19/10/2025
*धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेद रुग्णालयात धन्वंतरी पूजन
सोलापूर दि. १८ : शेठ सखाराम नेमचंद जैन आयुर्वेद रुग्णालयात धनत्रयोदशीनिमित्त आयुर्वेदाचे आराध्यदैवत भगवान श्री धन्वंतरी यांची पूजा संपन्न झाली.
टिळक चौकातील १०८ वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या रुग्णालयात संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद दोशी, सौ. प्रतिभा दोशी, सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक श्री. केतन शहा, वैद्य प्रशांत लांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पं. महावीर शास्त्री व श्री. शितल पंडित यांच्या सुमधुर मंत्रपठणाने पारंपारिक पद्धतीने ही पूजा विधीवत पार पडली.
थोर व्यक्ती व समाजसेवकांचे सानिध्य लाभलेल्या आयुर्वेद रुग्णालयाच्या पवित्र वास्तुमधून आयुर्वेदाच्या प्रचाराचे व्यापक कार्य निरंतर सुरु आहे. गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा, जैन त्यागी मुनींना उपचार व औषधदान अशी कार्ये या संस्थेच्या माध्यमातून केली जातात. आपली प्राचीन भारतीय परंपरा जोपासत ही संस्था अनेक यशोशिखरे पादाक्रांत करीत आहे, असे गौरवोदगार प्रमुख अतिथी श्री. केतन शहा यांनी काढले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद दोशी यांनी धन्वंतरी पूजनाच्या अखंडित परंपरेचे महत्व तसे संस्था राबवीत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती देवून सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
शेठ सखाराम नेमचंद जैन रसशाळेतील डॉ. रोहिणी शहा, त्यांचे सहकारी श्री. विवेक लिमकर व श्री. विजय लिमकर यांनी सितारवादनातून सरस्वतीवंदना सादर केली. रसिका येळवटकर यांनी दीपावलीवर आधारित कविता सादर केली.
यावेळी संस्थेचे सहसचिव डॉ. आदर्श मेहता, प्राचार्या वैद्या. वीणा जावळे, उपप्राचार्य वैद्य श्री. शांतीनाथ बागेवाडी, मुख्य प्रशासकीय अधिकारी श्री. अनुप दोशी, वैद्या कल्पना पांढरे, निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्या विजयश्री देवसाळे, वैद्या विद्या शेंडगे आदींची प्रमुख उपस्थिती होती. समीक्षा जैन व जिज्ञा रेठेकर यांनी सूत्रसंचालन तर सोनल निटवे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी रुग्णालयातील वैद्य, रुग्ण व त्यांचे नातेवाईक कर्मचारी, आयुर्वेद महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.