28/05/2021
आयुर्वेदाच्या नावाखाली सत्य नसलेल्या खपवलेल्या काही गोष्टी:
हल्ली ' आयुर्वेद ' नाव आले की सगळ्यांचा लगेच विश्वास बसतो. आयुर्वेदावरच्या वाढलेल्या विश्वासाचे हे प्रतीक आहे. पण त्याचा गैरफायदा घेऊन अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले काही लोक कुठलेही उपाय आयुर्वेद नावाखाली १००% खात्री आणि नो साईड इफेक्ट्स अशा मथळ्याखाली सोशल मीडिया आणि व्हॉट्सऍप वर करत राहतात. त्यातीलच सध्या वाचनात आलेली काही चुकीची वाक्ये:
१. "आयुर्वेदात जेवणानंतर दहीभात खायला सांगितला आहे."
दही हे उष्ण आणि शरीरातील पोषकांश ह्याच्या चलन वलनात अडथळा उत्पन्न करणारे आहे आहे. पूर्ण जेवण झाल्यावर थोडासा दहीभात खाणे हे पचनासाठी कठीण होऊ शकते. दोन घास कमी खाऊन मग १ वाटी ताक प्यावे. पण एकच वाटी जास्त नाही.
२. "रोज गोमूत्र पिणे प्रकृतीसाठी उत्तम असते."
गोमूत्र हे काही औषधात वापरतात आणि ते पण कल्पांमध्ये. नुसते गोमूत्र रोज पिणे अत्यंत प्रकृतिदायक आहे हे पूर्ण चुकीचे आहे. एकच नियम सगळ्यांना कसा बरे लागू होईल?
३. "तुळस आले गवती चहाचा 'आयुर्वेदिक' काढा सर्वांनी रोज घ्यावा."
ह्या बाबतीत मी मागे एका लेखात म्हटल्याप्रमाणे बऱ्याचशा लोकांना हा काढा चालेलच. पण उन्हाळ्यात, उष्ण प्रकृतीच्या माणसाला, गळवांचा त्रास असताना जरी कोरोना प्रतिबंधक म्हणून सांगितला असला तरी चालेल का?नक्कीच नाही. अशा ठिकाणी थोडे मार्गदर्शन व थोडे तारतम्य लागते.
हर्बल आणि आयुर्वेदिक ह्यातला फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. हर्बल म्हणजे कुठल्याही झाडाचे अनुभविक, ऐकीव, कुठेतरी कोणीतरी लिहिलेले, अर्धवट संशोधनातून पुढे आलेले आणि मग त्यातच मनाने काय काय घालून बनवलेले असे नुस्खे. आयुर्वेदिक म्हणजे एखाद्या लक्षणाचे आणि माणसाचे आयुर्वेदिक निदान पद्धतीने निदान करून, मग कदाचित वरीलच वनस्पती पण 'ज्ञान पूर्वक' देणे.
४. "आयुर्वेद काळात व्हायरस चा शोध लागला नव्हता म्हणून viral आजार आयुर्वेदाने बरे होत नाहीत".
ह्या विधनामागे आयुर्वेदिक निदान पद्धती बद्दलचे अज्ञान हे सर्वात मोठे कारण आहे. कारणे, लक्षणे, कशा मुळे, कुठल्या संक्रमण पद्धतीने, किती कालावधीपासून ह्याचा विचार करून औषधे दिली जातात. Viral, bacterial, microbial, parasital अशा पद्धतीने नाही. व्हायरस, बॅक्टरिया ह्याने काय लक्षणे उत्पन्न होतात त्याचे आयुर्वेदिक निदान करून त्या निदानातील औषधे वापरली जातात व त्याचा उत्तम उपयोग होताना दिसतो.
५. "मी साधा साबण/शाम्पू नाही आयुर्वेदिक साबण/शाम्पू वापरतो."
आयुर्वेदिक साबण असे काही नसते. साबण बेस जोपर्यंत केमिकल आहे तोपर्यंत साबण पूर्ण ' आयुर्वेदिक ' होणे अशक्य. उटणे वापरू शकता.
६. "उन्हाळ्यात भरपूर ताक प्यायले की उष्णता होत नाही. आयुर्वेदात सांगितले आहे."
