31/03/2020
*लॉकडाउन काळात शरीर व मनाचे आरोग्य कसे सांभाळावे?*
टीव्ही, व्हाट्सअप्प, फेसबुक इत्यादी social मीडिया सगळीकडे केवळ एकच एक चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे कोरोना व्हायरस. कधी नव्हे ते सरकारने सर्व प्रकारचे दळणवळण, ऑफिस वगैरे सगळे काही लॉकडाउन केले आणि तेही थोडे थोडके नाही तर २१ दिवसांसाठी. त्यामुळं प्रत्येक जण घाबरलेल्या स्थितीत आहे, पॅनिक झाला आहे.
मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, विविध कामांसाठी इतर लोकांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतच असतो. आता कोणालाही घरात बसण्याची सवय राहिलेली नाही.
संपूर्ण जगात कोरोना वर कोणतेही औषध अजून तरी उपलब्ध नाही. तर मग यापासून आपला बचाव कसा करायचा?
सर्वात महत्त्वाचा बचाव म्हणजे सरकारी आणि वैद्यकीय निर्देशांचे पालन करणे. त्यानुसार स्वतःला घरात बंद करून घेणे, बाहेर निघताना सोशियल डिस्टन्स (किमान १ मीटर/ ३ फूट) ठेवणे, हात वारंवार धुणे इत्यादी जे आपण टीव्ही, मोबाईल मेसेजेस, इत्यादींच्या माध्यमातून वारंवार ऐकत आणि वाचत आहोत.
परंतु घरी असतानाहि आपण काही काळजी घेणे गरजेचे आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली असेल, तर आपण निरोगी राहू शकतो.
त्यासाठी खालील उपाय आपण करू शकतो -
* च्यवनप्राश, सितोपलादी चूर्ण वगैरे सारखी रसायन औषधी आपल्या प्रकृतीनुसार वैद्यांच्या सल्ल्याने घ्यावीत.
* आपला आहार हा ताजा, स्निग्ध, गरम, सात्विक, पचण्यास हलका असावा.
* आहारात फळभाज्या, वरण, भात, चपाती, भाकरी, फुलका, यांचा समावेश अधिक असावा.
* गायीचे दूध, गायीचे तूप, डाळिंब, काळे मनुके, विविध फळे यांचा समावेश आहारात असावा.
* मैद्याचे पदार्थ, बेकरीतील पदार्थ, फास्ट फूड, चायनीज, ready to use food, praservative घातलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, अति मसालेदार पदार्थ इत्यादी पदार्थ वर्ज्य करणे किंवा अत्यल्प प्रमाणात सेवन करणे.
* अजीर्ण होणार नाही याची काळजी घ्यावी.
* रात्री लवकर झोपावे, दिवसा झोपू नये.
* योग्य आणि पुरेशी झोप घ्यावी.
* पहाटे लवकर उठून विविध योगासने, सूर्यनमस्कार, ओंकार जप, प्राणायाम (अनुलोम-विलोम, भस्रिका, कपालभाती इ.) करावा.
* घरात करता येईल असा व्यायाम करावा. (जागेवर पळणे, जोर, बैठका इत्यादी)
* नाकात गायीचे तूप २-२ थेंब टाकावे.
* हळद टाकून पाणी उकळवून त्याच्या गुळण्या करणे.
* घरात किमान १-२ वेळेस गुग्गुळ, कडूनिंब, कापूर, हळद, मोहरी, वेखंड इत्यादी पैकी जे जे उपलब्ध असेल त्याचा, गायीचे तूप टाकून गायीच्या शेणाच्या गौरीवर जाळून धूर करून घराचे धुपन करणे.
शरीरासोबत मनाचेहि स्वास्थ्य राखणे या काळात अतिशय आवश्यक आहे. टीव्ही, व्हाट्सअप्प इत्यादी वरील बातम्या, पोस्ट्स वाचून, आपल्या शहरात व्याधीचा प्रसार होत आहे, एवढे नवीन रुग्ण सापडले, एवढे मेले इत्यादी सर्व वारंवार ऐकून दुःख, शोक, भय, क्रोध, काम, मोह, इत्यादी विविध मानसिक भावना याकाळात तीव्रतेने जाणवू शकतात. दुःख, भय यामुळे विविध व्याधी अधिक प्रमाणात वाढतात, त्यामुळे या अशा प्रसंगात मनाचे स्वास्थ्य सांभाळणे हे अतिशय आवश्यक आहे.
त्यासाठी प्रत्येकाने
* प्राणायाम, ओंकारचा जप, ध्यान करावे.
* नामजप करावा, इतर काही साधना करावी.
* संध्याकाळी देवासमोर दिवा लावून श्रीरामरक्षा स्तोत्र म्हणावे. जेणे करून घरातील वातावरण सकारात्मक, प्रसन्न होऊन सर्वांची मानसिक अवस्था सुदृढ होण्यास मदत होईल.
* आवडते संगीत ऐकावे, गाणी ऐकावीत.
* आपले मन प्रसन्न आणि आनंदी राहील असे कार्यक्रम बघावेत, वाचन करावे.
* नकारात्मक गोष्टी टाळाव्यात.
* हा वेळ आपले कौशल्य (skill) वाढविण्यासाठी, नवीन कौशल्य, कला शिकण्यासाठी सत्कारणी लावावा.
* घरात लहान मुलांसोबत खेळावे.
आरोग्याविषयी काहीही समस्या असल्यास आपल्या वैद्यांना, फॅमिली डॉक्टरांना भेटा, फोन करा.
आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या.
- वैद्य. वैभव सदाशिव सोनार
एम्. डी. (आयुर्वेद), नाशिक.
९८२२२७१६७८