10/06/2019
🍀 *भाज्या न खाल्ल्यास काय होतं ?* 🍀
************************************
माणूस शाकाहारी आहे की मांसाहारी हा वाद न संपणारा आहे. जेव्हा माणूस गुहांमधून राहत होता, शिकार करून आणि क कंदमुळं खाऊन आपली उपजीविका करत होता, त्यावेळी तो शाकाहार आणि मांसाहार दोन्ही करत होता. पण त्यानंतर भटक्या जीवनशैलीचा त्याग करून तो शेती करू लागला, एका जागी स्थिरावला तसा त्याच्या आहारात आपल्या शेतात पिकणाऱ्या अन्नाचा जास्त समावेश होऊ लागला. त्यामुळे अर्थातच शाकाहाराकडे त्याचा कल जास्त कल झाला. याचा प्रभाव त्याच्या शरीरक्रियांवरही पडला आणि त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी त्याला जे अनेक प्रकारचं पोषण लागतं त्यासाठी ताज्या भाज्या आणि फळफळावळ यांचा समावेश त्याच्या आहारात असणं आवश्यक बनलं आहे.
परंतु भाज्या किंवा फळं यातून त्याला कोणतं पोषण मिळतं यापेक्षाही त्यांच्यापायी त्याच्या आरोग्याला बाधा आणणाऱया कोणत्या घटकांना प्रतिबंध होतो, हे पाहणे उपयुक्त ठरेल. ताज्या भाज्या आणि फळं यातून मिळणारी खनिजं, जीवनसत्त्व, अनेक वनस्पतीजन्य रासायनिक संयुगं आणि तंतुमय पदार्थ यांच्यामुळं निकोप वाढ तर होतेच, पण दीर्घकाळ छळत राहणाऱ्या, शरीरक्रियांमधील संतुलन ढळल्यामुळे उमटणाऱ्या व्याधींपासून त्याचा बचाव होतो. केवळ आहारातून ही जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळत असल्यामुळे आहाराव्यतिरिक्त जीवनसत्त्वांच्या गोळ्या घेण्याची गरज भासत नाही.
आपलं वजन प्रमाणात राखण्यासाठीही भाज्यांचा उपयोग होतो, कारण अधिक उष्मांक पोटात न जाताही पोट भरणं शक्य होतं. भाज्या न खाल्ल्यास हृदयविकार जडण्याची शक्यता वाढीस लागते हे सर्वेक्षणातून सिद्ध झालेलं आहे. भाज्यांमधून व खास करून फळांच्या सालांमधून मिळणारी अँटीऑक्सिडंट तत्त्वं या विकारांपासून संरक्षण देतात. रक्तदाब आटोक्यात ठेवायचा असेल तर पालक, मेथी यांच्यासारख्या हिरव्या पालेभाज्या, लाल माठ, ब्रोकोलीसारख्या फुलभाज्या, संत्री, मोसंबी किंवा ग्रेपफ्रूट यासारखी सायट्रस जातीची फळं आहारात असणं आवश्यक आहे. तंतुमय पदार्थांच्या नियमित सेवनामुळे पचनसंस्थेलाही मदत मिळून कोठा साफ राहतो, कारण हे पदार्थ आतडय़ांमधून जात असताना पाणी शोषून घेऊन फुगतात व त्यामुळे आतड्यांचं चलनवलन सुलभ होतं. बद्धकोष्ठाच्या व त्यापायी उद्भवणाऱ्या मूळव्याधीसारख्या इतर विकारांपासून बचाव करतात.
तोंड, घसा, अन्ननलिका किंवा जठर यांच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी पिष्टमय पदार्थ ज्याच्यात कमी आहेत अशा लाल किंवा हिरव्या पालेभाज्या, ब्रोकोलीसारख्या फुलभाज्या, लसून आणि कांदे नियमित सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पुरुषांना उतारवयात होणाऱ्या पुरुषग्रंथीच्या कर्करोगापासून टोमॅटो बचाव करू शकतो. त्यातला लायकोपेन हा पदार्थ त्यात महत्त्वाची भूमिका बजावतो.
डॉ रोहित भास्करराव पाटील