28/11/2025
Space
37 वर्षांची रिवा माझ्याकडे माझा लेख वाचून आलेली होती... रिवाचा प्रॉब्लेम हा होता की लग्न होऊन 8 वर्ष झालेली, घरात राहणारे तिघेच रिवा, नवरा आणि 6 वर्षांची मुलगी, नवरा प्रथितयश कंपनीत नोकरीला, मुलगी शाळेत..
रिवाचं आणि समीरचं love marriage. लग्नाआधी 2 वर्ष ते दोघंही relationship मध्ये होते पण आता काही कारणांमुळे गोष्टी workout hot नाहीयेत असं दोघांना सारखं वाटतं होतं, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणं मनस्ताप चिडचिड यामुळे दोघंही वेगळं होऊया का इथर्यंत पोहोचले होते. मनापासून वेगळं व्हायचं तर नव्हतं पण एकत्र राहून भांडण्यापेक्षा वेगळं होऊ हा विचार जास्त सोपा वाटतं होता... अर्थातच दोघांच्याही घरी हे मान्य नसल्याने आई वडिलांनी आजकाल ते counselling का असतं घेऊन बघा असा पर्याय सुचवला... ओळखीतून माझा नंबर मिळाल्या मुळे ते माझ्याकडे आले...
साधारण कोणीही जोडपी समोर येऊन बसली आणि मी बोला असं म्हणायचा अवकाश की ते एकमेकांचं काय काय खटकतय... माझा नवरा कसा अजिबातच माझं ऐकत नाही, बायको कसं अजिबातच समजून घेत नाही वगैरे वगैरे सांगायला सुरवात करतात.. आणि अगदी त्याच पदधतीने रिवा आणि समीर सुरवात केली...
मी घरातलं सगळं पाहते गेलं एक दिवस दूध ऊतू तर काय मुद्दाम केलं का? लगेच तो म्हणाला मित्रमैत्रिणींशी बोलणं जरा कमी झालं तर निम्म्यापेक्षा जास्त कामं वेळेत होतील.. त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत रीवा म्हणाली, तू ही जरा मैत्रिणींना महागडी गिफ्ट्स देणं कमी केलंस तर savings वाढतील... मग ही कशी माझ्यावर लक्ष ठेऊन असते, हा कसा छोट्या छोट्या गोष्टींवरून मला बोलतो... ही कशी माझ्या आणि माझ्या नातेवाईकांमध्ये नाक खुपसते, माझ्या मित्रमैत्रिणी बरोबर जायचं असलं की नेमकं त्याचं वेळी हा आजारी पडतो, नाहीतर काहीतरी महत्वाचं काम निघतच... हिला ना प्रत्येक वेळी माझ्या मित्रांना भेटायला यायचं असतं.. माझ्याच बरोबर खरेदी करायची असते... तेवढ्यात रीवा म्हणाली कारण सांग ना त्याचं मी आणलेले कपडे हे काय आणलं आहे, तुला कळतं का, हे घालू नकोस, तेच घाल ही सक्ती कोणाची? आणि ते दिवसातून ५ वेळा फोन करून कुठे आहेस कोणाबरोबर आहेस या गोष्टी सारख्या अशा विचारात राहायच्या.. मग तू विचारतोस की खवचटासारखं आज आला नाही वाटतं भाऊ तुझा... आणि परवा तुला बरं वाटत नसतानाही कशाला घाट घालायचा पुरणपोळीचा?? सांगत होतो अजून आजारी पडशील आराम कर पण ऐकायचं नाही सगळंच करायचं मग कसं शक्य आहे सांगा तुम्हीच मॅडम... एकूणच त्यांच्या सुरू असणाऱ्या संवादातून एक लक्षात आलं की दोघेही एकमेकांच्या आयुष्यात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालत आहेत आणि दोघांनाही ते सहन होत नाहीये. त्या दोघांचं पूर्ण ऐकून घेऊन मला वाटतं असणाऱ्या काही गोष्टी त्यांना सांगितल्या त्या त्यांना पटल्या आणि त्यांना स्वतःच वागणं observe करायला सांगितलं...
