26/07/2025
*@ २६ जुलै @*
*कारगिल विजय दिवस*
१९९९ साली आजच्याच दिवशी २६ जुलै रोजी भारताने कारगिल मध्ये पाकीस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवला होता. ‘ऑपरेशन विजय’ नावाखाली भारताने ही मोहिम फत्ते केली होती. पाकने या युद्धात २७०० पेक्षा जास्त सैनिक गमावले होते. पाकिस्तानचे १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही एवढे नुकसान झाले नव्हते. कारगील हे जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे. या प्रदेशावर हिवाळ्यात बर्फाची चादर पसरते. ६० फुटांपेक्षा जास्त उंचीचे बर्फाचे थर सगळं गिळंकृत करतात. -६० अंश सेंटिग्रेडपर्यंत तापमान खाली घसरते. असाच १९९९ मधील हिवाळा. फेब्रुवारी १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. टायगर हिल, तोलोलोंग हिल आदी पर्वत शिखरांवरील लष्करी ठाणे खाली करून नियमा प्रमाणे भारतीय फौजा बेस कॅम्पला परत आलेल्या, कारण भारत-पाकिस्तान या दोन देशांतला सिमला करारच तसा होता, पण पाकिस्तानने डाव साधला. या सगळ्या प्रदेशावर आपले सैनिक घुसवले आणि आजूबाजूच्या छोट्या गावांमधील भारतीय नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मे च्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली आणि मग प्रतिचढाईच्या हालचाली सुरू झाल्या. भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली. पाकिस्तानी लष्कर उंच पहाडावर तर भारतीय सैन्य जमिनीवर. श्रीनगर-कारगिल-लेह हा हायवे पाकिस्तानी लष्कराच्या माराच्या टप्प्यात आलेला. आणि हा जर त्यांनी काबीज केला तर भारतीय सैन्याच्या हालचालींवर मर्यादा येणार. अशी सगळी विपरीत परिस्थिती. वरची शिखरे काबीज करण्यासाठी चढाई करायची ती रात्रीच्या कीर्र अंधारात आणि प्रचंड थंडीत. अनेक कारणांमुळे कारगीलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले.
भारतीय सरकारने 'ऑपरेशन विजय' या नावाखाली कारगीलच्या युद्धासाठी कार्यवाही चालू केली. २६ मे १९९९ रोजी भारताकडून पहिला हल्ला झाला. तोलोलिंगची लढाई व टायगर हिलची लढाई ही या युद्धातील सर्वात महत्त्वाची घटना मानली जाते. तोलोलिंगच्या लढाई नंतर सामरिक तसेच राजनैतिकही पारडे पूर्णपणे भारताच्या बाजूने झुकले. टायगर हिलच्या लढाईत दोन्ही बाजूने जबरदस्त प्रयत्न झाले. ४ जुलै रोजी टायगर हिल भारताच्या ताब्यात आली. टायगर हिलच्या या लढाईत भारताचे ५ सैनिक व पाकिस्तानचे १० सैनिक मृत्यूमुखी पडल्याचे कळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने पाकिस्तानी घुसखोरांवर २.५ लाख रॉकेट डागले. म्हणजे दररोज पाच हजार रॉकेट डागण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर रॉकेट केवळ दुसऱ्या महायुद्धात डागण्यात आले होते. या युद्धात ३० हजार भारतीय जवान लढले त्यापैकी ५२७ शहिद, तर १३६३ जवान गंभीर जखमी झाले. यात पाकिस्तानचे ७०० सैनिक मारले गेले. भारतीय सैन्याने बोफोर्स तोफांचा यशस्वी मारा करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. या युद्धात १० हजार कोटी रुपये खर्च झाले. हवाई दलाने या युद्धात महत्वाची जबाबदारी पार पाडली. कारगिलची उंची समुद्र सपाटीपासून १६००० ते १८००० फूट उंच आहे. यामुळे विमानांना उड्डाण करण्यासाठी अडचणी येत होत्या. विमानांना जवळपास २०,००० फूट उंचावर उडावे लागत होते. अशा उंचीवर हवेचे घनत्व ३०% कमी असते. अशा परिस्थितीत पायलटचा जीव विमानातच गुदमरण्याची शक्यता असते आणि विमान दुर्घटना होऊ शकते. भारतीय हवाईदलाने कारगिल युद्धात पाकिस्तान विरुद्ध मिग-२७ आणि मिग-२९ चा वापर केला. या युद्धात हवाईदलाने जवळपास ३०० उड्डाणे केली. भारतीय हवाई दलाच्या कागदपत्रांमध्ये नवीन खुलासा झाला आहे. कारगिलच्या युध्दात भारत पाकिस्तानचा हवाईतळ पूर्णपणे उद्ध्वस्त करु शकत होता, असा त्यात उल्लेख आहे. १३ जून १९९९ रोजी भारतीय हवाई दलाचे फाइटर जेट हल्ला करण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई तळापासून काही मिनिटांच्या अंतरावर होते.
मे १९९९ मध्ये सुरू झालेले आणि ७७ दिवस चाललेले कारगिल युद्ध भारतीय सैन्यदलाच्या विजयी अध्यायातील आणखी एक सोनेरी पान मानले जाते. कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध म्हणतात. पाकिस्तान तर्फे युद्धा दरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. १९९८ मध्ये हे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाले होते आणि त्यानंतरचे हे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. भारताने हे युद्ध कारगील पुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमा बद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. पाश्चिमात्य देशांनी युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. या युद्धात पहिल्या पासूनच "हे सैनिक आमचे नाही" असा पवित्रा घेतल्यामुळे काही पाकिस्तानी सैनिकांचे दफ़नविधी हिंदुस्तानने केले, म्हणूनच जागतिक पातळीवर हिंदुस्तानने या युद्धात लश्करी विजया बरोबरच राजकारणी विजयही मिळवला. कारगिल युद्धात मुजाहिदीन सहभागी होता. हे युद्ध पाकिस्तानच्या नियमीत सैनिकांनी लढले होते. या रहस्याचा उलगडा पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर विभागाचा माजी अधिकारी शाहिद अजीज याने केला होता. अनेक युद्धतज्ज्ञांचे म्हणणे आहे की कारगिल युद्ध हे वाटत होते त्यापेक्षा जास्त धोकादायक होते. तत्कालिन परिस्थिती पाहून मुशर्रफने अण्वस्त्रांचा वापर करण्याचीही तयारी केली होती. २६ जुलै १९९९ या दिवशी कारगिल विजय दिवस साजरा केला. कारगीलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्या नंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगील युद्धाच्या निमित्ताने दिसली.
*संकलन : मिलिंद पंडित, कल्याण*