17/09/2020
Blog - लॉकडाऊन, अनलॉक आणि स्त्रीचे दुभांगलेपण
स्त्रीविषयी आपल्या संस्कृतीमध्ये नेहमीच आदराने बोललं गेलंय. तिला ‘जगतजननी’ म्हंटलं गेलं, सरस्वतीच्या, लक्ष्मीच्या रूपात पाहण्यात आलं. परंतु त्याचबरोबर तिच्यावर अनेक नियमही लादण्यात आले. गृहस्थीची, मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी तिलाच उचलावी लागली. सगळं तिने हसत केलंसुद्धा. तिची सहनशीलता हाच तिचा गुण म्हणूनही गौरविण्यात आला. काळ पुढे गेला, सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, अशा अनेक स्त्रियांच्या प्रयत्नातून स्त्री घराच्या चौकटीबाहेर पडू शकली. नोकरी करण्यास, आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यास सक्षम झाली. परंतु आजही ‘आयडियल’ स्त्री तीच आहे जी दोन्ही सांभाळू शकते, घरही आणि नोकरीही.
या नव्या रचनेतील, आधुनिक संस्कृतीतील स्त्री खरंतर अधिक स्वतंत्र, अधिक आनंदी असायला हवी. पण तिची घुसमट अधिक वाढली. तिच्या मनोजगताचे विभाजन होऊ लागले. घरी ती एका वेगळ्या मनोभूमिकेत आणि घराबाहेर एका वेगळ्या मनोभूमिकेत वावरू लागली. ती ‘मल्टिटास्कर’, अनेक कामं एकदाच सांभाळणारी नेहमीच होती, पण या नव्या रचनेमध्ये तिचे व्यक्तिमत्त्वच दुभंगले जाऊ लागले. घराबाहेर ती आत्मविश्वासाने, स्वतःच्या गुणवत्तेवर विश्वास ठेवून काम करू लागली; घरात मात्र तिला सतत दुय्यमपणा स्वीकारावा लागला.
कोरोना, त्यांनतरचे लॉकडाऊन आणि आता सुरु असलेले अनलॉक, या सगळ्यात मात्र तिची वेगळीच फरफट झाली. ही दोन्ही जगं एकमेकांत मिसळली गेली. आयुष्याचे, मनोजगताचे पडलेले जे कप्पे तिने स्वीकारले होते, ते आता एकत्र झाले. गृहिणीसुद्धा या विळख्यात अडकल्या. जी कामं एका ठराविक वेळेत उरकून त्या स्वतःसाठी वेळ काढू शकायच्या, ती कामं आता त्यांना २४ तास करावी लागू लागली. सतत काही ना काही खायला बनविणे, मुलांच्या ऑनलाईन वर्गांपासून ते त्यांच्या शारीरिक स्वास्थ्याचे नियोजन करणे, हे सगळं त्यांनाच करावे लागू लागले. मॉर्निंग/इव्हिनिंग वॉकच्या वेळी होणाऱ्या गप्पा, पार्लरमध्ये होणारे संवाद, दुपारच्या वेळेत वाचले जाणारे पुस्तक, सगळेच सुटले. या दैनंदिन वाटणाऱ्या, छोट्या-छोट्या समस्या, तिच्यावर मोठा परिणाम करू लागल्या.
कुठे होते घुसमट?
स्त्री-स्वातंत्र्य या संज्ञेचे आपल्या समाजाने काहीसे चुकीचे आकलन केले आहे. स्त्री घराबाहेर पडतेय याचा अर्थ ती घरातल्या जबाबदाऱ्या टाळतेय, भावनिक बंध तोडतेय, असा नाही होत. पण ती जबाबदारी तिला एकटीलाच निभवावी लागते, त्यात थोडाही कसूर झाल्यास तिला दोष दिला जातो. आणि इथे ते ओझं होतं. किंबहुना तो दोष दिला गेला नाही तरी तिची तीच गिल्टी होते. नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मनात लहान मुलांना (सगळी सोय करून) घरी सोडून जाताना जी अपराधी भावना येते, तिला इंग्रजीमध्ये ‘मॉम गिल्ट’ असे म्हंटले गेले आहे. असे अनेक गिल्ट ती मनात बाळगत असते. पारिवारिक आणि वैयक्तिक अशी दोन्ही आयुष्यं एकाच व्यक्तीला जगता येऊ शकतात, ही संकल्पनाच तिला आणि एकूण समाजाला पटकन उमजत नाही. पण सत्य हे आहे आपण सगळेच ही दोन्ही आयुष्यं एकाच वेळी जगत असतो. नात्यांच्या बंधनातही रमत असतो आणि स्वत्वालाही आकार देत असतो.
