28/09/2021
गर्भसंस्कार मनोवांच्छित संतती प्राप्तीस सहाय्यक शास्त्र
गर्भामध्ये भावी अपत्यावर केले जाणारे संस्कार म्हणजेच गर्भसंस्कार याची सुरुवात मनोवांच्छित संतती प्राप्त इच्छुक स्त्री-पुरुष अथवा भावी माता-पिता असे संबोधू यांचा मनोवांच्छित संतती प्राप्तीचा प्रवास शरीर, मन, बुध्दी व आत्मा यांचे शुध्दीकरण, स्त्री-पुरुष बीजशुध्दी, होम-हवनादी कुळाचार पूर्ती, गर्भाधान विधी, सशक्त व सुसंस्कारी शिशूची निर्मितीसाठी आदर्श दिनचर्या, गर्भ-संवाद ते मनोवांच्छित संततीची प्राप्ती अशा क्रमाने सुरु होत असतो.
गर्भसंस्कार विधी हा पूर्णत: वैद्यकीय शास्त्र, विज्ञान व अध्यात्म आधारित असून या विधीप्रमाणे इच्छित अथवा मनोवांच्छित संतती प्राप्त करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक दांपत्यास अलौकिक संतती प्राप्त होत असल्याचे अनेक संशोधनानंतर सिध्द झाले आहे.
“शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी” याचा मतितार्थ बीज शुध्द असेल तर फळ देखील परिपूर्ण व रसाळ निर्माण होते. या निसर्ग नियमावर विश्वास असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आपले भावी अपत्य जन्माला घालण्यापूर्वी त्याच्या निर्मितीसाठी काही विशेष सोपस्कार अथवा विधी पार पाडणे अत्यावश्यक आहे, कारण प्रत्येक जन्म-दाता आपले भावी अपत्य हा त्यांचा नावलौकिक वाढविणारे व त्यांचा भावी आधार बनावे या अपेक्षेने जन्मास घालत असतो, हे सत्य असेल तर हे अपत्य त्यांना अपेक्षित असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास समर्थ असावे याकरिता त्याच्या निर्मितीचा संकल्प देखील तितकाच विचारपूर्वक घेतला गेला पाहिजे.
दिव्य अलौकिक वा मनोवांच्छित संतती प्राप्तीसाठी इच्छुक माता-पित्यांनी सु-नियोजित पध्दतीने स्वत:ची शारीरिक मानसिक बौध्दिक व आत्मिक शुध्दी करणेसाठी आदर्श दिनचर्या, पोषक आहार, योग-प्राणायाम-ध्यान, सकारात्मक-रचनात्मक-उत्पादक विचार, काम-क्रोध-लोभ-मोह-मद-मत्सर आदी षडविकारापासून मुक्त असे अनेक मार्ग प्राचीन आयुर्वेद शास्त्रामध्ये शिकविले आहेत.
मनोवांच्छित संतती प्राप्तीचा कालावधी हा एक वर्षाचा असून यामधील प्रथम तीन महिने हे संबधित माता-पित्यांनी स्वत:चे मन-बुध्दी-आत्मा व शरीर शुध्दी, स्त्री-पुरुष बीजशुध्दी, कुळाचारांची पुर्ती, कुळामधील ज्येष्ठ वाड-वडिलांचे आशीर्वाद आदींची पुर्ती झालेनंतर शुभ नक्षत्र, दिन व मुहूर्त पाहून बीजारोपणास (गर्भाधानास) सिध्द होणेसाठी आहेत.
पुढील नऊ महिने म्हणजेच २८० दिवस जे शुध्द व सकस बीज कसदार जमिनीमध्ये रोपित केले आहे म्हणजेच ज्या गर्भाचे रोपण केले आहे त्या गर्भाची वाढ वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर निकोप निरोगी व पूर्ण विकसित होणेसाठी गर्भिणीचा आहार, विहार, विचार व भावना या पूर्णत: पवित्र, सात्विक, सकारात्मक व क्रोधरहित राहाव्यात याकडे लक्ष देणे अति-आवश्यक आहे, यासह गर्भिणी व गर्भस्थ शिशु यांना शांत पवित्र व आनंदी वातावरण प्राप्त होईल याची काळजी घेणे याकरिता प्रयत्नशील रहावे लागते.