक्ष राहणे खूप महत्वाचे आहे . स्त्रीने ठरवले तर नक्कीच ती सर्वांना सकस आहाराची सवय लावू शकते,नाही का ??
पण यासाठी सर्वप्रथम तिचे स्वतःचे आरोग्य उत्तम असणे, तिला आरोग्याविषयी माहिती असणे, तिचा आहार व्यवस्थित असणे आवश्यक आहे.
आज आपण जाणून घेऊ मुख्यत्वे ‘आयर्न म्हणजेच लोह’ याविषयी - भारतातील ५०% स्त्रिया अनेमिक - म्हणजेच हिमोग्लोबीन कमी असते - त्यामुळे थकवा, चिडचिडेपणा, सतत आजारी पडणे, दम लागणे,पाळीत अंगावरून कमी जाणे,सतत गर्भपात होणे,कमी वजनाचे बाळ होणे, अंगावर दूध कानी येणे, डोकेदुखी ,अंगदुखी अश्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
आरोग्य उत्तम राखण्यासाठी स्त्रियांना १४ मिलिग्रॅम, पुरूषांना ८ मिलिग्रॅम, तर गरोदर स्त्रियांमध्ये २७मिलिग्रॅम आयर्नची आवश्यकता असते. यावरून हे स्पष्ट दिसून येते कि पुरुषाची ऊर्जेची गरज जरी स्त्रीपेक्षा अधिक असली तर आरोग्यघटकांची गरज ही दोघांना समान आहे. उलट स्त्रीच्या जीवनात पाळीच्यारूपाने, गर्भधारणेच्यारूपाने अन्नघटकांचा व्यय-वापर हा नियमित होत असतो आणि म्हणूनच स्त्रियांनी आपल्या आहाराबद्दल जागरूक असणे अतिआवश्यक आहे .
आरोग्य सल्ला
# सर्वांगीण व सर्वसमावेशक आहार घ्यावा.
# लोह, फोलिक ऍसिड, व्हिटॅमिन B12 या पोषणद्रव्यांनीयुक्त आहार घ्यावा
# हिरव्या पालेभाज्या,मोड आलेली कडधान्ये, चवळी, गूळ-शेंगदाणा,तीळ, खजूर,काळ्या मनुका ,लिंबू, संत्री , आवळा ,अंडी, मांस,मासे इ.
# पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी नियमितपणे दही-ताक यांचे सेवन करणे.
# लवकर वयात येणाऱ्या मुलींना आहाराचे महत्व समजावून सांगणे. त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात आयर्न-कॅल्शिअम चा समावेश करणे.
# पाळीमध्ये अधिक रक्तस्त्राव होत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे.
# गर्भनिरोधक साधनांचा वापर करून अवांछित गर्भधारणा व गर्भपात टाळणे.
# गर्भारपणात व स्तनपान करतांना अतिरिक्त व योग्य आहार घेणे. आयर्न-कॅल्शिअमच्या गोळ्या नियमित घेणे.
# आईच्या शरीराची झालेली झीज भरून निघण्यासाठी २ गर्भधारणांमध्ये उचित अंतर ठेवणे.
# अनेमियाची लक्षणे दिसल्यास त्वरित तपासण्या करून उपचार सुरु करणे
# आरोग्याची दुखणी-खुपणी अंगावर न काढता त्वरित आजाराचे निदान व उपचार करणे.
# वेळोवेळी सर्वसामान्य आरोग्य तपासणी करावी.
# तंबाखू, धूम्रपान टाळणे.
# लोहव्यतिरिक्त कॅल्शिअम साठी दूध, दुग्धजन्य पदार्थ, नाचणी, राजगिरा, सुकामेवा,अंडी, मासे, मांसाहार, केळी-सीताफळ सारखी फळे यांचा आहारात समावेश करावा.
# अन्नाचे उत्तम पचन होण्यासाठी सलाड- काकडी, गाजर, टमाटे, बिट आदी फायबरयुक्त पदार्थ, सालासकट फळे यांचे दररोज सेवन करावे.
# सर्वात महत्वाचे - रोज कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे.
# दररोज कमीत-कमी ३०मि. व्यायाम करावा.
चला तर मग, या संसाराची जननी असणाऱ्या स्त्रियांना आरोग्याविषयी जागृत करूया.
कारण- “निरोगी स्त्री तर निरोगी कुटुंब” 🙏🏻
डॉ. पूनम वराडे.
महिलांच्या आरोग्य निगडित माहितीसाठी ' HealthforWoman ' ब्लॉगपेज ला नक्की visit करा.
https://healthforwomanblog.wordpress.com