लॉकडाऊन झाला आणि स्त्रियांचे वैयक्तिक पातळीवरचे आयुष्य मात्र कोंडीत अडकले. स्त्री घरात असली की ती आई असते, सून असते. या भूमिकाही तिला तितक्याच जिव्हाळ्याच्या असतात. त्या निभावताना ती स्वत्वाचा विचार करतही नाही. पण ऑफिसमध्ये होणाऱ्या चर्चा, कामातून मिळणारा आनंद, एका पूर्णपणे वेगळ्या जागेत (ऑफिस) गेल्याने होणारे मनोजगतावरचे वेगळे परिणाम, त्यातून घरी परतताना येणारा टवटवीतपणा, हे सगळेच नाहीसे झाले. असे नाही की हे इतरांच्या बाबतीत घडत नव्हते. मुलेसुद्धा शाळा-कॉलेज मिस करत होते, पुरुषमंडळी त्यांच्या ऑफिसची, चहावरच्या गप्पांची आठवण काढत होती, पण त्यांच्याकडे पर्याय होता - इंटरनेटवर रमण्याचा, फोनवर गप्पा मारत बसण्याचा. स्त्रीलाही हे सगळे करण्यापासून कोणी थांबवले नसले, तरी घरकामाची पहिली जबाबदारी तिच्यावरच असते. घरकामाला येणाऱ्या बायका बंद कराव्या लागल्याने ती आणखीनच वाढली. नवऱ्याने यामध्ये मदत केली तरी त्याबाबत “नवऱ्याला बायकोने कामाला लावले” असे म्हंटले जाते. या विषयावरचे जोक्स रोज व्हाट्सऍपवर येतच असतात.
जे नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे, तेच थोडयाफार फरकाने गृहिणींचे. तिचाही स्वतःसाठी असणारा वेळ आता पूर्णपणे घरासाठी व घरातील सदस्यांसाठी जाऊ लागला. आधी सांगितल्याप्रमाणे दिवसाचे जे छोटे-छोटे कप्पे तिच्यासाठी होते, ते तसे राहिले नाहीत. दोन्ही प्रकारच्या स्त्रियांची यातून घुसमट होऊ लागली. याचे साधे कारण म्हणजे त्यांचे स्वत्व जोपासण्यासाठी, फुलवण्यासाठी जो त्यांचा असा वेळ होता, तोच नाहीसा झाला.
यावर कडी म्हणजे आता अनलॉक झाल्यांनतर, स्त्रीला (आणि सगळ्यांनाच) ‘न्यू नॉर्मल’ स्वीकारावे लागत आहे. मग नोकरीवर जाणाऱ्या स्त्रीचे पुन्हा नोकरीवर खरंच गरजेचे आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. घरची आर्थिक स्थिती जर बरी असेल, तर मग ते अनावश्यक ठरवलं जाऊ लागलं. घरी येऊन तीच मुलांचं सगळं करणार, घरची कामं सांभाळणार, त्यातून सगळीकडे हात लागणार, इन्फेक्शनची रिस्क वाढणार. हे सगळं तिला कोणी म्हंटलं नाही, तरी तिचं तिलाच हे गिल्ट येऊ लागलं, ‘मॉम गिल्ट’ सारखं. तिच्यावर असणाऱ्या अनेक जबाबदाऱ्यांमध्ये आता या जबाबदारीची भर पडली - घरच्यांना इन्फेक्शन न होऊ देणे.
यातून मार्ग काय?
