12/03/2023
पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शिर्डी येथे देशातील सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील 'महापशुधन एक्पो-२०२३' दि. २४ ते २६ मार्च २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.
यामध्ये देशाच्या विविध राज्यातील पशुधनांच्या शंभराहून जातींचा आणि पशुसंवर्धनासह कृषी, दुग्ध आणि मत्स्यव्यवसायासंबंधींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा आणि तज्ज्ञांचा सहभाग असणार आहे. तसेच देशी गोवंश संवर्धनासाठी नामवंत जातिवंत जनावरांसाठी बक्षिसे देखील ठेवण्यात आली आहेत.
या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध मांस अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सुमारे ४६ एकरच्या विस्तीर्ण परिसरात संपन्न होणाऱ्या या प्रदर्शनात पशुधनासाठी ४५०, बचतगटांसाठी ६०, पशुसंवर्धन विषयक १०० आणि पशुसंवर्धन, कृषि विषयक बाबींच्या व्यावसायिकांसाठी १०० स्टॉल्स असणार आहेत. तसेच ६५ प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहणार आहे.
या 'महापशुधन एक्स्पो ' मध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्टॉल्स देण्यात येणार असून त्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांनी त्यांची वैशिष्ट्ये असणारी माहिती प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रकाशित करावी असे सर्वांना आवाहन आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी ही विनंती.