12/02/2016
आरोग्यात मिठाचा खडा...
परवा एका शाळेत विद्यार्थ्यांची तपासणी करायला गेले होते. आठवीच्या तीन तुकड्यांचे मिळून १८२ विद्यार्थी होते. पहिली वाईट गोष्ट म्हणजे यातला एकही विद्यार्थी निरोगी नव्हता. दुसरी वाईट बाब म्हणजे यापैकी १७० जणांचे केस पांढरे व्हायला सुरुवात झाली होती. आणि तिसरी दुःखद बाब म्हणजे त्यातल्या निम्म्या मुलांना चष्मे होते. वयाच्या सत्तरीपर्यंत काळेभोर केस आणि उत्तम नजर असणारे म्हातारे आम्ही आत्ता-आत्ता पर्यंत बघितले आहेत. त्यामुळे पुढची पिढी ही अशी लवकर म्हातारी होताना बघणं हे मोठं दुःख आहे. बरं या पिढीला त्याचं काही नाही, ‘त्यात काय? केस कलर करता येतात आजकाल.’ ‘लेसरनं चष्मा घालवता येतो की!’ असं ते बेफिकीरीनं म्हणतात. (मग त्या डायचे, लेसरचे कॅन्सरसारखे भयंकर दुष्परिणाम आठवून आमच्या पोटात आणखी एक गोळा येतो.) जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी असलेली केमिकल्स हे जसं यांच्या केसात चांदी येण्याचं आणि डोळ्यावर दागिना चढण्याचं एक कारण आहे, तसंच एक कारण आहे मिठाचा अति वापर.
आजच्या यच्चयावत ‘फास्ट फूड’ मध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाचा वापर केला जातो. बटर, सॉसेस, चीज, सिरीयल्स, वेफर्स, खारे शेंगदाणे, क्रॅकर्स, बर्गर्स, बिस्किट्स, ब्रेड्स, रेडी टू कुक पदार्थ, पाश्ता सॉसेस, मॅओनिज.... सगळ्यात मीठ आहे. (तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? हे म्हणजे अतिच झालं!) कुठलाही खाद्य पदार्थ टिकवायचा असेल तर त्यात मीठ घालावंच लागतं. साहजिकच प्रक्रिया केलेले आणि टिकवलेले जे जे खाद्यपदार्थ बाजारात उपलब्ध आहेत, त्यात मीठ असतंच.
जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार पूर्ण वाढ झालेल्या मानवाला दिवसाला ५ ग्रॅम मिठाची आवश्यकता असते. आपल्या रोजच्या आहारातून तेवढं मीठ आपल्या शरीराला सहज मिळतं. त्याव्यतिरिक्त मुलं हे जे बाहेरचे पदार्थ खातात, त्यात असलेलं मीठ शरीरासाठी जास्त होतं.
आपल्या परंपरेत देखील पापड, लोणची असे जास्त मीठ घातलेले पदार्थ खाल्ले जात. पण ते उन्हाळ्यात (भाज्या कमी असताना) खात. त्या काळी लोक शेतात काम करत, अंगमेहनत करत. त्यामुळे घाम येऊन शरीरातील मिठाचा अंश कमी होत असे. त्यावेळी मिठाची गरज देखील जास्त असणार. शिवाय पूर्वी आपण खडा मीठ वापरायचो. आता आपण जे आयोडीनयुक्त प्रोसेस्ड मीठ वापरतो, त्यातल्या आयोडीनची आपल्याला गरज नाही. कारण आपल्या आहारातून आपल्याला पुरेसं आयोडीन मिळतं. हे मीठातलं जास्तीचं आयोडीन देखील अनेक गंभीर आजार निर्माण करतं. एकावर एक फ्री चा जमाना आहे ना?
दुधाचे पदार्थ आणि मिठाचे पदार्थ एकत्र करून खाण्याची वाईट सवय काही जणांना असते. हा रस्ता हमखासपणे त्वचाविकारांकडे घेऊन जातो.
आमचे काही वैद्य लवण रसाला ‘लावण्य’ म्हणतात, कारण हा रस जेवणात ‘रस’ निर्माण करतो. पण ‘उस गोड लागला म्हणून काय मुळासकट खायचा?’ या चालीवर .... ‘मीठ छान लागलं म्हणून दहा ग्रॅम खायचं?’ नाहीच मुळी. सगळ्या चवीत ‘खारट’ ही सगळ्यात जास्त उष्ण चव आहे. (समुद्राचं पाणी उन्हात पूर्णत: बाष्प होऊन उडून गेल्यावर मीठ मिळतं. इतकी त्यावर उन्हाची प्रक्रिया झालेली असते.) असे पदार्थ जास्त खाल्ले तर केस पांढरे होणं, केस गळणं, त्वचेला सुरकुत्या, त्वचाविकार, दृष्टीमांद्य, गळवं आणि एकूणच शरीर धातूंची शक्ती कमी होणं या समस्या भेडसावतात. शरीरात मीठ जास्त असेल तर पाणी धरून ठेवलं जातं. (माणसानं विभक्त केलेल्या त्याच्या ‘पाणी’ या मित्राविषयी त्याला नैसर्गिक आकर्षण असणारच.) त्यामुळे सूज येते. रक्तदाब वाढणं, वातरक्त हा विशिष्ट प्रकारचा सांध्यांचा आजार, शरीरात विषारी ऑक्सिडंटस् तयार होणं या देखील मीठाच्याच देणग्या असू शकतात.
मग करायचं काय? तर आहारात हे प्रोसेस्ड आणि टिकवलेले पदार्थ वर्ज्य करायचे. घरच्या जेवणात देखील वरून मीठ लावून घ्यायचं नाही. कणिक भिजवताना, भात शिजवताना त्यात मीठ घालायचं नाही. आणि मुख्य म्हणजे....
मीठ सर्वदा अपथ्य असते
‘नजरे’सी अवश्य बाधते
म्हणुनी स्वयंपाकात, माते उपयोजावे सैंधव...