23/07/2023
नित्त घ्या #शतावरी _/
आरोग्यपुर्ण जगा शंभरावरी//
(शतावरी पाक लहानापासून वृद्धांपर्यत आठवड्यातुन तिनवेळा सेवन केल्यास आरोग्यपूर्ण जीवन व प्रतिकारशक्ती अबाधित ठेउ शकतो.म्हणून शतावरी घरी असलीच पाहिजे)
शतावरी asparagus racemoses
महाशतावरी asparagus sarmentosus
रसशास्त्रः - – शतावरीच्या व महाशतावरीच्या ताज्या कंदांत पाण्यांत मिसळणारा भाग ५२% 1/2 टक्के .
चोथा ३३ टक्के आणि पाणी ९ टक्के आहे .
पाण्यांत मिसळण्याच्या भागांत ७ टक्के साखर आहे . सुक्या कंदाची राख ४ टक्के पडतें .
- धर्म : – दोन्ही शतावरी मधुर , शीत , गुरु , स्नेहन , स्तन्यजनन , मूत्रजनन , शुक्रजनन , बल्य आणि वृष्य आहेत . हे धर्म कंद ताजेपर्णी वापरले असतां स्पष्ट होतात . त्यांत थोडासा संग्राहक धर्म आहे .
मात्रा : - १ ते २ तोळे वाटून दुधाबरोबर देणे .
उपयोगः – शतावरी तीनही दोषांत देतात . पित्तप्रकोप , कुपचन आणि जुलाब यांत मधांतून देतात . वातरोगांत मध , दूध व पिंपळी यांबरोबर देतात व दुखणाऱ्या भागावर लेप करतात . कफरोगांत शतावरीचा खंडपाक देतात . जीर्ण ज्वरांत किंवा दुसऱ्या कोणत्याहि रोगांत शक्ति येण्यास शतावरीची दुधांत पेज करून खडीसाखर व जिरें घालून देतात . ह्यानें शरीरास लाली येते . अश्मरीची इजा कमी होण्यास कंद पाण्यांत वाटून बनारसी साखरेबरोबर देतात .
कंद वाटून पिंपळी , मध व दूध यांबरोबर दिल्यास गर्भाशयाची पीडा कमी होते व कामवासना वाढते . शतावरीच्या अंकुराची भाजी कुपचन रोगांत देतात . हिनें वायु सरतो , व अन्न जिरतें .
हार्लीक्स बोर्नव्हीटा अन काय काय जाहीराती ?गहु ,प्रोटीन, प्रिझरव्हेटीव्ह टेस्ट बघुन भुललो आम्ही.
जे आयुर्वेदाने दिल ते सोडून जाहिरातीत जे दाखवतात ते देतो .
शहरातच नाही तर टिव्हीमुळे खेड्यातही तीच स्थीती.
जाहीराती बघायच्या अन त्यामुळे कंपनीचेच फायदे.आरोग्यासाठी काय?
मुलतानी माती ,गोमुत्र , कडु नींब ,करंज ,बीलायत, कडीपत्याने जे चेहर्यावर फेअर येईल ते केमीकल येईल का?
तरुण मुलं कुस्ती साठी पैहलवान होण्यासाठी औषधी टाॕनीक व प्रोटीन घेतात .
जाहिरातीला भुलून काहीही घेण्यात काय अर्थ नाही.
शतावरी, अश्वंगंधा, मुसळी, बला ,अतीबला , सराटा, शिलाजीत ,हरभरा अश्या कीतीतरी अप्रतिम वनस्पती निसर्गाने दिल्या की ज्याने ओजसत्व ताकद व मसल्स स्ट्राॕग राहतील.त्या कुस्तीपटुंनी नक्कीच वापराव्या.
आयुर्वेदीय रसायन कल्प तर अप्रतिम आहेत ही रसायने सप्तधातुंची वृद्धी करुन ईंद्रीये मन बुद्धी यांची शुद्धी करुन दिर्घायुष्यी करतात.
असो आज आपण त्यातच शतावरी रसायन अर्थात वनस्पती संबंधित माहीती घेऊया.
प्रथमता कै.वैद्द शंकर द.फणसळकर सरांचे शतावरी विषयी विवेचन बघुया
शतावरी...
