06/07/2019
लहान मुलांचा छळ : कसा दिसतो? काय करायचे आपण?
संयम आता अकरा वर्षांचा आहे. तो गेले काही आठवडे गप्प असतो आणि परवा तर शाळेतून परत आलाच नाही. रात्री दीड वाजता घराजवळच्या एका दुकानदाराला पायरीवर झोपलेला सापडला.
परी फक्त सहा वर्षांची आहे. पण तिने बिल्डिंगमध्ये खाली खेळायला जाणे बंद केलंय. ती संध्याकाळभर घरीच थांबते नाहीतर कुठेतरी बाहेर जाऊ म्हणून हट्ट करते. आईबाबा कामाला असल्याने फक्त वृद्ध आजीला तिला वेगवेगळ्या क्लास ला नेणे शक्य नाही.
स्मृती दहावीत आहे. ती वारंवार हातावर ब्लेडने रेघोट्या मारते, कधी अगदी रक्त वाहीपर्यंत. आता तिचे पालक खूपच घाबरलेत. आपण अभ्यासाचा ताण देत नाही, शाळा पण खेळकर आहे तरी आपली मुलगी अशी का वागतीये हे त्यांना समजत नाहीये.
या तिन्ही मुलांमध्ये एक समान धागा आहे. ज्यामुळे त्यांना परिस्थिती खूप अवघड वाटतीये आणि तोंड देण अवघड झालंय. काय आहे हा ताण? मुलं अशी का वागताहेत?
हे समजून घ्यायला त्यांच्याबद्दल आपल्याला अधिक माहिती समजायला पाहिजे.
संयम च्या वडिलांना मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली नाही कारण त्यांना इंग्रजी बोलायला येत नव्हते. घरची परिस्थिती सामान्य. शेतकरी कुटुंबाची. पत्नी, म्हणजे संयमची आई सुद्धा फक्त दहावी शिकलेली. घरात मराठी वातावरण. संयम पाचवीत गेला तेव्हा वडिलांनी त्याला शहरातल्या मोठ्या कॉन्व्हेंट शाळेत ऍडमिशन मिळवली, खूप खटपटी आणि खर्च करून. आपल्या मुलाला उत्तम इंग्रजी शिक्षण मिळावे या उद्देशाने. पण संयमची खूप ओढाताण होऊ लागली. हुशार असूनहि पाचवीत तो एका विषयात नापास झाला. शाळेने सांगितले की पुन्हा असं झाल्यास त्याला शाळा सोडावी लागेल.
यावर उपाय म्हणून वडिलांनी त्याला त्याच शाळेतून रिटायर झालेल्या शिक्षकांकडे सर्व विषयांची शिकवणी लावली. ते शिक्षक खूप कडक आणि मारकुटे म्हणून प्रसिद्ध होते. पण असा जालीम उपाय केल्याशिवाय काम होणार नाही म्हणून संयमला ती शिकवणी चालू झाली. तो रोज भरपूर मार खायचा. शब्दांचा आणि छडीचाही. चार चार तास शिकवणी चालायची. घरच्यांना हे माहीत होतं पण शिक्षण सर्वात महत्वाचे असं वडिलांनी ठरवलं. शेवटी हे संयमला सहन होईना आणि त्यांनी घरी परत जायचं नाही असं ठरवलं. रात्री अंधार पडला तसा त्याचा धीर सुटला पण घरी जायची हिम्मत होईना. शेवटी घराच्या आसपास चकरा मारतांना तो एका दुकानाच्या पायरीवर बसला आणि तिथेच झोपी गेलेला सापडला.
परी खूप खेळकर आणि सर्वांची आवडती मैत्रीण. ती आणि तिच्या मैत्रिणी मिळून रोज संध्याकाळी खूप खेळायच्या. सोसायटीत एक मोठी नवी मुलगी आली. तिला पण त्यांनी ग्रुपमध्ये खेळायला घेतलं. पण नव्या मुलीला परी आवडायची नाही. मग मुलांचं जोरदार राजकारण चालू झालं आणि परीला मित्रच उरले नाही. नवीन मोठ्या मुलीने सगळ्यांना पळवल. परीने आजीला सांगून पाहिलं. " तू पण खाली येत जा, म्हणजे ती मला त्रास देणार नाही" असं सांगून पाहिलं पण आजीचे गुढघे तिला चढउतार करू देईना आणि परी एकटी पडली. रोजच्या भांडणांना, अपमानाला ती वैतागली आणि खाली जाणच बंद केलं.
