19/08/2020
आमचा करोनाचा आजार
डॉ.अजित आणि डॉ. ज्योत्स्ना पडळकर
आम्ही दोघे कोविड मधून मुक्त झाल्याचं कळल्यावर आमचे अनुभव कथन करण्याबद्दल आणि माहिती खबरदारी जाणून घेण्याबद्दल विचारणा झाली म्हणून त्यानिमित्तानं काही...
कोविड संबंधी मीडियावर सतत अपडेट्स आहेत. त्यात गंभीर आजारी झाल्याच्या, दगावल्याच्या, प्रतिष्ठितही न सुटल्याच्या तसेच आपल्या आसपासच्या माहितीतल्या व नातेवाईकांच्या या आजाराच्या बातमींमुळे सर्वदूर भीतीचे वातावरण आहे. त्यात भर घातली आहे ती वेगवेगळ्या सरकारांनी घातलेल्या निर्बंधांनी, आर्थिक चणचणनी आणि नेमके उपाय नसल्यामुळे आलेल्या असहायतेनी.
त्यातच हा आजार काही देशांनी, डॉक्टरांनी, औषधी कंपन्यांनी मुद्दामच केलाय, प्रत्यक्षात तो फार सौम्य आहे, प्रतिबंधात्मक उपाय विनाकारण किंवा हानीकारक आहेत अशा बातम्याही पसरवल्या गेल्या. वेगवेगळ्या पॅथीचे आणि त्यातही सारखे बदलणारे विचार आणखी गोंधळात भर टाकत राहिलेत.
परंतु, कुठेतरी विश्वास ठेवावा वाटतो आणि लागतोही. यावर आमचे विचार मांडतो, पटतात का पहा.
हा आजार मुद्दाम पसरवलाय का ह्याच्याशी आपला काहीही वैयक्तिक संबंध नाही. डॉक्टरांचं म्हणाल तर इतर व्यवसाय धंद्याप्रमाणे नुकसानच खूप झालंय, तसंच नेहेमीच्या औषध दुकानांचं सुद्धा!.
तेंव्हा हा विचार मनातून मनातून काढून टाका.
काही जंतुजन्य आजार वातावरणात कायमपण टिकतात उदा. टायफॉईड. काही दरवर्षी येतात पण विशिष्ट हवामानातच उदा कांजण्या, फ्लू.इ. करोना किंवा कोविड हा नवीन आजार असल्यामुळे तो कायमचा आहे का विशिष्ट हवामानापुरताच आहे हे अजून माहित नाही. तो थोड्या महिन्यांपुरताच आहे असं धरून बरेचसे निर्बंध घातले गेले. तो फार पटकन पसरतो, बऱ्याच जणांना ऍडमिट करायला लागतं, आणि काहींना बरेच दिवस ऑक्सिजन किंवा कृत्रिम श्वास यंत्रणा लागते असं माहिती झालं. ज्या देशात ह्या साधनांची कमतरता आहे त्या देशात काहींना ती जरूर असतानादेखील मिळणार नाही असं होऊ शकेल. म्हणून तो झपाट्यानं पसरू नयेअसे लॉकडाऊन सारखे निर्बंध घातले गेले.
आता असं लक्षात आलंय की, हा काही पटकन थांबणारा, संपणारा आजार नाही. निर्बंध किती दिवस घालणार? त्यामुळे जिथे जिथे प्रमाणाबाहेर पसरतोय, म्हणजे वाढवण्याचे प्रयत्न करून सुद्धा हॉस्पिटल बेड्स कमी पडतायत, तिथे तिथे १५ -१५ दिवस निर्बंध घातले जातायत.
हा आजार फ्लू पेक्षा पटकन पसरणारा आणि जास्ती दिवस हॉस्पटल बेड अडवून ठेवणारा असल्यामुळे तो दुर्लक्ष करण्याजोगा किंवा किरकोळ नक्कीच नाही. त्यामुळे तो होऊ नये म्हणून वैयक्तिक प्रयत्न केलेच पाहिजेत.
