19/12/2025
व्यसन सवय नसून मानसिक आणि शारीरिक आजार, डॉ. दीपक मुकादम यांनी दिला सावध होण्याचा सल्ला
कोल्हापूर (वारणानगर ) ता : १९ : व्यसन ही केवळ सवय नसून एक मानसिक आणि शारीरिक आजार आहे. व्यसनाचे शैक्षणिक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनावर भयंकर दुष्परिणाम होतात यासाठी वेळीच सावध व्हा असा सल्ला मिरज येथील निर्मल हॉस्पिटलचे डॉ. दीपक मुकादम यांनी दिला. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, वारणानगर,कोल्हापूर (स्वायत्त संस्था) येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने व्यसनमुक्ती व ताणतणाव व्यवस्थापन या विषयावर विशेष मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी डॉ. मुकादम यांनी आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात सध्याच्या तरुण पिढीमध्ये वाढत चाललेल्या दारू, तंबाखू, गुटखा, सिगारेट, गांजा तसेच मोबाईल व इंटरनेटच्या व्यसनाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांमध्ये आढळणाऱ्या ताणतणावाची कारणे, परीक्षा, स्पर्धा, करिअरविषयक अनिश्चितता आणि कौटुंबिक अपेक्षा यावर त्यांनी प्रकाश टाकला. ताणतणाव व्यवस्थापनासाठी सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन, नियमित व्यायाम, ध्यान-प्राणायाम तसेच गरज असल्यास तज्ञांचा सल्ला घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.यावेळी संमोहन थेरपीचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी कसा होतो याचे प्रात्याक्षिक दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ. मुकदम यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्त जीवनशैली व मानसिक आरोग्याविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली. संस्थेच्या वतीने अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
#व्यसनमुक्ती #ताणतणावव्यवस्थापन #मानसिकआरोग्य