हिची वेलीसारखी काटेरी क्षुपे असतात . काटे हुकासारखे वाकडे असतात . पाने सुईसारखी बारीक असतात . फुले - पांढरी , फळे - बारीक असून कच्ची असताना हिरवी व पिकल्यावर तांबडी होतात . मुळाला - एक - एक वितीचे पुष्ट असे कंद धरतात . उत्तम पुष्ट कंद १ ते २ फूट लांबही असतात . हे कंद शेकडोंच्या संख्येने असतात . हाच सारवान भाग असून औषधासाठी वापरतात . आश्विन , कार्तिकाकडे उत्तम पुष्ट शतावरी तयार होते .
हिच्या मुळांचे कंद संख्येने शेकडो असतात
म्हणून हिला शतावरी , शतपदी , बहुमला अशी नावे आहेत .
मुळे पुष्ट असतात म्हणून पीवरी म्हणतात .
कल्याणकारक आहे म्हणून नारायणी म्हणतात .
हिची पाने सूक्ष्म सुईसारखी असतात म्हणून सूक्ष्मपत्रा , लघुपर्णिका म्हणतात .
हिच्या कंदातून फार रस येतो व तो गोड असतो म्हणून अतिरसा व स्वादुरसा म्हणतात .
हिच्या खोडास काटे असून ते वर वळलेले असतात म्हणून उर्ध्वकंटका म्हणतात .
कोकणात ही सिताचवरी या नावाने ओळखली जाते . गुणधर्म - रस - कटु अनुरस - मधुर विपाक - मधुर वीर्य - शीत दोषघ्नत्व - वातपित्तघ्न गुण - स्निग्ध कार्य - रसायन , बल्य , स्तन्यवर्धक , मेघ्य , शुक्रवर्धक , नेत्र्य , बृंहण रोगघ्नत्व - रक्तविकार , गुल्म , अतिसार , शोथ , अर्श , ग्रहणी , नेत्ररोग , स्त्रीरोग . रक्तपित्त - ( वा . चि . २ / २८ )
शतावरी , उपळसरी , काकोली , क्षीरकाकोली , ज्येष्ठमध यांचा काढा मध घालून दिला असता रक्तपित्ताचा नाश होतो .
( श्लोक ३८ ) -
गोखरू व शतावरी यांनी सिद्ध केलेले दूध हे विशेषतः लघवीवाटे जाणाऱ्या रक्तास थांबविते .
अतिसार - ( वा . चि . ९ / ८८ , ८९ ) शतावरीच्या मुळांचा कल्क दुधात कालवून घ्यावा व दूधच पिऊन राहावे किंवा शतावरीच्या मुळांच्या कल्काने सिद्ध केलेले तूप घेऊन नुसत्या दुधावर राहावे म्हणजे रक्तातिसार बरा होतो . ( श्लोक ९८ , ९९ ) -
मळाबरोबर , मळापूर्वी किंवा नंतर जास्त रक्त पडते त्यास शतावरी घृत चाटण्यास द्यावे .
स्त्रीरोग - ( वा . उ . ३४ / ३६ - ४० ) शतावरी घृत योनिदोष , आर्तवदोष , शुक्रदोष यांचा नाश करून शुक्रवर्धन व पुसंवन करणारे आहे . यापासून उर:क्षत , राजयक्ष्मा , रक्तपित्त , कास , श्वास , हलीमक , कामला , वातरक्त , विसर्प , शिरोग्रह , अर्दित , धनुर्वात , उन्माद , मद हे विकार दूर होतात .
दुधात शतावरी रस , मनुका , फालसा , चारोळी , ज्येष्ठमध , चिकणा यांचा कल्क घालून तूप सिद्ध करावे .
अपस्मार - ( वा . उ . ७ / २४ ) तेल , लसूण , दूध व शतावरी किंवा ब्राह्मीचा रस अथवा कोष्ठाचा काढा किंवा वेखंडाचे चूर्ण मधाबरोबर द्यावे . अपस्मारनाशक आहे .
