23/10/2025
जालो द्वारपाळ | तुझे राखिले सकळ ||
नाही लागो दिले अंगा | आड ठाकलो मी जागा ||
करूनिया नीती | दिल्या प्रमाणे चालती ||
हाती दंड काठी | उभा जिवाचिये साठी ||
बळ बुध्दी युक्ति | तुज दिल्या सर्व शक्ती ||
तुका म्हणे खरा | आता घेईन मुशारा ||
अर्थ-- तुकाराम महाराज म्हणतात कि देवा, मी तुझे द्वार रक्षण करणारा द्वारपाल झालो आणि सगळ्यांपासून तुझे रक्षण केले. मी तुझ्या आणि लोकांच्या मध्ये उभा राहिलो, लोकांना तुझ्या अंगाला लागू दिले नाही. लोकांना जी नीती घालून दिली आहे त्याप्रमाणे ते चालत आहेत. हातात दंड, काठी घेऊन जीवासाठी मी उभा आहे. देवा,बळ,बुध्दी, युक्ति तुला दिली, सर्व शक्ति तुला दिली. आता या सगळ्याचा मोबदला तुझ्याकडून घेणार आहे.