असंही लक्षात आलंय की ज्येष्ठ मंडळींना आणि ज्यांना डायबेटिस, हाय ब्लड प्रेशर, हृदय रोग असे आजार आहेत त्यांना तो तीव्र स्वरूपाचा होतो. पण असंही समजलं आहे की तो समाजात बऱ्याच जणांना होऊन गेला की त्याचा प्रसार कमी होऊन इतरांना होणार नाही. त्यामुळे आजारी ज्येष्ठांना तो होण्याचं टाळलं आणि सुदृढ मुलं आणि जवान लोकांना होऊन गेला तर ज्येष्ठांना होणारच नाही. तसंच ज्यांच्या घरी ज्येष्ठ नाहीत त्यांना, म्हणजे मुलं आणि जवान सुदृढ मंडळी, तो होऊन गेलेलाच सामाजिक दृष्ट्या चांगलं आहे.
आता तो होऊ नये म्हणून आपण काय प्रयत्न करावेत, तो सौम्य कसा ठेवावा, डॉक्टरांकडे कधी जावे, तपासणी कधी करावी आणि काय उपचार योग्य आहेत ते पाहूया.
श्वास मार्गाशी संबंधित निकटच्या सहवासानी त्याचा प्रसार होतो. किती प्रमाणात जंतू शरीरात जातात यावर त्याची तीव्रता ठरते. प्रत्यक्ष आजारी माणसाकडून जंतूंचा जास्ती डोस मिळतो, पण ती व्यक्ती आजारी पडायच्या आगोदर १-२ दिवसापासूनच त्याचा प्रसार सुरू होतो. म्हणजे आपल्या संपर्कात आलेला माणूस आत्ता आजारी नसेल तरी तो इन्क्युबेशन पिरियडमध्ये असू शकतो आणि आपल्याला जंतूंचा प्रसाद देऊ शकतो. त्यामुळे आजाराचा प्रसार पूर्णपणे थांबवता येत नाही. हे सर्वांनी लक्षात घेण्याजोगं आहे.
कोणत्याही माणसाशी आपला संपर्क कमीत कमी वेळाचा, कमी वेळा आणि सुरक्षित म्हणजे एक मीटर तरी अंतर राखून ठेवला तर जंतूंचा डोस कमी मिळेल. कायम मास्क वापरणे, तोंडाजवळ हात न नेणे, वरचेवर साबणाने हात धुणे, अनावश्यक प्रवास आणि एकत्र जमणे टाळणे, गर्दीत जाणे टाळणे, जल नेती करणे एवढ्या खबरदाऱ्या पुरेशा आहेत.
मोठयांचा कमीत कमीआणि मुलांचा थोडा वेळ एकत्र संपर्क चालू ठेवायला हरकत नाही.
मुळात आपली प्रकृती योग्य जीवन शैलींनी चांगली ठेवणं आवश्यक आहे. कोणच्याही आजारापासून प्रतिबंध होण्यासाठी. योग्य आहार आवश्यक आहे. त्यामध्ये प्रोटिन्स (दूध,अंडी,नट्स), व्हिटॅमिन्स (कच्चे पदार्थ- फ़ळं,भाज्या), लोह (पालेभाज्या, खजूर, गूळ) हे पदार्थ येतात. पण त्यासाठी आयत्या वेळी आजारी झाल्यावर तात्पुरत्या व्हिटॅमिन किंवा झिंक वगैरे घेऊन काही उपयोग नाही. कोणच्याही पॅथीत या आजारावर प्रतिबंधक औषधे नाहीत, त्यामुळे अशी कोणचीही औषधे घेऊ नयेत.
आजार सौम्य राहावा यासाठी मानसिक स्थिती चांगली लागते. त्यामुळं आपली प्रतिकार शक्ती वाढते. याउलट ताण तणाव भीती यांनी ती कमी होते आणि आजार बळावतो. ती भीती कशी कमी करता येईल?