स्मृतीची पाळी सुरू झाली नाहीये. इतर मुलींपेक्षा ती खूपच किरकोळ तब्येतीची आहे. वर्गातल्या मुली तिला चिडवतात. परवा ती मुलींच्या बाथरूम मध्ये होती तेंव्हा एक मुलगी तिला म्हणाली की आता तिने मुलांची बाथरूम वापरायला पाहिजे! अनेक महिने हे चालू आहे. दर वेळी तिची अशी थट्टा झाली की ती प्रचंड अस्वस्थ होते पण काही बोलू शकत नाही. घरी कोणाला काही सांगत नाही. रूम मध्ये जाते आणि हात कापायचा प्रयत्न करते. आई बाबा तिला ट्रीटमेंट साठी नेताहेत पण अजून पाळी सुरू झालेली नाहीये. डॉक्टरांनी सांगितलंय की तिच्या शरीरात काही दोष नाही. धीर धरायला पाहिजे. पण स्मृती साठी हे सगळं अति होतंय. या मानसिक वेदनेचा तिला असह्य त्रास होतोय.
हे सगळं आपल्या आजूबाजूला घडत असते. काही मुलं अभ्यासासाठी मार खात असतात. काही इतरांकडून छळले जात असतात. काहींची घरीच कुतरओढ चालू असते. कुणाला सांगावं तर मोठी लोक विश्वास ठेवावा असं वागत नाहीत. तोंड उघडले तर आपल्यावरच शेकायची शक्यता असते. मग करायचे काय?
बहुतेक लहान मुलांचे आयुष्य मजेत चाललेले असते. घराच्या आणि शाळेच्या छत्राखाली चांगले चाललेले असते. पण काही मुले काहीतरी गडबड होऊन अडकतात आणि मग बाहेर पडायचे त्यांना शक्य होत नाही.
एकटी पडणारी मुले, धडपडणारी मुले, प्रयत्न करूनही यशस्वी न होणारी मुले , कोणी विश्वासाचे नसणारी मुले किंवा स्वभावतःच खूप गप्प, घाबरणारी, बुजरी मुले टारगट मुलांचे गिऱ्हाईक बनू शकतात. अजून एकटी पडू शकतात.
सततचा शारीरिक, शाब्दिक किंवा मानसिक मार खावा लागला, अडकून पडायला झालं तर ही चिन्हे दिसायला लागतात. हसते खेळते मूल शांत होते, इतरांना टाळते, झोप - भूक - फोकस गमावते, अस्वस्थ , चंचल होते.
सतत चिडचिड होणे, शारीरिक तक्रारी (अंगदुखी, डोकेदुखी, वारंवार आजारी पडणे, पाळीच्या तक्रारी, अति खाऊन वजन वाढणे) वगैरे दिसतात. चांगल्या शिक्षकांना आणि पालकांना हे बदल लवकर दिसतात. अशा वेळेस मुलाला विश्वासात घेऊन शांतपणे बोलते करणे महत्वाचे असते. पटकन उपाय न सुचवता, दोषारोप न करता, मुलाची बाजू आणि प्रश्न नीट समजावून घेता येतो.
आईवडील पटकन काहीतरी चुकीचे करतील, तमाशा करतील, शाळेत येऊन भांडतील आणि आधीच अवघड असलेली परिस्थिती अजून बिघडेल याची मुलांना धास्ती असते. त्याची दखल घेऊन अलगद हाताने ही गाठ सोडवावी लागते.
छोट्या छोट्या उपायांनी मुलाचा आत्मविश्वास वाढवायला मदत करणे आणि त्रासदायक परिस्थितीतुन बाहेर पडण्याची ताकद निर्माण करून देणे हा खरा उपाय आहे. समुपदेशन आणि पालक मार्गदर्शन करून हे जमू शकते.
कधी कधी जर शारीरिक इजा किंवा लैंगिक इजा होते आहे असा संशय आला तर मात्र तातडीने कृती करून मुलाची सुरक्षितता आधी जपावी लागते.
लहान मुलांच्या खेळावरही लांबून नजर ठेवणे आणि मारामाऱ्या वाढू न देणे ही योग्य गोष्ट आहे. मात्र पालकांचाच उपद्रव होतो आहे का हे तारतम्य ठेवावे लागते.
काही मुले स्वभावतःच बुजरी असतात. त्यांना धक्का मारून, चिडवून, डिचवून पुढे ढकलण्याकडे काही शिक्षकांचा किंवा पालकांचा कल असतो. हे धोकादायक असू शकते. तू आहेस तसा ठीक नाही, असा सतत संदेश देणे हे मुलाच्या व्यक्तिमत्व वाढीला चांगले नाही. प्रत्येकाने सतत पुढे पुढे होऊन बडबड केलीच पाहिजे, सतत पुढे असलेच पाहिजे ही विकृत अपेक्षा आहे. शांतपणे स्वतःची कामे करणारी माणसे जास्त सुखी आणि उपयोगीही असतात हे पालकांनी समजावून घेणे फार महत्वाचे आहे.
डॉ भूषण शुक्ल
बाल-मानसोपचार तज्ञ
पुणे