सामान्य उपयोग - शतावरी ही पित्तवातनाशक आहे . त्यामुळे ती तजन्य विकारांत वापरावी . क्षीणकफ भरून काढते . ही रस , रक्त , मांस , मज्जा व शुक्र या धातुंवर बल्य , बृंहण कार्य करते . सर्व पित्तज विकारनाशक आहे . हिचे चूर्ण किंवा रस स्त्रियांस दिले असता स्तन्य उत्तम वाढते . गर्भाशयाला बल मिळते व त्यामुळे उत्पन्न होणारा कटिशूल नष्ट होतो .
ही अत्यंत मेघ्य आहे . हृदयाला व नेत्रालाही हितकर आहे . जीवन पंचमूळात हिचा समावेश आहे .
वृष्य व पित्तानिलनाशक आहे . ( वा . सू . १५ ) दुर्वादि गणात आहे .
ही बालांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांस उपयुक्त आहे .
बालरोग चिकित्सा - ( उ . तं . अ . १ ) रसायन उपयोग - ( वा . उ . ३९ / १५७ ) शतावरी काढा व कल्क यांत सिद्ध केलेले तूप साखरेबरोबर सतत घेतले असता कोणतेही वातपित्तजन्य विकार होत नाहीत .
उपलब्ध औषधे - १ ) शतावरी घृत , २ ) शतावरी लेह , ३ ) नारायण तेल .
आयुर्वेदमहोपाध्याय कै.शंकर दाजीशास्त्री पदे गुरुजींचा शतावरी प्रयोगतर अप्रतिमच चला बघुया
शतावरी - मधुर , स्वादु , शीत , वृष्य , स्निग्ध , कडू , रसायन , गुरु , दुग्धप्रद , अग्निदीपक , बलकर , मेधाकारक , शुक्रकर , चक्षुप्य व पुष्टिकर आहे ; व पित्त , कफ , वायु , क्षय , रक्तदोष , गुल्म , सूज व अतिसार यांचा नाश करिते .
महाशतावरी - हृद्य , मेध्य , अग्निदीपन , शुक्रल , अतिशीत , वीर्यवान् , बलकर , वृष्य व रसायन आहे ; आणि अर्श , संग्रहणी व नेत्ररोग यांचा नाश करिते . बाकी गुण शतावरीसारखेच आहेत शतावरीचे अंकुर - कडू , वृष्य लघु व हृद्य असून , त्रिदोष , पित्त , वातरक्त , अर्श , क्षय व संग्रहणी यांचे नाशक आहेत .
( १ ) स्तनांत जास्त दूध येण्यास - शतावरीच्या मुळ्या मूळ तुटू न देतां काढून , दुधांत वांटून द्याव्या . याच मुळ्या म्हशीस अगर गाईस घातल्यास त्यांसही जास्त दूध येते .
( २ ) दाह , पित्त व शूळ यांवर - शतावरीच्या काढ्यांत दूध व तीन मासे पर्यंत मध घालून द्यावा .
( ३ ) शीतज्वरावर - शतावरी व जिरे यांचे चूर्ण १ तोळ्यापर्यंत नवटांक पाण्यात टाकून घ्यावे .
( ४ ) कुक्षि , हृदय , बस्ती किंवा पित्तशळ व सर्व प्रकारच्या शूळांवर - शतावरीच्या रसांत मध घालून द्यावा .
( ५ ) कुत्र्याच्या विषावर - शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून प्राशनार्थ द्यावे .
( ६ ) ज्वरावर - शतावरीच्या मुळ्यांचा रस गाईच्या दुधांत घालून , त्यांत जिऱ्याची पूड घालून द्यावा .
( ७ ) पित्तप्रदरावर - शतावरीचा रस मध घालून द्यावा . ( ८ ) पुष्टतंस व धातुवृद्धीवर - शतावरीचे चूर्ण १ तोळा , नित्य सायंकाळी आटविलेल्या दुधांत टाकून , त्यांत साखर घालून सेवन करावें .
( ९ ) अपस्मारावर - दुधांत शतावरी एक तोळा उगाळून प्यायी .
( १० ) वातज्वरावर - शतावरी व गुळवेल यांचा रस , गूळ घालून प्यावा .
( ११ ) मूतखड्यावर - शतावरीच्या मुळांचा रस , त्यांत तितकेच गाईचे दूध मिश्र करून प्राशनार्थ द्यावा .