आधी केलेल्या विवेचनातून आपल्या लक्षात येते की यातील अतिशय प्रॅक्टिकल असा मुद्दा हा वेळेच्या नियोजनाचा आहे. पण त्या विषयाकडे जाण्याआधी थोडं स्त्रीच्या मनो-अवस्थेचे आकलन करण्याच्या प्रयत्न करूया. आधी सांगितल्याप्रमाणे तिच्या मनोविश्वाचे होणारे विभाजन ही खरी समस्या आहे. संमोहनशास्त्राच्या मुळाशी आपले अंतर्मन आणि त्याच्याशी आपले असणारे सुदृढ नाते, हे आहे. सिगमंड फ्रॉइड सांगतो त्याप्रमाणे आपल्या अंतर्मनात अनेक अंतर्विरोधी, अनेकरंगी विचार असतात. त्यातून आपले व्यक्तिमत्त्व हे एकच एक असे नसते, हेही खरे आहे. पण याचा अर्थ असा नाही, की आपण स्वतःला अस्थिर आणि पर्यायाने दुबळे करून घ्यावे. स्त्री जरी एकाच वेळी अनेक भूमिकांमध्ये ये-जा करत असली, तरी तिला तिच्या मनोविश्वाचे विभाजन करण्याची गरज नाही. ज्या अनेक भूमिका तिला निभवायच्या आहेत, त्या “पर्यायी” आहेत, कुठल्यातरी एकाच भूमिकेला तिने स्वीकारलं पाहिजे, हा विचार मुळात बाजूला सारायला हवा, तिनेही आणि इतरांनीही. अर्थातच यात तिला तिच्या जवळच्या सगळ्यांनीच मदत करायला हवी. समोपदेशनातून मी नेमक्या याच विचाराला हात घालण्याचा प्रयत्न करत असतो. स्त्रीचे व तिच्या जवळच्या व्यक्तींचे मनोविश्व अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न करत असतो.
एकदा ही मनोभूमिका काहीशी स्वीकारली गेल्यावर मग त्यांच्या दैनंदिन जीवनावर, वेळापत्रकावर काम करण्यात येते. संमोहनशास्त्रातील अनेक तंत्रे येथे वापरण्यात येतात. ‘महिलांच्या समस्या’ ही आमची एक स्वतंत्र सेवाच आहे; या समस्या सोडविण्यासाठी विशिष्ट पद्धतींचा विकास आम्ही केला आहे. दैनंदिन जीवनात अगदी छोटे-छोटे बदल - कामाच्या वेळा (घरकाम तसेच नोकरीतील काम) निश्चित करून घेणे; जे काम इतरांशी संबंधित नाही, ते काम घरातल्याच एका वेगळ्या खोलीत, वेगळ्या स्पेस मध्ये करणे; नोकरीवर घराबाहेर असताना ठराविक वेळ फोनकॉल साठी ठेवणे; गृहिणींना त्यांच्या आवडीनुसार काही अॅक्टिव्हिटी सुचविणे व त्या जोपासण्यासाठी वेळेचे नियोजन करून देणे - या आणि अशा लहान पण दूरगामी परिणाम साधणाऱ्या बदलांमधून आपल्याला रोजच्या जीवनाचा दर्जा सुधारता येतो. त्यातून अर्थातच आपले मानसिक स्वास्थ्य सुधारते.
अर्थातच हे बदल, एकूणच थेरपी ही व्यक्तिसापेक्ष असते. त्यातच संमोहनतज्ज्ञाचे खरे कसब असते. मूलभूत मुद्दा मात्र तोच आहे - स्त्रीची मनो-अवस्था समजून घेणे आणि तिच्या दुभांगलेपणाचे तिच्या अंतर्मनातून उच्चाटन करणे.
आपण हा ब्लॉग वाचण्यासाठी वेळ दिला, याबाबत आम्ही आपले आभारी आहोत. असेच आणखी ब्लॉग व फेसबुक पोस्ट वाचण्यासाठी या ब्लॉगला व आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा.
#मार्ग_संमोहनाचा_शोध_स्वतःचा!