हा आणि इतर कुठलाही आजार होऊच नये म्हणून पूर्ण खबरदारी आपण घेऊच शकत नाही. हे प्रथम मनापासून समजून घ्या. व्हॅक्सिन मुळे प्रतिबंध होऊ शकेल पण त्याकडे डोळे लावून वाट बघण्यात अर्थ नाही. शिवाय त्यामुळे सध्याचे आणि भविष्यात येणारे नवीन आजार आपण थांबवू शकणार नाही आहोत. आजार होणार आहेत ही शक्यता गृहीत धरा. मनापासून. होता होईल तेव्हढी खबरदारी घेऊच. पण त्याच्या मर्यादा लक्षात घ्या. वाहन चालवतांना ऍक्सिडेंट होईल अशी भीती आपण बाळगतो का, रस्ता ओलांडताना खबरदारी घेऊन सुद्धा ऍक्सिडेंट होतोच ना, टी बी टायफॉईड स्ट्रोक असे आजार पूर्णपणे होणारच नाहीत असे आपण म्हणू शकतो का, सैनिकी जीवन पत्करतांना मरण्याची भीती बाळगून चालेल का, त्यांना आपण सतत का घाबरत नाही? कोविड या आजारावर अनेक माध्यमांनी गोंधळात टाकणारी भरपूर माहिती दिल्यामुळे आपल्याला भीती बसली आहे. ती भीती मनातून काढून टाका.आपलं शरीर आजाराचा सामना करायला समर्थ आहे अशी खात्री बाळगा. येईल त्या संकटाला तोंड द्यायला तयार व्हा.
आपल्याला असं वाटतं की, मुलांना यातलं काही कळत नाही. त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. पण गेल्या सहा महिन्यातला आमचा अनुभव सांगतो. मुलांचे एकूण आजार खूप कमी झालेत. कारण शाळा बंद, एकत्र खेळ बंद, बाहेरचं खाणं बंद, प्रवास बंद. पोहोणं बंद मुलं घरात सुरक्षित आहेत तर आजारी पडणार कशी? परंतु ज्या काही तक्रारी पालक घेऊन येतायत त्या अशा आहेत - गादीत नव्यानीच शू करायला लागलाय, तोतरे बोलतोय, झोप लागत नाहीये, नखे खातोय किंवा टोकरतोय, सारखं पोट डोके दुखण्याच्या तक्रारी करतोय वगैरे. हे काय दर्शवतात? त्यांच्या मनाची अस्वस्थता. प्रत्यक्ष आजाराची माहिती नसेल तरी आपले संवाद, ताण तणाव, भीतीयुक्त वातावरण त्याच्यापर्यंत पोचलंय. अशा तक्रारी पूर्वीपण आम्ही अनुभवल्यात. पण त्या काही ठराविक पालकांच्या बाबतीत असत. आता त्या खूप कॉमन झाल्या आहेत. त्यामुळे मुलांचीही प्रतिकार शक्ती कमी होतीय. हे असं चालणारं नाही. आपली भीती कमी करणं त्यांच्या भल्या साठीही आवश्यक आहे. त्यांच्यासमोर तरी आपल्या वागण्या बोलण्यातून "ऑल इज वेल" चे संकेत पोचतील अशी स्थिती आणणं शिकून घ्यावं लागणार आहे. ह्या आजारातून हा धडा शिकून घेऊन सार्थकी लावणं जरूर आहे. आर्थिक समस्याही समोर असणारच आहेत, कालांतरानी त्यातून मार्ग निघतीलच, पण आत्ता त्याकडं बघण्याचा दृष्टिकोन बदलणं आवश्यक आहे.
बऱ्याच जणांच्या शरीरात जंतू पोचतात पण लक्षणं काहीच नसतात. जंतूंच्या कमी डोसमुळे आणि त्यांच्या चांगल्या प्रतिकार शक्तींनी त्यांना आजार होतही नाही. किंवा तो इतका सौम्य असतो की झाल्याचं कळतही नाही. जंतू कधी शरीरात गेले ते कळत नसल्यामुळे तपासणी कधी आणि किती वेळा करणार? आपल्याला आजार होऊन गेलाय हे कळण्यासाठीची तपासणी अजून सहज उपलब्ध नाही. एखाद्याला आजार झाला असेल तर त्याच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली तर ती पॉझिटिव्ह येऊ शकते पण त्याला आजार झाला का नाही हे कळत नाही. त्यामुळे नंतर हा आजार होण्याची शक्यता राहतेच.
