19/09/2025
डॉ. हेमा साने यांना भावपूर्ण श्रद्धांजली
सन 2011 चा काळ असावा. डॉ. प्रशांत बागेवाडेकर सरांकडून प्रथमच पुण्यातील वनस्पती अभ्यासक डॉ. हेमा साने यांच्याविषयी ऐकले. सरांनी फक्त एवढाच पत्ता सांगितला – जोगेश्वरी मंदिरापुढे डावीकडे त्यांचे घर आहे.
मी दिलेल्या माहितीनुसार तिथे पोहोचलो. पण घर काही केल्या सापडत नव्हते. दोन-तीन लोकांना विचारले, काही दुकानांमध्ये चौकशी केली, पण निराशा मिळाली. शेवटी एका दुकानदाराने सांगितले – डावीकडे शितळा देवीचं एक मंदिर लागेल, त्यामागे एक घर आहे.
तिथे गेलो, एका पडक्या वाड्यासारखं काहीसं घर दिसलं. लाकडी दरवाजा, दाट झाडी, वेलींनी वेढलेला परिसर, समोर कुठलीच पक्की वाट नाही. धाडस करून आत शिरलो. जणू काही एखादं लहान जंगलच! आत गेल्यावर एक खोली दिसली, आणि त्यात एक वृद्ध, वाकलेली, पारंपरिक साडीतील आजी बसलेली दिसल्या.
मी विचारले, "डॉ. हेमा साने कुठे राहतात?"
त्या हसून म्हणाल्या, "मीच आहे रे... वाटत नाही ना?"
मी नि:शब्द झालो. खरंच! मला वाटलंच नव्हतं की एक डॉक्टरेट मिळवलेली, अभ्यासक व्यक्ती अशा अवस्थेत राहात असेल.
घरात पुस्तकांचा पसारा, चुलीवर स्वयंपाक, उखळ, कंदील, मांजरी, एक मुंगूस – ना वीज, ना फोन. जणू काही एका युगात हरवलेलं घर!
जेव्हा मी त्यांना सांगितले की मी आयुर्वेद डॉक्टर आहे, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर हास्य खुललं. अनेक विषयांवर चर्चा झाली – भाकरी चांगली की चपाती? जीवनीय वनस्पती कोणती? शमीचा वृक्ष कुठे आहे? अशी निसर्गाशी नातं सांगणारी माणसं क्वचितच भेटतात.
नंतर अनेकदा त्यांच्याकडे जाणं-येणं झालं. कोरोनाकाळात भेटी बंद झाल्या, पण एका दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये त्या पुन्हा दिसल्या. मी विचारले, "कशा आहात?" त्या म्हणाल्या, "हल्ली येत नाहीस!" मी म्हटलं, "येईन पुन्हा, ही महामारी गेल्यावर."
पण... आज अचानक त्यांच्या निधनाची बातमी ऐकली. एक हक्काची, निसर्गप्रेमी, वनस्पतींची जीवंत वाचक, आणि एक सच्ची व्यक्ती हरपली.
डॉ. हेमा साने यांना मन:पूर्वक श्रद्धांजली! आपलं ज्ञान, आपली साधी पण समृद्ध जीवनशैली, आणि आपली निसर्गाशी असलेली नाळ – कायम स्मरणात राहील.
डॉ विक्रम गायकवाड