( १२ ) रक्तशुद्धि होण्यास - शतावरीच्या ओल्या मुळ्या , आंतून त्यांतील रेषा काढून साधारण कुटाव्या ; व २० तोळे घेऊन त्यात पक्के ८ शेर पाणी घालावें ; व एक शेर उरेपर्यंत काढा करून घ्यावा . मग त्यांत एक शेर खडीसाखर घालून सरबताप्रमाणे दाट पाक करावा व त्यांत केशर , जाय फळ , जायपत्री व वेलची वगैरे मसाला घालून बाटलीत ठेवावा . हा नित्य १ अगर २ तोळे घेऊन , गाईच्या निरशा दुधांत घालून घेत जावा . दिवस ४२ .
दुसरा प्रकार - शतावरीच्या मुळ्या , टाकळ्याच्या मुळ्या , व चिकण्याच्या मुळ्या ही तिन्ही समभाग घेऊन कुटावी ; व औषधाच्या ३२ पट पाणी घालून अष्टमांश काढा करून गाळून घेऊन , त्यांत कान्याच्या दुप्पट खडीसाखर घालून सरबताप्रमाणे पाक करून त्यांत थोडी वेलदोड्याची पूड घालून तो टेवावा . वरीलप्रमाणे दुवक्त घ्यावा .
तिसरा प्रकार - वरील तिन्ही औषधे सुकलेली समभाग घेऊन , त्यांचे चूर्ण करून तुपांत तळून त्यांत त्याच्या दीडपट खवा भाजून मिसळावा , व साखरेचा चाचणी दार पाक करून त्यांत तें मिश्रण , व लवंग , वेलची , जायफळ , जायपत्री , बदामगर , बेदाणा व सराट्याची पूड हीं घालून , तें मिश्रण सारखें ढवळून , एका परातीस तुप फांसून त्यांत ओतावे ; व सुकल्यानंतर वड्या कापून ठेवाव्या . नित्य प्रातःकाळी व सायंकाळी दोन दोन तोळे पाक खाऊन वर सात सात तोळेपर्यंत गाईचे निरसें दूध प्यावे . हा पाक बल पुष्टिकारक व रक्ताची शुद्धि करणारा आहे .
( १३ ) रक्ता तिसारावर - शतावरीच्या रसांत साखर घालून द्यावी ; अथवा तूप घालून रस आटवून ते सिद्ध झालेले तूप द्यावे . किंवा शतावरीच्या मुळ्या वाटून दुधाबरोबर त्यांचा रस प्यावा . ( १४ ) त्रिदोषज मूत्रकृटावर - शतावरीच्या मुळांचा काढा साखर व मध घालून घ्यावा . ( १५ ) आम्लपित्तावर शतावरी घृत शतावरीचा कल्क ६४ तोळे , तूप ६४ तोळे , व चौपट दूध घालून , पचवून घृत तयार करावें . ते आम्लपित्त , वातपित्तसंबंधी विकार , रक्तपित्त , तहान , मूर्छा , श्वास व संताप यांचा नाश करिते .
आनखी काही आमयीक प्रयोग बघुया
( १ ) स्तन्यवृद्धीसाठी शतावरीच्या मुळ्या दुधात वाटून द्याव्या .
( २ ) दाहावर शतावरीचा काढा दूध आणि थोडा मध घालून द्यावा .
( ३ ) ज्वरावर शतावरीच्या मुळांचा रस व गाईचे दूध एकत्र करून त्यात जिऱ्याची पूड घालून ते मिश्रण द्यावे .
( ४ ) धातुपुष्टतेसाठी शतावरीचूर्ण १० ग्रॅम प्रमाणात रोज दुधातून घ्यावे .
( ५ ) अम्लपित्तावर २५ ग्रॅम शतावरीघृत घ्यावे . ( संदर्भ द्र.गुण वीज्ञान डाॕ.अ.पां.देशपांडे ,डाॕ.र.रा.जवळगेकर व डाॕ.सुभाष रानडे सर).