यांच्याकडे बघून एक गोष्ट लक्षात येते की आपण नात्याला जेवढं बांधून ठेवायचा प्रयत्न करतो तेवढं ते जास्त अडकत जातं... प्रत्येक गोष्टीत आपल्या partner वर अवलंबून असणे, त्याच्या/तिच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये गरजेपेक्षा जास्त लक्ष देणे, त्याच्या किंवा तिच्या काही सवयी, काही आवडी तिला/त्याला त्रास होईल म्हणून त्यावर अतीव प्रेमाचे बंधन लादणे... त्याला/तिला ते जमणार नाही, आणि मग तिला वाईट वाटेल किंवा नामुष्की पत्करावी लागेल म्हणून स्वतःच ते करणे... प्रत्येक वेळी आपल्या partner ने कुठे आहे, कोणाबरोबर आहे याची माहिती देणे/घेणे.. स्वतःच आयुष्य म्हणजे partner च आयुष्य हेच समीकरण सत्य आहे असा समज असणे, त्यांनी त्याचा आनंद आणि दुःख माझ्याच बरोबर share करायला हवे हा अट्टाहास करणे, आणि स्वतःच एक वेगळं आयुष्य, आस्तित्व आहे याचा विसर पडतो आणि मग आपला partner आपण वागतोय तसा वागला नाही की भांडणाला सूरवात होते.. आणि भांडणं विकोपाला जातात.
आपण नेहमी म्हणतो की माझी स्पेस, मला माझी space च मिळत नाहीये.. पण स्पेस म्हणजे नक्की काय?? हा विचार आपण करतो का? आणि जशी ती आपल्याला मिळायला हवी तशीच ती आपल्या partner सुद्धा मिळायला नको का?? माझी space मला हवी आणि तुझीही space मलाच हवी असं कसं चालेल... नात्याचं खरं गमक एकमेकांनी एकमेकांची space जपण्यात आहे.. ना की एकमेकांना अतीव प्रेम आणि काळजीपोटी अडकवून ठेवण्यात.... स्वतःच्या आवडी निवडी जपून आपल्या partner च्या आवडीला साथ देणं, माझ्यामते तिच्या/त्याच्यासाठी हे चांगलं आहे म्हणून करण्यापेक्षा तिला/त्याला ते खरंच हवं आहे का हे बघणं...
जेव्हा आपण मला space मिळत नाही म्हणतो तेव्हा कुठेतरी आपणच कळतनकळत ती space घेत नसतो आणि देतही नसतो. यावरून मध्ये सुधा मूर्तींचा एक video पाहण्यात आला होता तो आठवला त्या म्हणतात आमच्या आनंदी आणि सुखी सहजीवनाचं रहस्य म्हणजे आम्ही एकमेकांना खूप कमी भेटतो गमतीचा भाग सोडला तर त्या पुढे सांगतात की मी कधीच नवऱ्याला विचारलं नाही की मला हे हवं, तू माझ्या बरोबर parent meeting ला ये.. मला vacations ना बाहेर घेऊन जा... कारण Infosys त्याचं स्वप्न होतं त्याने हे केलं असतं माझ्याबरोबर तर ते कधीच झालं नसतं... आणि मला लोकांना मदत करणं त्यांना शिकवणं हे खूप आवडायचं त्याने मला त्यासाठी नेहमी support केला आम्ही दोघांनीही हे कधीच विचारलं नाही की हे तू का केलंस किंवा का केलं नाहीस आम्ही फक्त एकमेकांना support केला.... आत्ताच मला वेळ दे यापेक्षा दोघांना वेळ असेल तेव्हा आपण एकमेकांना पूर्ण वेळ देऊ हे महत्वाचं आहे, (spending Quality Time). As a wife I always allowed his space and he is mine!!!
नातं सांभाळण्यासाठी स्वतःची आणि partner ची space आणि तुमची एकत्र space असणं खूप महत्वाचं आहे. नात्याला मोकळं सोडून ते जास्त सुंदर बांधलं जातं!!! मोकळं सोडून देणं आणि मोकळीक देणं यात फरक आहे तो समजून घ्यायला हवं... थोडंसं स्वतः ला आणि नात्याला मोकळीक देऊन तर पहा.. नातं आपोआप छान होईल...
नेहा किल्लेदार
समुपदेशक, मानसशास्त्रज्ञ
माईंडफ्लो मेंटल हेल्थ केअर्स, पुणे
Ma in Clinical Psychology ( SPPU)
PG Diploma in Clinical & Counselling Psychology(SPPU)