थोडक्यात, निरोगी माणसाची तपासणी करून फार काही निष्पन्न होत नाही. सौम्य स्थितीतला हा आजार फक्त तापावरच्या औषधांनी बरा होतो. लवकर निदान केल्यानी किंवा कोणत्याही खास उपचारांनी तो गंभीर होण्याचं टाळता येत नाही. त्यामुळे वैयक्तिक आणि वैद्यकीय दृष्ट्या लवकर निदान करून काही उपयोग नसतो.
साधारण तापाच्या तिसऱ्या दिवशी खात्रीशीर तपासणी होऊ शकते. त्यामुळे पहिल्या २-३ दिवसानंतर इतर काही आजार नाहीत हे ठरवून मग कोविड तपासणी करायला हरकत नाही. पण ताप, अंगदुखी आणि इतर आजारांची काही विशिष्ठ लक्षणं नाहीत असं असताना तो कोविड आहे असं धरूनच तोपर्यंत इतरांशी विशेषतः ज्येष्ठांशी संपर्क टाळा. बाहेरच्या माणसांना घरात घेऊ नका. तीन दिवसांनी किती दिवस इतरांशी संपर्क टाळायचा हे ठरवण्यासाठी तपासणी करू शकता. पण स्वतःसाठीच्या उपचारासाठी त्याचा काही उपयोग नाही हे लक्षात घ्या.
आजार गंभीर स्वरूप धारण करत नाही ना हे स्वतःच मॉनिटर करा आणि रोज शक्यतो ऑन लाईन डॉक्टरांच्या संपर्कात राहा. घरी पल्स ऑक्सिमीटर ठेवा. ताप, हृदय ठोके, ऑक्सिजन पातळी, युरीन आणि श्वासाचा वेग यांचे रेकॉर्ड ठेवा आणि डॉक्टरांबरोबर शेअर करा. १००च्या वर गेलेल्या तापासाठी क्रोसीन घ्या. एव्हडं पुरेसं आहे. सौम्य आजाराला साधारण ताप गेल्यावर १२ दिवस विलग राहणं आवश्यक आहे.
आजार गंभीर झाला तर कुठे जायचं ह्याची तयारी डॉक्टरांबरोबर बोलून करून ठेवा. त्यानंतरच्या उपचार पद्धती डॉक्टर ठरवतील. तपासण्या कुठे होतात, सरकार कुठे आपल्यासाठी पैसे भरते, कुठे सवलतीच्या दारात उपचार होऊ शकतील हे वेळोवेळी ठरवायला लागेल. त्याची माहिती अनेक मार्गानी मिळू शकेल.
आम्ही आमची ती तपासणी दीनानाथ हॉस्पिटल मधून करून घेतली. होम क्वारंटाईन साठी तिथे किट्स मिळतात त्याचा वापर करून त्यांच्या डॉक्टरांच्या संपर्कात राहता येतं. जरूर पडल्यास ते ऍडमिशन सुचवतात. त्या योजनेत आम्ही भाग घेतला होता.
आम्हाला दोघांना ३ दिवस ताप, अंगदुखी आणि दरदरून घाम येणं अशी लक्षणं होती. नेहेमीच्या हिमोग्राम, डेंगू तपासण्या नॉर्मल आल्यावर तिसऱ्या दिवशी कोविड तपासणी केली. ती पॉझिटिव्ह आली. तोपर्यंत तापही गेला. काही दिवस अशक्तपणा होता. क्रोसीन शिवाय काही औषध लागले नाही. चौदा दिवसाच्या विलगानंतर आता आम्ही पूर्ण बरे आहोत. आम्हाला डायबेटीस, हैपरटेंशन, हार्ट डिसीज असे कोणतेही आजार नाहीत. नियमित व्यायाम, सकस आहार, चांगली मनस्थिती, चांगले विचार, बरे होऊन परत लवकर कामाला लागण्याची प्रबळ इच्छा, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि शुभेच्छा यामुळे आमचा आजार सौम्य होऊन आम्ही बरे झालो अशी आमची भावना आहे.