आपल्याकडे शतावरीचा आणखी एक प्रकार आहे. त्याला भाजीची शतावरी असे म्हणतात. तिचे शास्त्रीय नाव Asparagus officinalis असे आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया, फ्रान्समधील मिलिल फोर्ट, चीनमधील तैवान, जपान वगैरे देशात ही वनस्पती ॲस्परेगसची भाजी म्हणून खाल्ली जाते. ॲस्परेगसची लागवड पूर्वीपासून काश्मीर, भूतान या थंड प्रदेशात होत आली आहे. या भाजीचे कोवळे कोंब चवदार, आरोग्यवर्धक तर आहेतच याशिवाय त्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए व सी, पोटॅशियम, रिबोफ्लेव्हिन व थायमिन ही औषधी तत्त्वे आहेत. या कोंबांपासून चविष्ट असे सूप तयार केले जाते. आपल्याकडे मेरी वॉशिंग्टन ह्या जातीच्या ॲस्परेगसची शिफारस केली जाते.
महाराष्ट्रातील काही भागात शतावरीला 'सुसर मुळी' असेही म्हणतात. व याची करून भााजी करून खााल्ली जाते. साधारणत: राना-वनांत वा शेतांत मृृृृग नक्षत्रातील पहिल्या काही पावसानंतर ही वनस्पती जमिनीतून वर निघते. आणि कोवळे कोवळे कोंब खूडून आणून याची भाजी बनविली जाते.
एक रानभाजी म्हणून शेतकरी बांधव आवडीने ही भाजी खातात.
याची भाजी चविष्ट, रूचकर, आरोग्यास पोषक, जीवनसत्व व खनिजद्रव्ययुक्त असते.
शतावरी अंकुर (कोंब )भाजी
कोंब स्वच्छ धूवून उकळत्या पाण्यात शिजवा .
पातेल्यात लोणी व बटाट्या फोडी मीठ, मसाला भुरभुरवुन शतावरी कोंब टाकावे .
मंद गॕसवर भाजुन घ्यावे व मीरपुड शिंपडावी .भाजी जास्त शिजवू नये .वाफवुन मसाला चाट मसाला टाकून खाल्ली तरी चालेल (यु ट्युबर शतावरी भाजी रेसीपी छान दिलेल्या आहेत).
शतावरी पाक...
शतावरीच्या मुळांचा कल्क करून घ्यावा , व कल्काचे चौपट दूध , दुधाच्या समभाग गाईचे तूप , आणि कल्काच्या समभाग खडीसाखर घेऊन तूप शेष राहीपर्यंत पचन करावें . मग हें नित्य दोन तोळे सेवन करावें ; म्हणजे रक्तपित्त , आम्लपित्त , क्षय व श्वास यांचा नाश होतो .
शतावरी तेल -(1 तोळा 12 ग्रॕम )
दूध १२८ तोळे , तेल ६४ तो . व शतावरीचा रस ६४ तो . व वेखंड , कोष्ठ , चंदन , देवदार , कावळी , घेटोळमूळ , रास्ना , मंजिष्ठ , वेलची , रुदंती , शिलाजित , आस्कंद , जटामांसी व चिकणामूळ हीं प्रत्येक दोन दोन तोळे घेऊन त्यांचे काढे किंवा कल्क २/२ तो घालून मंदाग्नीवर तेल सिद्ध करावें . एकांगवात , सर्वांगवात , भग्नास्थि , संधिभंग , हीं या तेलाचे प्राशनानें व अभ्यंगाने नाश पावतात . हें तेल अनेक प्रकारच्या वायूंचा नाश करितें .संदर्भ -आर्यभिषक
टिप-
माहिती व ज्ञानलेखन संदर्भासहीत नमुद केले आहेत.
आपल्या स्वास्थ्य संवर्धन आणि व्याधी नाशनार्थ मार्गदर्शनपर प्रारंभिक शास्त्रोक्त माहिती देण्याचा हा प्रयत्न असून , औषधांचा वनस्पतीचा प्रत्यक्ष वापर तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
लेखकाने आयुर्वेद ग्रंथ व अभ्यासातील औषधे पुस्तकांचा समावेश लेखात केला आहे. काही औषधीत वाळलेले काष्ट, पंचांग उपयोगात येतात त्यामुळे औषध वनस्पती झाडांचा फोटो टाकतांना गुगल सर्च चा उपयोग केला तर वनस्पती फोटो चुकु शकतात कृपया चुक झाल्यास कळवावे.