ताक हे स्वभावतः किंचित उष्ण असते. त्रिदोष शामक ही आहेच. पण ते ताजे, फ्रीज मध्ये न ठेवता, भरपूर पाणी घालून आणि घुसळून केलेले पाहिजे. आत्ता बरेच जण एकदम खूप दही लावून फ्रीज मध्ये ठेवतात आणि रोज थोडे काढून ७ दिवस एकच दही वापरतात. पाणी कमी, ब्लेंडर ने घुसळलेले आणि कधी कधी अधमुरे किंवा आंबट ताक पितात. तसेच साय न घालता केलेल्या दह्याचे ताक हे रुक्ष स्वभावाचे होते. उन्हाळ्यात जेव्हा शरीरात स्निग्धता असण्याची अपेक्षा असते तेव्हा सारखे सारखे ग्लास ग्लास भर ताक हे त्रासदायक ठरू शकते. जेवताना १ वाटी ताकाबद्दल काहीच हरकत नाही.
७. " आयुर्वेदात कच्च्या भाज्या व फळे ह्यावरच भर द्यायला सांगितला आहे".
शिजवलेले आणि ताजे खावे. पालेभाज्यांचा सुद्धा अतिरेक किंवा सतत खाणे हे रोग वाढवणारे आहे.समतोल महत्त्वाचा आहे. भारतीय ताट हे योग्य जेवणाचे उत्तम प्रदर्शन आहे. डाव्या बाजूला कच्चे(चटणी/कालवलेले मेतकूट/कोशिंबीर) आणि उजव्या बाजूला शिजवलेल्या भाज्या आणि मध्ये पोळी/भात हे सर्वोत्तम. ते त्या प्रमाणात खाल्ले जावे म्हणूनच त्यांच्या त्या जागा आहेत.
८. "आयुर्वेदात रोज सकाळी तांब्याभर पाणी प्यायला सांगितले आहे."
प्रत्येकाच्या प्रकृति,वय, हालचाल, व्यायाम, आजार ह्याप्रमाणे ही गरज बदलते. उगाच जास्त पाणी पिण्याने अग्निमांद्य, सूज, आम्लपित्त हे आजार बळावतात.
९. "च्यवनप्राश बरोबर ग्लास भर दूध प्यावे."
च्यवनप्राश हा एक अवलेह(चाटून खायचा) पदार्थ आहे. स्वभावतः जड, मधुर रस प्रधान आहे. अग्नी प्रमाणे, गरजेप्रमाणे सकाळी अनशापोटी मूळ पचन चांगले असले की, आणि नसले तर ते नीट झाल्यावर प्रमाणात घ्यावा. त्यावर दूध प्यायले तर पचायला अजून जड होतो. उत्तम अग्नी वाल्यांना दूध एकवेळ चालू शकेल. त्यातून जवळच्या आयुर्वेद तज्ञाला विचारावे मग ठरवावे.
१०. "सकाळी लिंबू गरम पाणी आणि मध घेतलेला चांगला."
असे आयुर्वेदात सांगितलेले नाही. मधूदक म्हणजे मध पाणी हे स्थूलांच्या चिकित्सेत आले आहे परंतु गरम पाण्यातून कधीच नाही. त्यातून त्यात रोज १/२-१ लिंबाचा रस घेणे हे तर त्वचा विकार आणि कफाच्या आजारांना निमंत्रण आहे.
जेवणात कोशिंबीर, भात, उसळी ह्यातून जेवढे लिंबू जाते तेव्हढे पुरेसे आहे. अजून गरज नाही.
११. "रात्री गार दूध प्यायल्याने acidity दूर होते."
एक तर आयुर्वेदात असे सांगितले नाही. फक्त एवढा सोपा उपाय काम करत असता तर acidity नामशेष झाली असती जेव्हा उलट ती वाढतानाच दिसत आहे. त्यातून रात्री जेव्हा शरीर शांत असते अशा वेळी पचनशक्तीला कामाला लावणे हे त्रासदायकच आहे.
वरील गोष्टींना अनेक वेगवेगळे पैलू आहेत. एकच टोक, एकच वाक्याची टीप आणि सर्व रोगातून मुक्तता असे असते तर कुठल्याच मेडिको लोकांची गरज उरली नसती.
यू ट्यूब वरील "फक्त १ दिवस अशा पद्धतीत जिरे खा आणि अमुक ढमुक विकारांपासून कायमसाठी मुक्तता मिळवा." अशा वाक्यांचे thumbnails असणारे व्हिडीओ अजिबात बघू नका, शेअर करू नका आणि हे खरे आहेत का हो असे वैद्य/ डॉक्टर ह्यांना विचारूही नका.. खरेच असे झटपट होत असते तर त्या माणसाला एव्हाना मेडिसिन चा सर्वोच्च पुरस्कार नसता का मिळाला?
©वैद्य स्वराली शेंड्ये
यशप्रभा आयुर्वेद.....